Home » America : चिंता वाढली गायींमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव !

America : चिंता वाढली गायींमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव !

by Team Gajawaja
0 comment
America
Share

अमेरिकेत बर्ड फ्लूचा फैलाव वाढत असतांनाच एका महिलेचाही मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोंबड्यांपाठोपाठ येथील गायींमध्येही बर्ड फ्लूचे विषाणू आढळल्यानं चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेत दुभत्या गायींमध्ये अधिक प्रगत बर्ड फ्लू विषाणू आढळल्यामुळे आरोग्य विभाग दक्ष झाला आहे. युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ अ‍ॅग्रीकल्चरनुसार, गायींमध्ये आढळलेल्या बर्ड फ्लूच्या प्रकाराला D1.1 म्हणून ओळखले जाते. आता या गायींना वेगळे ठेवण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. गेल्या आठवड्यातच लुईझियानामध्ये एका महिलेचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. शिवाय येथील कॅलिफोर्निया भागातील कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याची नोंद झाली आहे. त्यात आता गायींमध्येही बर्ड फ्लू चा फैलाव झाल्याचे स्पष्ट झाल्यानं येथील पशूपालन व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे. (America)

अमेरिकेत बर्ड फ्लू म्हणजेच एव्हियन इन्फ्लूएंझाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. बर्ड फ्लूचे विषाणू आता मानवांमध्येही पसरण्याची शक्यता वाढली आहे. बर्ड फ्लू हा विषाणू पक्षी, गायी आणि इतर प्राण्यांमध्ये पसरतो, तसेच अमेरिकेत कोंबड्या, गायी आणि डुकरांमध्येही या बर्ड फ्लू चे विषाणू आढळून आले आहेत. याचा परिणाम पशूपालन उद्योगावर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला येथील कॅलिफोर्नियामधील कोंबड्यांमध्ये H5N9 बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वेगाने झाल्याचे पाहणीत आढळून आले. आधीच आगीनं होरपळलेल्या कॅलिफोर्नियामधील कुक्कुटपालन व्यवसायाची यामुळे मोठी हानी झाली आहे. (International News)

H5N9 मुळे अनेक कोंबड्यांचा मृत्यू झाल्यामुळे येथे बाधित क्षेत्रे तयार केली आहेत. H5N9 या प्रकारच्या बर्ड फ्लूमध्ये मृत्यूदर वाढतो, त्यामुळे कॅलिफोर्नियामध्ये कोरोना काळाप्रमाणे काही बाधिक क्षेत्र तयार करत हा भाग सील केला आहे. याबाबत काळजी घेत असतांनाच आत्ता गायींमध्येही याच विषाणूची बाधा झाल्याचे उघड झाले आहे. अमेरिकेतील नेवाडा येथील एका डेअरी फार्मवरील गायींमध्ये बर्ड फ्लूचा एक नवीन प्रकार आढळून आला आहे. यासंदर्भात आलेल्या अहवालानुसार AH5N1 नावाच्या या विषाणूचा प्रसार यापूर्वीही काही प्राण्यांमध्ये झाला होता. मात्र आता दुभत्या गायींना या विषाणूची बाधा झाल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. यापूर्वी 2023 मध्ये 16 राज्यातील हजारहून अधिक गायींमध्ये या विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे यावेळी या विषाणूचा फैलाव अधिक होऊ नये म्हणून हा सर्व भाग सील करण्यात आला आहे. एवढी काळजी घेण्यात आली असली तरी अनेक अन्न आणि पेयांमध्ये बर्ड फ्लूचा विषाणू आढळून आला आहे. (America)

अनेक भागात गायींच्या कच्चा दुधात हा विषाणू असल्याचे तपासाअंती आढळून आले आहे. यामुळे आरोग्य विभागात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात येल स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या डीन डॉ. मेगन रॅनी यांनी एक अहवाल सादर करत त्यात बर्ड फ्लूच्या नवीन विषाणूमुळे साथीच्या रोगाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यांनी ही भीती व्यक्त केली असतानाच अमेरिकेत H5N1 एव्हीयन इन्फ्लूएंझामुळे पहिल्या मानवी मृत्यूची नोंद केली आहे. यात ज्या महिलेचा मृत्यू झाला आहे ती महिला, अंगणातील कोंबडी आणि वन्य पक्ष्यांच्या संपर्कात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या मृत्यूनंतर बर्ड फ्लू विषाणूचा अभ्यास करणा-या संशोधकांनी या विषाणूच्या फैलावावर लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त केली आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास जगभर नव्या रोगाची महामारी पसरण्याचा धोकाही व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी 2024 या वर्षात आढळलेल्या बर्ड फ्लूच्या रुग्णांचा दाखला दिला आहे. (International News)

==============

हे देखील वाचा : Donald Trump : ऑर्डर टू डिपोर्ट

Narendra Modi : चर्चा फक्त JFK’s Forgotten Crisis पुस्तकाचीच

===============

2024 मध्ये अमेरिकेत 66 नागरिकांमध्ये बर्ड फ्लूच्या विषाणूंची लागण झाली होती. यात प्रामुख्यानं दुग्धजन्य आणि कुक्कुटपालन व्यवसाय करणा-या नागरिकांचा समावेश होता. या सर्वांमध्ये बर्ड फ्लूची सौम्य लक्षणे होती. मात्र आता अमेरिकेत हंगामी तापाच्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. अशातच बर्ड फ्लू चा फैलाव झाला तर त्याचा मानवी संसर्ग अधिक वेगानं होण्याची शक्यता आहे. बर्ड फ्लूची लागण झाल्यावर एकदम ताप वाढतो, खोकला आणि डोकेदुखी सुरु होते. शिवाय थकवा, स्नायू दुखी, घशाची खवखव अशी लक्षणे दिसून येतात. बर्ड फ्लूच्या फैलावाला रोखण्यासाठी आरोग्य विभागानं वारंवार हात धुण्याचा आणि मास्क घालण्याचा सल्ला पशूव्यवसाय करणा-या सर्व कामगारांना दिला आहे. तसेच ताप किंवा घसादुखी जाणवल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असेही सांगण्यात आले आहे. (America)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.