ही गोष्ट आहे २३ डिसेंबर २०२१ ची! उत्तर चीनमधल्या ‘शांक्सी’ विभागातल्या शियान शहरात अचानक एकच धावपळ सुरू झाली. चीनमधील सरकारी अधिकाऱ्यांनी फरमान काढलं, “शहरातल्या सर्व म्हणजे १ कोटी ३० लाख नागरिकांनी घराच्या बाहेर अजिबात पडू नये कारण कोरोना (Corona) या जीवघेण्या रोगाचा फैलाव होतो आहे. यावेळी वेळीच उपाय नाही केले, तर खूप गंभीर परिणामांना सगळ्यांना सामोरे जावं लागेल.”
चीनमध्ये साम्यवादी सरकार असल्यामुळे आणि चीनी सरकारचं माध्यमांवर नियंत्रण असल्यामुळे बातमी खरी असली तरी ती कितपत खरी आहे याबद्दल साशंकता निर्माण होऊ शकते. अर्थात आकडे बदललेले असतील, पण परत कोरोना (Corona) मूळ धरू पाहतोय की काय, अशी परिस्थिती आता चीनमध्ये आहे.
ज्याप्रमाणे आपण सहजरीत्या फेसबुक वापरू शकतो, आपली मतं मांडू शकतो, विरोध करू शकतो, हरकत घेऊ शकतो (कारण आपल्याकडे लोकशाही आहे); चीनमध्ये अशी परिस्थिती नाही. याचं कारण चीनला आपल्या नागरिकाना स्वातंत्र्य मिळू द्यायचा नाही आणि सध्याच्या शी जिनपिंग यांच्या सरकारने ती पुरेपूर खबरदारी घेतली आहे. विषय आहे चीनमध्ये कोरोना परतण्याचा! अर्थातच चीनी सरकारला खरी माहिती उजेडात येऊ द्यायची नाही, असाच अर्थ यातून निघतो.
गंमत म्हणजे काही वृत्तवाहिन्या या व्हायरसला कोरोना व्हायरस न म्हणता ‘वुहान व्हायरस’ म्हणतात. म्हणजे, वुहान या शहरातून, तिथल्या प्रयोगशाळेतून हा व्हायरस सगळ्या जगभर पसरला आणि त्याचे परिणाम सगळी मानवजात भोगते आहे, असा एक ठाम समज आहे. असो. तर विषय आहे कोरोना परतण्याचा…
जसं जगभर सोशल मीडिया म्हणून सगळीकडेफेसबुक सर्वत्र वापरलं जातं त्याप्रमाणे चीनमध्ये फेसबुक वापरलं जात नाही. याचं कारण चीनमध्ये फेसबुक आणि इतर सगळ्या जागतिक मीडियाच्या वापरास बंदी आहे. चीनमध्ये फेसबुकप्रमाणे वाईबो (Weibo) ही साईट स्थानिक चीनी नागरिक वापरतात. अर्थातच चीनी सरकारचं कडक नियंत्रण या साईटवर आहे. ‘वाईबोला’ सरकारी वेबसाइट असं म्हटलं तरीसुद्धा काही हरकत नाही, अशी परिस्थिती आहे.
मात्र तुम्ही फार काळ जनतेला वेठीस धरू शकत नाही, ही खरी गोष्ट आहे. चीनच्या शियान मधले नागरिक आता आवाज उठवू लागले आहेत. नागरिकांनी तिथल्या सामाजिक माध्यमांवर आपल्या कैफियती मांडल्या, तर काहींनी फोटोदेखील टाकले.
२३ डिसेंबर पासून सगळ्या नागरिकांना घरी बसायचे आदेश जारी केल्यामुळे त्यांची खूपच तारांबळ उडाली आहे. लोकांकडे खायला अन्न नाही. बाहेर तर पडू शकत नाही. चीनी अधिकाऱ्यांनी अन्नधान्याचा मोफत पुरवठा केला असून ते वाटण्यात येत आहे, असं सरकारचं म्हणणं आहे.
परिस्थिती इतकी गंभीर आहे की, लोक चक्क वस्तुविनिमय (Barter) पद्धतीने रोजचं जीवन जगत आहेत. सिगरेटच्या बदल्यात कोबी, भांडी धुण्याच्या साबणाच्या बदल्यात सफरचंद, तर आपल्या व्हिडिओ गेमच्या बदल्यात नूडल्स, असले भलतेच व्यवहार नागरिकांना करावे लागत आहेत. म्हणजे मध्ययुगीन परिस्थिती आहे की काय, अशी शंका यावी.
काही बातम्यांनुसार शियान इथल्या स्थानिक प्रशासनाने अन्नधान्याचे संकट उभे राहू नये, तसंच लोकांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात म्हणून अन्नधान्याचे पॅकेट्स तयार करण्याचे आणि ते पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. जर व्यवस्था भक्कम असती, तर लोकांनी तक्रारी केल्या नसत्या, पण तसं दिसत नाही.
हे ही वाचा: हळदीची लढाई लढणाऱ्या विज्ञानजगतातील महाराणाची कहाणी
‘हे’ आहेत २०२१ मध्ये भारतीयांनी गुगलला विचारलेले टॉप १० प्रश्न
ओमायक्रोनचं थैमान सुरू आहे. अशी परिस्थिती असताना चीन सगळ्या जगाला कुठल्या दिशेने घेऊन जाणार आहे, याची चीनलासुद्धा कल्पना नसावी. यावर उपाय काय? यावर उपाय म्हणजे आपण आपली काळजी घ्यावी. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला हवी. व्यायाम आणि आहाराचे योग्य नियोजन करायला हवे. याचबरोबर आपल्या सरकारने कुठल्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि काय करू नये, हे सांगितल्यानंतर त्याचं तंतोतंत पालन करून सुरक्षित राहणं, एवढंच आपण करू शकतो.
हे देखील वाचा: कोल्हापूरची खाद्यसंस्कृती -सणासुदीचं सुग्रास कोल्हापूर
चीनने हे संकट उभं केलं आहे आणि त्याचा त्रास जगाला होतोय. याचा विचार चीनी सरकार करेल का? या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी कोणालाच माहिती नाही. सध्यातरी, भविष्यात जे काही वाढून ठेवलं आहे, ते सकारात्मक असावं, एवढीच आशा आपण करू शकतो.
– निखिल कासखेडीकर
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.