Home » जेव्हा आदिवासींनी ब्रिटिशांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं !

जेव्हा आदिवासींनी ब्रिटिशांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं !

by Team Gajawaja
0 comment
Birsa Munda
Share

या संपूर्ण जगात विविधतेने नटलेला देश म्हणजे आपला भारत ! भाषा, प्रांत, धर्म, संस्कृती, कला इतकं वैभव कोणत्याही देशाच्या नशिबी नाही, ते भारताला मिळालय. साक्षात निसर्गदेवतेचा वरदहस्त लाभलेल्या आपल्या देशाला समुद्र, वाळवंट, हिमालय, पाऊस, नद्या, जंगल सगळ्यांचा समान वाटा मिळाला आहे. भारत जितका जंगलाने वेढलेला तितका जंगलामुळेच वाढलेला त्याच जंगलांचं रक्षण करणारा ‘वाघोबा’ आजही आदिवासी लोकांचं दैवत आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही याच आदिवासी समाजातून एक वाघ उठून उभा राहिला होता, ज्याच्या डरकाळीने ब्रिटिश साम्राज्य हादरलं होतं आणि तोच या भारत देशाच्या स्वातंत्र्य समरात ‘भगवान’ म्हणून अमर झाला. त्या महान योद्ध्याचं नाव बिरसा मुंडा ! स्वातंत्र्यलढ्याची ठिणगी फक्त देशाच्या ठराविक शहरांमध्ये नाही, तर जंगलामध्येही पेटून उठली होती. ‘जल जंगल जमीन’ या मूलमंत्रावर आपल्या हक्कांसाठी लढणारी एक आदिवासी पिढी भारताच्या जंगलांमध्ये तयार झाली होती आणि त्यांचा नायक ठरला बिरसा नावाचा आदिवासी पठ्ठ्या! आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त भारताच्या या महान स्वातंत्र्यसैनिकाचा पराक्रम जाणून घेणार आहोत. (Birsa Munda)

बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ ला झारखंडमधल्या उलीहातू गावात झाला. ते मुंडा या आदिवासी जमातीतले होते. आयुष्य जंगलातलंच त्यामुळे धनुष्यबाण चालवण्यात पटाईत आणि त्यातच चपळ बुद्धीमुळे भविष्यात बिरसा क्रांती घडवू शकले. शिक्षणासाठी जबरदस्ती धर्मांतर केल्यामुळे बिरसांना नाईलाजाने बिरसा डेव्हिड हे नाव वापरुन शिक्षण घ्यावं लागलं, पण बंडखोरी ही आदिवासींच्या रक्तातच भिनलेली असते. ख्रिश्चन धर्माची सक्ती ओलांडून ते पुन्हा आपल्या मूळ भूमी युद्धात परतले.

त्यावेळी भारताच्या जंगलातील जमिनी बळकावण्यासाठी ब्रिटिशांची चढाओढ सुरू झाली होती. आदिवासी समाजाचे हक्क हिसकावून घेण्यासाठी ब्रिटिशांनी वनीकरण कायद्यासह इतरही अनेक चुकीचे कायदे लागू केले गेले, ज्यामुळे आदिवासी लोकांना राहण्यासाठी घरदेखील राहिलं नाही. जंगलात मेंढरे चरण्यासाठी नेता येत नव्हते, जंगलातून लाकडं गोळा करता येत नव्हती. त्यामुळे या लोकांना आपलं दैनंदिन जीवन जगण्यात बरीच अडचणींचा सामना करावा लागत होता. याच ब्रिटिश व्यवस्थेत जमीनदार, सावकार लोकंही आदिवासींचं प्रचंड शोषण करत होते. अशा परिस्थिती या सर्वांच्या दडपशाहीला बिरसा मुंडा पुरून उरले. (Birsa Munda)

ब्रिटिशांविरोधात विद्रोह करण्यासाठी बिरसा यांनी ‘उलुगुलान’ चळवळ उभी केली होती. ‘उलगुलान’ म्हणजे बंड, उठाव किंवा हल्लाबोल ! १८९० साली त्यांनी उलगुलानची घोषणा केली. यावेळी बिरसा यांनी सर्व आदिवासींना आपल्या जंगल, जमीन आणि संपत्तीसाठी एकत्र येवून लढण्याचं आवाहन केलं. त्यांना जंगलातून पाठिंबा मिळाला आणि ते आदिवासींचे महानायक बनले. आदिवासी लोकं त्यांना ‘धरती आबा’ म्हणायचे. यावेळी त्यांनी ‘बिरसैत’ या नवीन धर्माची सुरुवातसुद्धा केली होती, जो पूर्णपणे एक निसर्गपूजक धर्म होता. हजारो आदिवासी लोकं त्यांच्या धर्माशी जोडली गेली.
“आम्ही ब्रिटिश शासनाच्या तत्वांविरूध्द विद्रोहाची घोषणा करतोय. आम्ही कधीही ब्रिटिशांच्या कायद्यांना मानणार नाही. जो इंग्रज आमच्याविरोधात उभा राहील, त्याला आम्ही ठार करू. त्यांच्या या घोषणेने आदिवासी बांधव पेटून उठला आणि प्रत्येकजण त्या आंदोलनात सामील झाला.

