Home » ‘कैलास-मानसरोवर’ यात्रेसाठी चीनची मनमानी 

‘कैलास-मानसरोवर’ यात्रेसाठी चीनची मनमानी 

by Team Gajawaja
0 comment
China Arbitrariness
Share

समस्त भारतीयांसाठी कैलास मानसरोवर यात्रा हे परमोच्च स्थान आहे. कैलास पर्वतावर प्रत्यक्ष भगवान शंकर यांचे निवासस्थान आहे.  कैलासपती म्हणूनही भगवान शंकराचा उल्लेख करण्यात येतो. या कैलास पर्वताला बघण्यासाठी आणि परिक्रमा करावी असे प्रत्येक शिवभक्ताला वाटत असते. मात्र ही यात्रा सहजसोप्पी नाही. यासाठी आर्थिक, शारीरिक आणि मानसिक स्थितीही खंबीर असावी लागते. आता तीन वर्षानंतर ही कैलास मानसरोवर यात्रा होणार आहे आणि यावेळी शिवभक्तांना यात्रेसाठी दामदुप्पट खर्च होणार आहे. या यात्रेसाठी भारताकडून नाव नोंदणी करण्यात येत असून त्याला या वाढलेल्या खर्चाचा फटका बसत आहे. चीन सरकारने कैलास-मानसरोवर यात्रेचा खर्च वाढवला आहेच शिवाय अनेक नियम बदलून नवे अतिशय कडक नियम लागू केले आहेत. भारतीय नागरिकांना आता कैलास-मानसरोवरला जाण्यासाठी किमान 1.85 लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळेच भगवान शंकराच्या निवासस्थानाला बघण्याची इच्छा असणा-या सर्वसामान्य शंकर भक्तांची निराशा झाली आहे. (China Arbitrariness)

कैलास मानसरोवर यात्रा ही प्रत्येक भारतीयांचे स्वप्न आहे. गेले तीन वर्ष चीनबरोबर ताणल्या गेलेल्या संबंधामुळे आणि कोरोनामुळे ही यात्रा बंद होती. आता ही यात्रा यावर्षी जाहीर झाली असली तरी चीननं आपली हेकेखोर वृत्ती दाखवत यात्रेची शुल्क मनमानी पद्धतीनं वाढवलं आहे.  सध्या कैलास-मानसरोवर यात्रेसाठी चीनने व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे. मात्र, त्याचे नियम अतिशय कडक केले आहेत. अनेक प्रकारच्या प्रवासाचे शुल्कही जवळपास दुप्पट केले आहे. भारतीय नागरिकांना प्रवासासाठी किमान 1.85 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. याशिवाय यात्रेकरूनी नेपाळमधील एखादा मदतनीस किंवा गाईड आपल्या मदतीसाठी सोबत ठेवला तर 300 डॉलर्स म्हणजेच 24 हजार रुपये जादा पैसे द्यावे लागणार आहेत.  या शुल्काला ‘ग्रास डॅमेजिंग फी’ असे नाव देण्यात आले आहे. त्यामागे चीनचा असा युक्तिवाद आहे की प्रवासादरम्यान, कैलास पर्वताभोवती गवत खराब झाले आहे, ज्याची भरपाई प्रवाशांकडूनच घेण्यात येत आहे. त्यापोटी हे पैसे घेण्यात येतील. (China Arbitrariness) 

परराष्ट्र मंत्रालयातर्फे जून ते सप्टेंबर या कालावधीत कैलास मानसरोवर यात्रा आयोजित करण्यात येते. तीन वर्षानंतर होणा-या या यात्रेसाठी चीनने काही नवीन नियम जोडले आहेत. ज्यामुळे प्रवाशांना अधिक कठीण प्रक्रियेला तोंड द्यावे लागणार आहे. आता प्रत्येक प्रवाशाला त्याची खास ओळख काठमांडू बेसवरच करून घ्यावी लागणार आहे. यासाठी बोटांचे ठसे आणि बुबुळांचे स्कॅनिंग केले जाणार आहे. परदेशी यात्रेकरूंना, विशेषत: भारतीयांच्या प्रवेशावर मर्यादा घालण्यासाठी कठोर नियम करण्यात आल्याचे नेपाळी टूर ऑपरेटर्सचे म्हणणे आहे.  याचा फटका भारतीयांसोबत नेपाळी टूर ऑपरेर्टसनाही बसणार आहे. नेपाळी टूर ऑपरेटर्ससाठी कैलास मानसरोवर यात्रा हा मोठा व्यवसाय आहे. नवीन नियम आणि वाढीव शुल्कांसह, टूर ऑपरेटर आता रोड ट्रिपसाठी प्रति प्रवासी किमान 1.85 लाख रुपये आकारत आहेत.  हे पैसे 2019 मध्ये रोड ट्रिप पॅकेजसाठी 90,000 रुपये होते. यावर्षीच्या यात्रेसाठी 1 मेपासून नोंदणी सुरू झाली आहे. मात्र या वाढीव शुल्कामुळे पर्यटकांनी या यात्रेकडे पाठ फिरवल्याची माहिती आहे. त्यामुळे चिंतीत झालेले नेपाळी टूर ऑपरेटर हे नियम शिथिल करण्याची मागणी करत आहेत. नेपाळच्या तीन प्रमुख टूर ऑपरेटर्सनी चीनचे राजदूत चेन सॉन्ग यांना निवेदन सादर करून नवीन नियम मागे घेण्याची मागणी केली आहे. (China Arbitrariness)

या शुल्कासोबत आणखी एक नियम यात्रेकरुंसाठी डोकेदुखी ठरणार आहे.  तो म्हणजे, व्हिसाबाबतचा नियम. आता व्हिसा घेण्यासाठी यात्रेकरूंना प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागणार आहे. ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. म्हणजेच, प्रवाशाला आधी काही दिवस चिनी दूतावासाकडे जावे लागणार आहे. त्यानंतर काठमांडू किंवा अन्य बेस कॅम्प येथे बायोमेट्रिक ओळख प्रक्रियेतून जावे लागेल. या सर्वात यात्रेकरुंचा वेळ नाहक वाया जाणार आहे. याशिवाय आता व्हिसा मिळवण्यासाठी किमान 5 जणांचा ग्रुप असणे आवश्यक आहे. यापैकी चार लोकांना व्हिसासाठी अनिवार्यपणे स्वत: पोहोचावे लागणार आहे. भारतानंही आणि नेपाळकडूनही या नियमांवर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. याबरोबर तिबेटमध्ये प्रवेश करणार्‍या नेपाळी कामगारांना 300 डॉलर ‘ग्रास डॅमेजिंग फी’ म्हणून भरावे लागतील. हा  खर्च यात्रेकरूलाच सोसावा लागणार आहे. कारण, एवढ्या मोठ्या यात्रेत नेपाळी  कामगार, मार्गदर्शक, मदतनीस, कुली, स्वयंपाकी आदींची मदत घ्यावीच लागते.  यात्रेकरुंना जर कोणी मदतनीस सोबत ठेवायचा असेल तर 15 दिवसांसाठी 13,000 रु. प्रवासाचे शुल्कही घेतले जाणार आहे.  हे शुल्क पूर्वी फक्त 4,200 रुपये होते.  यावर्षी हा दौरा करणाऱ्या नेपाळी कंपन्यांना चीन सरकारकडे $60,000 जमा करावे लागणार आहेत.  पण यात मुख्य अडचण अशी आहे की, नेपाळी ट्रॅव्हल एजन्सींना परदेशी बँकांमध्ये पैसे जमा करण्याची परवानगी नाही. अशा स्थितीत हे शुल्क कसे हस्तांतरित करायचे, हा नियमही स्पष्ट केलेला नाही. (China Arbitrariness)

========

हे देखील वाचा : भगवान शंकराचे ‘हे’ अनोखे समुद्री मंदिर…

=======

कैलास यात्रा 3 वेगवेगळ्या महामार्गांनी केली जाते. पहिला- लिपुलेख पास (उत्तराखंड), दुसरा- नाथू पास (सिक्कीम) आणि तिसरा- काठमांडू. या तीन मार्गांना कमीत कमी 14  आणि जास्तीत जास्त 21 दिवस लागतात.  2019 मध्ये, 31,000 भारतीय या कैलास मानससरोवर यात्रेला गेले होते. मात्र तीन वर्ष ही यात्रा झालेली नाही. त्यामुळे भाविकांची संख्या वाढेल अशी आशा होती.  पण चीनच्या या मनमानीपणामुळे भाविकांना मोठा फटका बसला आहे. भारत आणि चीन सीमेवर असलेले तणावाचे वातावरण आणि कोरोनाचा उद्रेक यामुळे कैलास-मानसरोवर यात्रेवर बंदी घालण्यात आली होती. मात्र,  गोव्यात झालेल्या SCO च्या शिखर परिषदेनंतर चीनने आता कैलास-मानसरोवर यात्रेसाठी व्हिसा देण्यास सुरुवात केली आहे. पण त्यातही वाढीव शुल्क आकारुन खोडा घालण्याचा प्रयत्न चालू केला आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.