एकेकाळी जगात सर्वाधिक लोकसंख्या वाढ असलेला देश म्हणून ज्या चीनची ओळख होती, त्या चीनची लोकसंख्या झपाट्यानं कमी होत आहे. चीन सरकारने १९८० मध्ये एक मूल हे धोरण लागू केले. लोकसंख्या वाढीचा दर शून्यावर आणणे हे उद्दिष्ट ठेऊन सरकारनं लग्न केलेल्या जोडप्यांवर एक मुलाला जन्म देण्याचे बंधन ठेवले. लोकसंख्येच्या वाढीसाठी लागू केलेला हा नियम फायदेशीर ठरला. चीनची लोकसंख्या ३० वर्षापर्यंत नियंत्रणात आली. मात्र आता या नियमाचे दुष्परिणाम चीनच्या जनजीवनावर दिसत आहेत.
कारण झपाट्यानं लोकसंख्या खाली जाणारा देश म्हणून चीनचा उल्लेख करण्यात येत आहे. या देशातील तरुण पिढी ही लग्न करण्यासाठी उत्सुक नाही. कुटुंबापासून दूरावलेली चीनी तरुण पिढी आता विवाह करण्यासाठी नकार देत आहेच पण ज्यांचा विवाह झाला आहे, त्यांना मुलांना जन्म द्यायचा नाही आहे. यामुळे चीनमध्ये मोठी सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. येथील अनेक गावांमध्ये वय वर्ष ७० च्या पुढील नागरिकांची संख्या आहे. शहरी भागात तरुण वर्ग रहात असून हे तरुण आपले एकाकीपण दूर करण्यासाठी घरात प्राणी पाळत आहेत. चीनच्या शहरी भागामध्ये ११६ दशलक्षाहून अधिक मांजर आणि कुत्रा यांना घरात पाळण्यात येत असल्याची माहिती आहे. (Animal Marriage)
आता याच पाळीव कुत्र्यांच्या आणि मांजरीच्या लग्नासाठी हे तरुण लाखो रुपये खर्च करीत आहेत. चीनच्या शहरामधील हॉलमध्ये पाळीव प्राण्यांचे होणारे विवाह हे नित्याचेच झाले आहेत. मात्र त्यात सहभागी होणारे तरुण स्वतःच्या लग्नापासून चार हात दूर रहात आहेत. चीनमधील तज्ञांच्या मते सरकारी नियमांचा अतिरेक आणि कामामधील स्पर्धा, तणाव यामुळे ही परिस्थिती आली आहे. याबाबत सरकारी पातळीवरुनही चिंता व्यक्त होत असून आता तरुणांनी लग्न करावे यासाठी चीन सरकार विशेष सवलती जाहीर करीत आहे.
चीनमध्ये पाळीव प्राण्यांच्या लग्नाचा ट्रेंड जोरात सुरू आहे. हे विवाह सोहळे एखाद्या व्यक्तिच्या विवाहासारखे भव्य होत आहेत. चीनमध्ये तरुणवर्ग बहुतांश शहरांमध्ये कुटुंबापासून एकटा रहात आहे. हा एकाकीपणा दूर करण्यासाठी ते तरुण घरात मांजर, कुत्रा यासारखे प्राणी पाळत आहेत. याच पाळीव प्राण्यांचे विवाह चीनमध्ये लोकप्रिय होत आहेत. या पाळीव प्राण्यांच्या विवाहासाठी विविध थीमही असून त्यासाठी अनेक वेबसाईट येथे आहेत. सध्या ज्या चीनमध्ये मानवी विवाह करण्यासाठी सरकारी पातळीवरुन योजना आणि प्रोत्साहन देण्यात येत आहे, तिथे तरुण या योजनांना वगळून आपल्या पाळीव प्राण्यांच्या विवाहात आनंद मानत आहेत. (Animal Marriage)
पाळीव प्राण्यांच्या या विवाह समारंभात लाखो रुपयांचा खर्च करण्यात येतो. त्यासाठी व्यावसायिक छायाचित्रकारांची नियुक्ती करण्यात येते. लग्नातील कार्यक्रमाची पुस्तिका तयार केली जाते. या प्राण्यांच्या लग्नासाठी खास कस्टम-मेड केक तयार करुन घेण्यात येत आहेत. त्यासाठी शांघायमध्ये अनेक बेक-या तयार झाल्या असून त्या फक्त पेट केकचेच काम करतात. चीनमधील पाळीव प्राण्यांवरील खर्च ३.२% ने वाढून २७९.३ अब्ज युआन होण्याची अपेक्षा आहे.
एकीकडे चीन सरकार चीनमधील घटत्या लोकसंख्येमुळे चिंतेत आहे. केंद्र आणि राज्य सरकार विवाह संस्कृतीला चालना देण्यासाठी विविध योजना राबवत आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत चीनचे तरुण आपल्या कुत्र्या आणि मांजरांच्या लग्नावर लाखोंचा खर्च करीत आहेत. अन्य देशांवर आक्रमक नजर ठेवणा-या चीनमधील हे विदारक चित्र आहे. (Animal Marriage)
============================
हे देखील वाचा : जपानमुळे व्हेल माशाच्या अस्तित्वावरच संकट
============================
चीनच्या नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये चीनची लोकसंख्या १.४११८ अब्ज होती, जी २०२१ च्या तुलनेत ८५००००कमी झाली आहे. गेल्या काही वर्षापासून चीनमधील जन्मदर सातत्यानं कमी होत आहे. आता हा जन्मदर नीचांकी पातळीवर पोहचला आहे. कोविड-१९ साथीच्या आजारामुळे मृत्यूच्या संख्येत वाढ झाल्यामुळे चीनची एकूण लोकसंख्या कमी झाली आहे. कोविडच्या साथीमुळेही येथील तरुणांचे समाजस्वास्थ कमकुवत झाल्याची पाहणी आहे. त्यांनी कुटुंबापेक्षा एकटे रहाणे पसंद केले आहे.
त्यातच चीनमध्ये राहणीमानाच्या खर्चात झालेली प्रचंड वाढ हेही लोकसंख्या कमी होण्याचे प्रमुख कारण सांगितले जात आहे. याशिवाय चीनमधील अनेक कारखाने बंद पडले आहेत. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना लग्नापेक्षा स्वतःची आर्थिक स्थिती भक्कम करायची आहे. यामुळे चीन एका वेगळ्या सामाजिक प्रश्नाच्या जाळ्यात अडकला आहे. (Animal Marriage)
सई बने