या बंडामुळे ब्रिटिश सरकार पुरतं त्रस्त झालं. बिरसा मुंडांचं हे आंदोलन भारतभरातील आदिवासी लोकांना एकत्र आणू शकतं या भीतीने बिरसा यांना पकडण्यासाठी मोहीम आखण्यात आली आणि त्यांना पकडून देणाऱ्याला ५०० रुपयांचं इनाम जाहीर केलं. बिरसा यांनी लढा सुरू केला. यावेळी त्यांनी आदिवासी लोकांसह अन्यायी सावकार व जमीनदारांच्या घरांना आग लावायला सुरुवात केली. याप्रकरणी १८९५ साली बिरसा आणि त्यांच्या वडिलांना पोलिसांनी पकडलं. त्यांना २ वर्षांचा तुरुंगवास आणि दंड झाला. हजारीबाग इथल्या मध्यवर्ती कारागृहात असताना बिरसा यांची कीर्ती आणखी वाढली आणि यासोबत ब्रिटिशांची धास्तीदेखील वाढू लागली होती. (Birsa Munda)

सुटकेनंतर बिरसा यांनी ब्रिटीश राणीचा पुतळा जाळण्याचा आदेश दिला. त्यांच्या अनुयायांनी सर्वत्र ब्रिटिश राणीचे पुतळे जाळायला सुरुवात केली, ज्यामुळे ब्रिटिश आणखी चिडले. मात्र शांत बसणं हे बिरसा यांच्या तत्वास बसत नव्हतं. संपूर्ण जंगल त्यांनी जमा केलं होतं. बाण, कुर्हाड आणि गुलेर घेऊन त्यांनी इंग्रजांवर अनेक हल्ले चढवले, त्यांची मालमत्ता जाळली, बऱ्याच इंग्रज पोलिसांना ठार केलं. १८९८ साली तांगा नदीकिनारी झालेल्या युद्धात बिरसा आणि त्यांच्या शिपायांकडून ब्रिटिशांचा पराभव झाला होता. मात्र यानंतर ब्रिटिशांनी फौजफाटा आणत मोठ्या प्रमाणात आदिवासी नेत्यांना अटक केलं.

============

हे देखील वाचा : म्हटलेलं वाक्य त्याने युद्धभूमीवर खरं केलं !

=============

आतापर्यंत ब्रिटिशांनी बिरसा मुंडा यांना पकडण्याची पूर्ण योजना तयार केली होती. जानेवारी १९०० दरम्यान झारखंडमधल्या डोंबरी पहाड याठिकाणी ब्रिटिश आणि आदिवासींमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता. ज्यामध्ये अनेक लहान मुलं आणि महिलांचा जीव गेला. ब्रिटिशांच्या प्रतिकारामुळे आंदोलन कमजोर होत गेलं आणि अखेर ३ फेब्रुवारी १९०० रोजी बिरसा यांना चक्रधरपूरइथून अटक करण्यात आली. त्यांच्या विद्रोहाची ठाणीही उद्ध्वस्त करण्यात आली. त्यांच्यासोबत इतर ४६० आदिवासी युवकांनाही अटक करण्यात आलं होतं. यानंतर काही महिने बिरसा यांचे ब्रिटिशांनी तुरुंगात अतोनात हाल केले. बिरसा यांच्या मृत्यूचं गूढ अजूनही बाहेर पडलेलं नाही. कारण काहींच्या मते त्यांना इंग्रजांनी फासावर चढवलं होतं, तर काहींच्या मते त्यांचा प्लेगमुळे मृत्यू झाला तर काहींचं असं म्हणणं आहे की, ब्रिटिशांकडून त्यांच्यावर विषप्रयोग झाला होता. (Birsa Munda)

त्यांच्या मृत्यूचं कारण काहीही असो, पण त्यांचं जगणं या मातृभूमीसाठी होतं आणि आपले प्राणही त्यांनी मातृभूमीच्या वेदीवरच अर्पण केले. आदिवासी समाजामध्ये क्रांतीची आणि स्वातंत्र्याची ज्वाला पेटवणारं असं महान व्यक्तिमत्त्व यापूर्वीही झालं नव्हतं आणि भविष्यातही होणार नाही. आदिवासी समाज आजही त्यांच्या योगदानाचं स्मरण करून सदैव त्यांचा गौरव करतो. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी आणि आदिवासी समाजासाठी बिरसा मुंडा यांनी आपल्या आयुष्याची, घरदाराची, संसाराची राखरांगोळी केली. त्यामुळे हीच भावना प्रत्येक भारतीयामध्ये जागृत व्हावी आणि एवढंच वाटतं.
जागतिक आदिवासी दिनानिमित्त भारताच्या या महान योद्धाला सलाम ! (Birsa Munda)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.