अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कधी कुठला निर्णय घेतील, याची कोणालाही खात्री देता येत नाही. व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेनंतर ट्रम्प यांनी कोलंबिया देशाच्या अध्यक्षांनाही इशारा दिला होता. कोलंबियामधूनही मोठ्या प्रमाणात ड्रग्ज अमेरिकेत दाखल होत असल्याचा ट्रम्प यांचा आरोप आहे. त्यामुळे कोलंबियामध्येही ट्रम्प यांनी अमेरिकेची सेना कधीही दाखल होईल, अशी धमकी दिली. मात्र कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच खुले आव्हान दिले. या आणि मला पकडा. मी इथेच तुमची वाट पाहत आहे, अशा शब्दात त्यांनी ट्रम्प यांना आव्हान केलेच, शिवाय मातृभूमीसाठी, मी पुन्हा शस्त्र उचलेन, असा इशाराही त्यांनी ट्रम्प यांना दिला. पेट्रो यांनी दिलेल्या या इशा-यानंतर काय जादू झाली, याची कल्पना नाही, मात्र आता ट्रम्प यांनी याच गुस्तावो पेट्रो यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केले आहे. त्यांच्या या आमंत्रणामुळे जगभरातील राजकीय तज्ञांच्या भुवया उचंवल्या आहेत. ( Colombia Tensions )

Colombia Tensions
कारण ट्रम्प आणि पेट्रो यांच्यातील वाद काही नवीन नाहीत. ट्रम्प यांनी पेट्रो यांना अनेकवेळा ड्रग्ज तस्करीबाबत इशारा दिला आहे. तसेच ‘कोकेन तस्कर’ आणि ‘आजारी माणूस’ म्हणत ट्रम्प यांनी पेट्रो यांना अनेकवेळा अपमानितही केले आहे. त्यामुळे ट्रम्प कोलंबियावरही व्हेनेझुएलासारखी कारवाई करुन पेट्रो यांना अटक करतील अशी अटकळ व्यक्त होत असतांनाच पेट्रो यांना व्हाईट हाईसमधून जेवणासाठी बोलवणे आल्यामुळे ट्रम्प यांचे विरोधक काय, पण चाहतेही बुचकळ्यात पडले आहेत.
व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांचे अमेरिकेने ज्या पद्धतीनं अपरण केले, त्याबाबत जगभरात संताप व्यक्त झाला. सोबतच अमेरिका असा दबाव अन्य कुठल्याही देशावर टाकेल, अशी भीतीही व्यक्त होऊ लागली आहे. व्हेनेझुएलानंतर ट्रम्प यांची पहिली नजर आहे ती कोलंबियावर. कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील छत्तीसचा आकडाही जगजाहीर आहे. त्यातच पेट्रो यांनी ट्रम्प यांना, माझ्या देशात येऊन मला अटक करुन दाखवाच, असे आव्हानही केले. ( Colombia Tensions )
मात्र या सर्वामध्ये ट्रम्प यांचे मन अचानक बदलले. पेट्रो यांनी आव्हान दिल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा केल्याची माहिती आहे. मादुरो यांची त्वरित सुटका करण्यात यावी यासाठी कोलंबियामध्ये एक रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये अध्यक्ष गुस्तावो पेट्रोही सामील झाले होते. याच रॅलीदरम्यान पेट्रो यांना ट्रम्प यांच्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर सुमारे तासभर चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले.
पेट्रो यांच्या माहितीनं अनेकांना धक्का बसला. पण हा धक्का कमी होता की काय, डोनाल्ड ट्रम्प यांनी गुस्तावो पेट्रो यांना व्हाईट हाऊसमध्येही आमंत्रित केल्याची माहिती पुढे आली आहे. एका रात्रीमध्ये असे काय झाले, ज्यातून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांच्यातील संबंधात एवढा मोठा युटर्न आला आहे, याची चर्चा सुरु झाली आहे. कारण पेट्रो यांना ट्रम्प हे वाढत्या ड्रग्ज व्यापाराबाबत जबाबदार मानतात. त्यासाठी ते त्यांना ड्रग्ज व्यापारी म्हणून संबोधित करतात.
त्याच पेट्रो यांना ट्रम्प यांनी ड्रग्ज तस्करी, व्हेनेझुएला आणि अन्य काही बाबत चर्चा करण्यासाठी व्हाईट हाऊसवर बोलावले आहे. ट्रम्प फक्त पेट्रो यांना बोलवूनच शांत बसले नाहीत, तर त्यांनी सोशल मिडियावर यासंदर्भात मेसेजही शेअर केला आहे. त्यानुसार, पेट्रोशी बोलणे हे माझ्यासाठी सन्मानाचे आहे. त्यांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे. ट्रम्पच्या या भूमिकेमुळे अनेक राजकीय तज्ञांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. काही राजकीय तज्ञांच्या मते या दोन्हीही नेत्यांनी आपल्या राजकीय फायद्यासाठी काही पावले उचलली आहेत. ( Colombia Tensions )
=======
हे देखील वाचा : Brooklyn’s Metropolitan Detention Center : याच नरकात आहेत, निकोलस मादुरो
=======
अमेरिका कोलंबियासाठी एक महत्त्वाचा भागीदार आहे. त्यांची सेना डाव्या विचारसरणीच्या गनिमी गटांशी आणि ड्रग्ज तस्करांशी लढत आहे. अमेरिकेने गेल्या २० वर्षांत कोलंबियाला जवळजवळ १४ अब्ज डॉलर्सची मदत दिली आहे. पण पेट्रे यांच्या धोरणावर ट्रम्प यांनी अनेकवेळा जाहीरपणे टीका केली आहे. हा देश अशा माणसाच्या हातात आहे ज्याला कोकेन तयार करायला आणि अमेरिकेत विकायला आवडते, अशा शब्दात ट्रम्प यांनी अनेकवेळा पेट्रो यांच्यावर टीका केली आहे. ( Colombia Tensions )
ट्रम्प यांनी दावा केला की, अध्यक्ष पेट्रो, कोकेन मिल आणि कारखाने चालवत आहेत. पण हे सर्व अमेरिका बंद करणार असून त्यासाठी कोलंबियाविरुद्ध मोहीम सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पण अचानक आपले धोरण ट्रम्प यांनी बदलून त्याच पेट्रो यांनी व्हाईट हाऊसमध्ये भेटीचे आमंत्रण दिले आहे. आता या आमंत्रणानुसार पेट्रो खरोखरच व्हाईट हाऊसमध्ये जातात का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
सई बने…
