त्यावेळी ताडोबाच्या मोहर्ली रेंजवर बजरंग नावाच्या वाघाची एकहाती सत्ता होती ! बजरंगच्या आधी मोहर्लीवर बिग डॅडी वाघडोह आणि माधुरीचं राज्य होतं. त्यांच्या पोरी सोनम, लारा, मोना आणि गीता मोठ्या झाल्या…तसं सोनमने आपल्या आईला माधुरीलाच बफर झोनमध्ये ढकललं, त्यातच खली नावाच्या वाघाचा दबदबा वाढला होता, त्यामुळे माधुरीसोबत वाघडोहसुद्धा निघून गेला, मोहर्ली रेंजची गादी खाली झाली आणि गादीवर आला निस्ता धिप्पाड अंगाचा…डोळ्यात रग असलेला शक्तीशाली बजरंग… त्यावेळी बजरंगला नडायला कोणीच तयार नव्हता, इतका त्याचा दरारा होता. काही तरुण वाघांनी प्रयत्न केला, पण काही निभाव लागला नाही. त्याच्या भागात एकाचवेळी सहा सात वाघिणी असायच्या आणि त्या राणी असलेल्या वाघिणींकडे पाहण्याची इतर वाघांची काय मजाल… पण त्याचवेळी छोटा दडियाल नावाचा ऐन तारुण्यात असलेला गरम रक्ताचा वाघ मोहर्ली रेंजमध्ये आला होता. (Chota Matka)
त्यामुळे बजरंगला आपलं ठिकाण सोडाव लागलं आणि तो दुसरी जागा शोधायला निघाला… पण त्याचवेळी त्याची गाठ पडली… एका अशा वाघासोबत ज्याची सध्या इतकी दहशत आहे इतकी दहशत आहे की, भले भले तगडे वाघ त्याच्या आसपासदेखील फिरत नाहीत. ताडोबाच्या सर्वात प्रसिद्धी मटकासूर आणि छोटी ताराचा तो बछडा… छोटी तारानेच तयार केलेला पठ्ठ्या ! धडधाकट… अंगात बापाची ताकत आणि पंजात आईची घट्ट पकड… आईने शिकारीच्या वेळी शिकवलेली…शिकारला थेट फाडून टाकणारी… त्याचा एक भाऊ होता ताराचंद… पण इलेक्ट्रिक फेन्सला शॉक लागून तो मेला. भाऊ गेल्यामुळे हा बिचारा एकटा पडला. इथे तिथे भटकायला लागला… पण नंतर त्याने जो काय धाक बसवला, त्याला तोडच नाही. (Top Stories)
बजरंगची गाठ त्याच्याशी पडली. बजरंग पण काय साधासुधा वाघ नव्हता. अख्खा ताडोबा समृद्ध करण्याचं काम त्याने केलय. त्यात लढाईचा दांडगा अनुभव. पण आता आपल्याच मातीत अस्तित्व टिकवायचं म्हणजे लढायला लागणारच म्हणून तो तयार झाला. एक लढाईतला मातब्बर पठ्ठ्या तर दुसरा तरुण, रांगडा, वाघाच्या जातीला शोभणारा बजरंग आजपर्यंत एकही लढाई हरला नव्हता. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झालं. नुसत्या डरकाळ्या आणि एकमेकांवर पंजाने वार एक अस्तित्वासाठी लढतोय तर दुसरा साम्राज्य वाढवायला… पण बजरंग त्याच्यासमोर कमजोर पडू लागला. त्याच्या अंगावर त्या रांगड्या वाघाचे तीक्ष्ण वार पडत होते. बजरंगला भोवळ येऊ लागली होती आणि राजासारखा जगणारा बजरंग खाली कोसळला. त्याने अखेरचा एक मोठा श्वास घेतला आणि योद्धाला जे मरण अपेक्षित होतं, तेच त्याला मिळालं. पण बजरंगसारख्या बलाढ्य वाघाला एकाने मारलं अशी चर्चा सगळीकडेच पसरू लागली. आणि इथेच समोर आला ताडोबाचा नवा राजा ज्याचं नाव आहे छोटा मटका… आता नावात जरी छोटा असलं तरी तो इतका मोठा आहे की भल्या भल्ल्यांना धडकी भरते. याच ताडोबाचा CM छोटा मटकाची स्टोरी आपण ऐकणार आहोत. (Chota Matka)
आता छोटा मटकाबद्दल ऐकण्यापूर्वी आधी आपण त्याच्या आई-बापावर नजर टाकूया. छोटा मटकाचा बाप म्हणजे मटकासुर वाघ हा ताडोबाच्या वंशावळीतला नव्हता, तर तो ताडोबाच्या बाहेरून येऊन इथला सम्राट झाला आणि छोटा मटकाच्या आईची वंशावळ पाहायची झाली तर सुलतान नावाच्या वाघाचा एक बछडा होता, त्याचं नाव येडा अन्ना… या येडा अन्नाचं मेटिंग तारा नावाच्या वाघिणीशी झालं आणि या दोघांना जी मुलगी झाली तीच छोटा मटकाची आई म्हणजे छोटी तारा… छोटा मटकाचा जन्म २०१६ चा, बापाची वंशावळ माहिती नसली तरी बाप ताकदवर होता आणि आई तर ताडोबाच्या लढाऊ वाघांच्या वंशातली ! (Top Stories)
