सध्या उत्तर भारतात बर्फाची चादर पसरली आहे. संपूर्ण उत्तर भारत यामुळे गारठला असून सर्वत्र धुक्याची छाया आहे. काश्मिर, उत्तराखंड, हिमाचलप्रदेशमध्ये काही भागात तापमान शून्याच्या खाली गेले आहे. ही थंडी कोणाला सर्वात जास्त वाटत असेल तर त्यांच्यासाठी भारतीय हवामान खात्यानं एक गंभीर इशारा दिला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अहवालानुसार डिसेंबर महिन्यात पडलेली थंडी ही फक्त एका ट्रेलरसारखी होती. आता जानेवारी महिन्यात जोरदार बर्फवृष्टी होणार असून काही राज्यात असाच जोरदार पाऊसही पडणार आहे. (Cold Wave)
उत्तर भारतात हाडं गोठवणारी थंडी पडणार असून याचा सर्वाधिक फटका दिल्लीसह काश्मिरला बसणार आहे. गेल्या काही दिवसात दिल्ली मध्ये अचानक थंडी वाढली आहे. संपूर्ण उत्तर भारत या थंडीच्या फटक्यानं गारठून गेल्याचे दृष्य आहे. यामुळे अनेक राज्यात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तर काही राज्यात शाळांच्या वेळा या बदलल्या आहेत. डिसेंबर महिन्याअखेरीस पडलेली ही थंडी जानेवारी महिन्यात कमी होईल असा कयास होता. मात्र भारतीय हवामान खात्यानं जानेवारी महिन्यात थंडीचे प्रमाण अधिक वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. सध्या देशाच्या उत्तरेकडे मुसळधार बर्फवृष्टी होत आहे. तर दुसरीकडे मैदानी भागात बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढले आहे. (Latest Updates)
येथील सोसाट्याच्या वाऱ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. यामुळेच येत्या काही दिवसांत थंडी आणखी वाढू शकते, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. हवामान खात्याच्या अहवालानुसार जानेवारी ते मार्च महिन्यादरम्यान उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी आणि जोरदार पावसाचीही शक्यता आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. पाऊस एवढा जास्त असेल की त्यामुळे शेतक-यांची मोठी हानी होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार उत्तर-पश्चिम दिशेकडून वाहणाऱ्या बर्फाळ वाऱ्यांमुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात उत्तर भारतात थंडी वाढणार आहे. आठवडाभरात दोन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे पश्चिम हिमालयीन राज्यांमध्ये बर्फवृष्टी होणार असून त्याचा परिणाम संपूर्ण देशाच्या हवामानावर जाणवणार आहे. (Cold Wave)
हिमाचल प्रदेशातही पुढच्या आठवड्यात जोरदार पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय पंजाबसह अन्य 12 जिल्ह्यांमध्ये सलग पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पावसाचा फटका शेतक-यांना बसणार असून शेतक-यांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही आहे. डिसेंबरमध्ये महाराष्ट्राच्या काही भागातही पावसाच्या सरी पडल्या आहेत. त्यामुळे कांदा पिकाला त्याचा फटका बसला आहे. मात्र संपूर्ण जानेवारी महिन्यामध्येही असाच पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. हा पाऊस सरासरीपेक्षा जास्त असेल, असेही हवामान खात्यानं सांगितले आहे. यामुळे थंडीची लाट ही काही दिवस अधिक राहणार आहे. देशाच्या मैदानी भागातही 7 जानेवारीपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील काही भागात दाट धुके आणि थंडी कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. (Latest Updates)
====================
हे देखील वाचा :
Curd Benefits : हिवाळ्यामध्ये दही खाणे योग्य की अयोग्य? घ्या जाणून
Uttar Pradesh : महाकुंभमध्ये 12 ज्योतिलिंग !
====================
हिमालयीन भागात बर्फवृष्टी वाढणार असल्यामुळे 10 ते 16 जानेवारी दरम्यान किमान तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यताही हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. दिल्लीसह, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये याचा मोठा फटका बसणार आहे. हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील काही भागात तर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. यामुळे त्या भागातील तापमान अधिक कमी होणार असून त्याचा फटका उर्वरित भारताला बसणार आहे. यावर्षात मार्च महिन्यातच काही राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण वाढणार आहे. हा महिना शेतक-यांसाठी महत्त्वाचा असतो. तयार झालेल्या पिकांची कापणी आणि नव्या पिकासाठी तयारी चालू असते. अशातच पाऊस आला तर तयार झालेले पिक नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शेतक-यांनी हवामानाचा अंदाज घेऊन धान्याची साठवण करावी असे आवाहन हवामान खात्यानं केले आहे. (Cold Wave)
सई बने