Home » ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ चित्रपटावर होणारी चर्चा आणि वाद

‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ चित्रपटावर होणारी चर्चा आणि वाद

by Team Gajawaja
0 comment
Share

प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. महेश मांजरेकर हे नाव सिनेसृष्टीमध्ये विविध विषयांवरील हटके चित्रपटांसाठी ओळखले जाते. आपल्या चित्रपटांमधून त्यांनी समाजातील अनेक घटकांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या मात्र सर्वत्र मांजरेकरांच्या ‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या आगामी मराठी चित्रपटाची चर्चा सुरू आहे. 

‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या चित्रपटामध्ये गिरणी कामगारांची धडपड आणि त्यामुळे घडलेल्या गुन्हेगारी दाखवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये बोल्ड दृश्य आणि शिव्यांचा भडीमार पाहायला मिळाला. इतकंच नव्हे तर, “अठरा वर्षांवरील प्रेक्षकहो, दम असेल तरच थेटरात येऊन बघायचं…” पोस्टरवरील या ओळीनेही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.  

प्रेम धर्माधिकारी, वरद नागवेकर, छाया कदम, शशांक शेंडे, रोहित हळदीकर, कश्मिरा शाह, उमेश जगताप, गणेश यादव, अतुल काळे, अश्विनी कुलकर्णी, सविता मालपेकर, ईशा दिवेकर आदी कलाकारांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा

तसं पाहायला गेलं, तर चित्रपटांमधील शिव्या आणि बोल्ड दृश्य या गोष्टी आता नवीन राहिलेल्या नाहीत. आजकाल सिनेमा असो वा वेबसिरीज यामध्ये सर्रासपणे विनाकारण टाकलेल्या शिव्या आणि बोल्ड दृश्य पाहायला मिळतातच. अलीकडच्या काही वर्षात मराठी सिनेसृष्टीनेही आपल्या कलाकृतीमध्ये शिव्या आणि बोल्ड दृश्यांचा भडीमार सुरु केला आहे. 

‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर त्यातील भडक दृश्यांची सर्वत्र चर्चा झाली. त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा आणि एका महिलेची आक्षेपार्ह स्थितीमधील दृश्य दाखवण्यात आली आहेत. याचबरोबर चित्रपटात दाखविण्यात आलेल्या काही दृश्यांवर जोरदार आक्षेप घेतला गेला. इतकंच नव्हे तर, राष्ट्रीय महिला अयोगाने आक्षेप घेत, केंद्रीय माहिती आणि प्रसारण विभागाकडे तक्रार नोंदवली.

चित्रपटावर आक्षेप घेतला जात असताना महेश मांजरेकर मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आणि त्यामध्ये लिहिलं की, “नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’’ वर होऊन जाऊ दे राडा. कारण १४ जानेवारीला सुरु होणार लांडग्यांचा हैदोस, तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!’’

आज हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या प्रोमोवरून वाद झाल्यामुळे त्यामध्ये बदल करण्यात आला. आक्षेपार्ह दृश्य काढून सुधारित प्रोमो सर्वत्र पाठविण्यात आले. तसेच, महेश मांजरेकर यांनी, “कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता”, असं म्हणत वादावर पडदा टाकला.

हे ही वाचा: नववर्षात ‘हे’ स्टारकिड्स झळकणार मोठ्या पडद्यावर…

या महत्वाच्या कारणांसाठी आवर्जून बघा ‘शार्क टॅंक इंडिया'(Shark Tank India)

जर फक्त ट्रेलरला एवढा विरोध झाला असेल, तर संपूर्ण चित्रपटात काय काय गोष्टी असतील आणि त्याला किती विरोध होईल हे चित्रपट पाहून समजेलच. पण जर खरंच हा चित्रपट खरोखरच वास्तववादी घटनेवर आधारित असेल आणि गिरणी कामगारांच्या पडझडीनंतर अशा सर्व गोष्टी घडल्या असतील, तर हा चित्रपट सर्वसामान्य माणसाला विचार करायला लावणार, यात शंकाच नाही.

– स्वप्नील शहा 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.