त्यामुळे छोटा मटकाच्या रक्तातच संघर्ष आणि लढाया होत्या. ‘The Lion King’ चित्रपटामधलं एक वाक्य आहे ‘King’s time as ruler rises & falls like the sun… माणसांच्या साम्राज्यात आणि प्राण्यांच्या साम्राज्यात हे अगदी सेमच आहे. राज्य स्थापना, त्याचा विस्तार आणि स्त्रीवर नियंत्रण यासाठी वाघांच्या लढाया सतत सुरूच असतात. त्यामुळे मटकाने लहानपणापासूनच आई बापाच्या सहवासात या गोष्टी पाहिल्या होत्या. जंगलांचे रस्ते त्याला पाठ झाले होते. त्याचा भाऊ होता ताराचंद… सुरुवातीला दोघे एकत्र रहायचे तर एकदा इलेक्ट्रिक फेन्सिंगचा शॉक लागून तो मरण पावला. सहसा वाघ एकत्र राहणं टाळतात. पण भाऊ गेल्याचं दुखं छोटा मटकाला सहन झालं नाही. त्यानंतर तो कित्येक महिने वणवण भटकत राहिला. गुरांच्या शिकारी करत आपली जागा शोधत… पण आपल्याला राज्यच स्थापन करायचं आहे तर कोणाशी तरी लढावच लागेल, हे त्याने हेरलं होतं.(Chota Matka)
अधूनमधून माया आणि इतर छोट्या वाघांना टक्कर देत त्याचा राज्याचा शोध सुरू होता.. त्यामुळे आता त्याने थेट मोगलीसोबत भिडायचं ठरवलं. २०२१च्या पावसाळयादरम्यान मोगली ताडोबाच्या नॉर्थ बफर एरियामध्ये होता. छोटा मटका इतकी वर्ष शिकार करून धष्टपुष्ट होऊन मोगलीसोबत दोन हात करायला गेला. दोघांची लढाई झाली पण मोगलीने मटकाला मात दिली. इथेच त्याच्या इंजरीचं एक वेगळं पर्व सुरू झालं. पण रिकव्हर होऊन निघून जायचं तर हा पुन्हा एकदा मोगलीसोबत भिडायला आला पण यावेळी तो पूर्ण ताकदीने आला होता. भाई मटकासूरचं रक्त आहे अंगात हार मानत नसतो… दोंघांची ताकद सेमच… पण यावेळी छोटा मटका जिंकायलाच आला होता. लढाई झाली आणि यावेळी मटकाने मोगलीला असं पछाडलं की परत तो कधीच नॉर्थ बफर झोनमध्ये आलाच नाही. आता ताडोबाच्या एका महत्त्वाच्या भागावर छोटा मटकाचा अंमल सुरू झाला. मोगलीच्या संपूर्ण राज्यासोबतच मटकाला तीन वाघिणी राण्या भेटल्या, त्या म्हणजे झरनी, बबली आणि भानुषखिंडी! (Top Stories)
छोटा मटकाची तरुण वयातली काही वर्ष रक्तरंजितच होती. लढाया आणि इंजरी, लढाया आणि इंजरी… अजूनही इंजरीने त्याची पाठ काही सोडली नाही. त्याचा चेहरा बापासारखाच.. निळे डोळे, रुंद जबडा आणि भेदक नजर आणि चेहऱ्यावर लढायांच्या जखमा… छोटा मटकाच्या अंगावर आणखी एक खूण आहे, ज्यामुळे तो सहज ओळखता येतो, ती म्हणजे त्याच्या वरच्या ओठांजवळ असलेली फट… आणि त्या फटीतून दिसणारा त्याचा शिकारीचा दात ! मोगलीला दूर सारल्यानंतर छोटा मटकाने ताडोबाच्या अलिझंजा, नवेगाव रामदेगी ते अगदी कोअरमध्ये काळाआंबापर्यंत राज्य वाढवलं. यानंतर वर सांगितल्याप्रमाणे तो बजरंगला भिडला आणि बजरंगला त्याने मारून टाकलं. पण या लढाईत तो पुन्हा जबर जखमी झाला होता. त्याच्या पायाला मोठी चिरा पडली होती. बजरंग गेल्याची बातमी देशभर पसरली होती. पण त्याच्यापेक्षा जास्त चर्चा होती, बजरंगला मारणाऱ्याची… तसा बजरंग काही व्हिलन नव्हता, पण तो KGF मधला सीन आहे ना… रॉकी गरुडाला मारतो आणि ती बातमी वेड्यासारखी पसरते, तसच काही यावेळी झालं होतं. आणि आता ताडोबाचा नवीन CM झाला होता छोटा मटका ! त्याची सगळीकडे चर्चा व्हायला लागली… इतकच काय तर भारतातला सर्वात शक्तीशाली वाघ, असं त्याला म्हटलं गेलं.
