आपला भारत देश कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. पण याच भारतात आज शेतकऱ्याला कावडीमोलाची किंमत दिली जात आहे. अनेकांनी शेतकऱ्याच्या नावाचे भांडवल करत आपली राजकीय पोळी भाजली. तर अनेकजण शेतकऱ्यालाच लुबाडुन मोठे झाले.
मात्र जेव्हा शेतकरी नेता होतो तेव्हा तो कोणाकोणाला आपला हिसका दाखवू शकतो याचा एक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे.
तर झालं असं की, सन १९७९ साली एका शेतकरी आजोबाचा बैल चोरी गेला म्हणून ते सायंकाळी ६ : ०० वाजता इटावाच्या उसरहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यास आले.
धोतर-कुर्ती घातलेले आजोबा पोलीस स्टेशनातील एका हवलदाराकडे तक्रार देण्यास गेले. तेव्हा त्या हवलदाराने त्यांना थांबण्यास सांगितले. थोडी वाट पाहून त्या शेतकरी बाबांनी हवलदाराला पुन्हा तक्रार लिहून घेण्याची विनंती केली. मात्र हवलदाराने काही ऐकले नाही.
थोड्या वेळाने हवालदार आला आणि बाहेर बसलेल्या त्या शेतकरी आजोबांना इन्स्पेक्टर साहेबांनी बोलावलं आहे. आतमध्ये चला अस म्हणू लागला. आता मध्ये गेल्यानंतर इन्स्पेक्टरने आपल्या पोलिसी ठेक्यात त्या शेतकरी आजोबांना ४-५ उलट-सुलट प्रश्न विचारले. आणि त्यांनाच दमदाटी करत तिथून त्या आजोबांना फटकारून लावले.
जेव्हा आजोबा पोलीस स्टेशन मधून बाहेर निघू लागले, तेव्हा तेथील एका हवालदाराने त्या बाबांना एक सल्ला दिला. तो म्हणाला की ” जर तुम्ही इन्स्पेक्टर साहेबांना चहा-पाण्याला थोडे पैसे देत असाल, तर ते तुमची तक्रार लिहून घेतील.”
मग काय त्या शेतकरी आजोबांनी आपली पाऊले माघारी वळवली. आणि इन्स्पेक्टर साहेबांना पुन्हा विनवणी करू लागला. मात्र विनवणी करून काहीच निष्पन्न न झाल्याने शेतकरी आजोबांनी काही रक्कम देण्यास मान्य केले. पुढे आजोबांनी मांडवली करत खिशातून ३५ रुपये काढले. आणि इन्स्पेक्टर साहेबांना तक्रार लिहिण्यास सांगितले.
पुढे इन्स्पेक्टर साहेबांनी त्या शेतकरी आजोबांची तक्रार लिहून घेतली. जेव्हा तक्रारीच्या कागदावर सही करण्याची वेळ आली, तेव्हा त्या आजोबांना सही करणार की अंगठा लावणार असे विचारण्यात आले, तेव्हा आजोबांनी सही करणार असे सांगितले.
पण सही करताना आजोबांनी अंगठा उठवायचा शाईचा पॅड मागून घेतला. त्यावेळी इन्स्पेक्टर साहेब विचारात पडले की, आजोबा सही करणार आहेत. तर मग त्यांनी शाईचा पॅड का मागून घेतला असेल?
मात्र पुढे इन्स्पेक्टर साहेबांनी तक्रारीचा तो कागद नाव आणि सही करण्यासाठी आजोबांकडे दिला तेव्हा आजोबांनी त्या कागदावर ‘चौधरी चरण सिंह’ (Choudhari Charan Singh) असे नाव लिहिले. आणि आपल्या कुर्त्याच्या खिशातून ‘पंतप्रधान, भारत सरकार’ असे नाव लिहिलेला शिक्का काढत त्या कागदावर मारला. आणि संपूर्ण पोलीस स्टेशनमध्ये खळबळ उडाली.
खळबळ उडण्याचं कारण एकच होत ते म्हणजे, ‘चौधरी चरण सिंह’ हे त्याकाळचे वास्तविक तत्कालीन पंतप्रधान होते. व ते अचानक पोलीस स्टेशनच्या कारभार तपासणीसाठी आले होते. मात्र या घटनेनंतर उसरहरचे संपूर्ण पोलिस स्टेशन निलंबित करण्यात आले होते.
तर असा होता एका शेतकरी आजोबांच्या वेशातल्या भारतीय पंतप्रधानांचा किस्सा. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो हा किस्सा आपण याआधी कधी ऐकला आहे का? हेही कमेंट करून सांगायला विसरू नका.
– निवास उद्धव गायकवाड