जगात आपणच सर्वात शक्तिशाली आहोत, हे दाखवण्याची एकही संधी न सोडणा-या अमेरिकेची वास्तवता वेगळी आहे. गेल्या काही महिन्यापासून या देशातील नागरिक स्वतःसाठी खाजगी बंकर्स उभारत आहेत, हे सांगितले तर आश्चर्य वाटले. ज्यांची स्वतःची घरे आहेत, त्या नागरिकांनी आपल्या घराच्या भागात भूमिगत बंकर्स उभारायला सुरुवात केली आहे. आणि ज्या नागरिकांची स्वतःची घरे नाहीत, त्यांनी रेडीमेड बंकर्स विकत घेण्याची तयारी केली आहे. अमेरिकेमधील ऑनलाईन खरेदीमध्येही बंकर्स कुठे आणि किती मिळतील याचीच चौकशी जास्त होत आहे. सध्या जगभर युद्धाचे वातावरण आहे. रशिया आणि चीन या देशांनी अमेरिकेला धमकी दिली आहे. रशिया आणि युक्रेनच्या युद्धात अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी घातक क्षेपणास्त्रे चालवण्याची मुभा युक्रेनला दिली आहे. (America)
त्यानंतर रशियानं असा हल्ला झाला तर त्याचे परिणाम अमेरिकेलाही भोगावे लागतील अशी धमकी दिली आहे. सोबत अमेरिकेचा आणखी एक दुष्मन उत्तर कोरियाही अमेरिकेला धमकी देत आहे. तर मिडलइस्टमध्ये अमेरिकेचे किती दुष्मन आहेत, याची नोंदही नाही. या सर्व युद्धजन्य वातावणाचा परिणाम अमेरिकेतील जनतेवर होत आहे. भविष्यात आपल्यावर हल्ला झाल्यास त्यापासून बचाव कसा करायचा याची शोध ही मंडळी घेत आहे. बॉम्ब हल्ला झाला तर बचाव करता येईल, पण अणुबॉम्बने हल्ला केला तर त्यापासून आपला बचाव करण्यासाठी बंकर्स हा उपाय मानून अमेरिकेची जनता सध्या बंकर्सच्या मागे लागली आहे. जगात सर्वत्रच युद्धाचे ढग आहेत. या सर्वांमध्ये एक कॉमन प्रश्न आहे, तो म्हणजे, अणुयुद्ध होणार का? अर्थातच हा प्रश्न जेवढा सोप्पा वाटतो, तेवढं त्याचं उत्तर नाही. अणुयुद्ध झाल्यास मानवजात अस्तित्वात रहाणार नाही. आणि जे वाचतील ते मरण यावे यासाठी प्रार्थना करतील, असे तज्ञ सांगत आहेत. जपानवर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याच्या स्मृती आजही तेथील जनतेच्या मनावर आहेत. (International News)
अशा परिस्थितीत आजच्या घडीला एखाद्या देशावर अणुबॉम्ब टाकला तर काय होईल, याचा विचारही करता येणार नाही. करोडो नागरिक मृत्यूमुखी पडतील. जे वाचतील ते असंख्य जखमा अंगावर घेऊन फिरतील. मानवी जीवन उद्धवस्त होणार नाही, तर कल्पना करता येणार नाही, अशी आर्थिक हानी होईल, माणसाला खायला अन्न उरणार नाही. हा सगळा विचार करुन अमेरिकेमध्ये सध्या खाजगी बंकर्सची मागणी वाढली आहे. जगात सध्या जे युद्धाचे वातावरण आहे, त्यात रोज एखादा देश अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देत आहे. या सर्वात अमेरिकेवर हल्ला करण्याची धमकी अनेक देश देत आहेत. हा असा हल्ला खरोखरच अमेरिकेवर झाला तर काय होईल, या भीतीनं तेथील काही नागरिकांचा तणाव वाढला आहे. हे नागरिक आपल्या कुटुंबासाठी स्वतःच्या घराच्या आवारात भूमीगत बंकर्स खोदत आहेत. या बंकर्समध्ये ऑक्सीजनची व्यवस्था करण्यात येत आहे. अण्वस्त्र हल्ला झाला तर काही दिवस पूर्णपणे जमिनीखाली रहाण्यास कुठलिही अडचण येणार नाही, यासाठी हे भूमिगत बंकर्स सुसज्ज करण्यात येत आहेत. (America)
=====
हे देखील वाचा : पुढचा नंबर जॉर्डनचा
======
या बंकर्समध्ये खाद्य पदार्थांचा साठाही करण्यात येत आहे. तसेच पिण्याचे पाणी आणि आवश्यक अशा औषधांचा साठाही काही नागरिक करत आहेत. भविष्यात अमेरिकेवर एखादा तरी अण्वस्त हल्ला होणार असेच या नागरिकांचे ठाम मत आहे. याशिवाय अमेरिकेत खाजगी बंकर्स विकत घेणा-यांचीही संख्या वाढली आहे. एका अहवालानुसार, अमेरिकेतील जनतेच्या तणावातही वाढ झाली आहे. भविष्यात अण्वस्त्र हल्ला झाल्यास त्यापासून कसा बचाव करावा याची चिंता या मंडळींना पडली आहे. या सर्वात आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे, खाजगी बंकर्सची मागणी अमेरिकेत एवढी वाढली की, याबाबत तज्ञ मंडळी पुढे आली आहेत. अण्वस्त्र हल्ल्यापासून माणसाला कुठलेही बंकर्स वाचवू शकत नाहीत, असे या तज्ञांनी स्पष्ट केले आहे. सरकारी आपत्ती तज्ञांचे म्हणणे आहे की, बंकर आवश्यक नाहीत. फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीने आण्विक स्फोट झाल्यास त्यापासून वाचण्यासाठी काय करावे असे पत्रक जाहीर केले आहेत त्यात बंकर्सचा उल्लेख नसल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या बंकर्स निर्मितीमध्ये आणि खरेदीमध्ये करोडो डॉलर्स खर्च होत आहेत, आणि हे सगळे पैसे वाया जाणार आहेत, अशी शक्यता या तज्ञांनी व्यक्त केली आहे. (International News)
सई बने