===============
हे देखील वाचा : Bihar : खोटं पोलीस स्टेशन १ वर्ष भरती आणि नंतर असं काही घडलं…
===============
छोटा मटकाच्या जखमी अवस्थेचा फायदा इतर वाघांनी घेण्याचा खूप प्रयत्न केला. असंख्य मारामाऱ्या करून थकलेल्या छोटा मटकाला पाहून त्याचं साम्राज्य बळकवायला सुरुवातीला “बाली” नावाच्या नवीन वाघाने आक्रमण करण सुरु केलं होतं.. त्याच्या बरोबर आणखी एक “वीरभद्र” नावाचा वाघ घुसखोरी करायचा प्रयत्न करत होता. पण त्यातच एका ब्रम्हा नावाच्या तरुण वाघाने हद्दच पार केली. आता कसं आहे छोटा मटकासोबत नडण म्हणजे एकतर ताडोबा कायमच सोडून जाण, दुसरं म्हणजे जबर जखमी होण आणि तिसरं म्हणजे मरण पत्करण ! त्याच्या ओपोनेंटसोबत याच तीन गोष्टी व्हायच्या. त्यात ब्रम्हा वाघाने आपली टेरीटरी वाढवायला आणि छोटा मटकाचीच राणी असलेली नयनतारा या वाघिणीला मिळवण्यासाठी तो मटकाच्या हद्दीत आला. नयनतारा ही मटकाचीच मुलगी… भानुषखिंडी या वाघिणीपासून झालेली… पण वाघांमध्ये नातेसंबंध वगैरे सगळं माफ ! त्यात ब्रम्हा आणि वीरभद्र हे दोन्ही वाघ नयनतारासाठी प्रयत्न करत होते. मग काय… डॉनला खबर कळली. तो आला. ब्रम्हासोबत मोठी फाईट झाली. यात ब्रम्हा मारला गेला तर वीरभद्र पळून गेला. पण छोटा मटका पुन्हा एकदा जबर जखमी झाला. त्याचे अनेक व्हिडिओदेखील व्हायरल झाले होते.(Chota Matka)
सहसा वाघ आपल्या जखमा चाटून चाटून बऱ्या करतात. मटकासुद्धा तसच करायचा. पण यावेळी जखम मोठी होती. मटका लंगडत होता आणि यामुळे FOREST वाल्यांना त्याची ट्रीटमेंट केली. पण आता तो हळू हळू ठीक होतोय… मटकाचं आयुष्य फुल फिल्मी स्टाईलचं आहे. हिरो १० वेळा जखमी होतो पण मात काही खात नाही… मोठमोठे वाघ त्याने मारले. कित्येक वाघ पळवून लावले. लढाया केल्या आणि अंगावर घाव घेऊन एक राजा जसा जगतो, तसाच तो जगतोय. ताडोबावर राज करतोय. आणि म्हणूनच ताडोबाचा CM छोटा मटकाची इतकी दहशत आहे. (Top Stories)
तसं ताडोबामध्ये वाघांची संख्या सध्या शंभरीवरच आहे. ना कमी ना जास्त… पण वाघांचे वाढते टेरीटोरिअल संघर्ष… त्यात माणसांसोबत असणारे संघर्ष… विकास आणि कमी होत जाणारे जंगल यामुळे ताडोबातल्या वाघांवर नक्कीच परिणाम होतोय एवढ नक्की… ताडोबाच्या इतिहासात वाघडोह, नामदेव, गब्बर, मटकासुर, बजरंग, मोगली यांची नाव घेतली जातात, पण एक नाव नेहमीच top वर राहिल, ते म्हणजे छोटा मटका ! ताडोबाच्या साम्राज्याचा मुकूट नेहमीच काटेरी राहिला आहे. ‘ताडोबा’ची युद्धभूमी वेगळी आहे. इथे आपलं राज्य टिकवण्यासाठी टोकाची स्पर्धा होतच असते आणि सध्या या किंग्डम किंग छोटा मटका आहे.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics