चीन आणि तैवानमध्ये गेल्या काही महिन्यापासून तणाव अधिक वाढला आहे. चीन, तैवानला आपलाच प्रदेश मानत आहे. तर तैवान स्वतःला स्वतंत्र देश मानत आहे. पण असे असले तरी चीन आता हळूहळू तैवानभोवती आपले पाश घट्ट करीत आहेत. तैवानच्या सभोवताली असलेल्या समुद्रामध्ये चिनी युद्धनौकांचा वावर वाढला असून त्यावर मोठ्या संख्येनं सैनिकांनाही तैनात केले आहे. त्यातच आता चिनी सैन्याने तैवानभोवती व्यापक संयुक्त लष्करी सराव करण्याची घोषणा केली आहे. ‘जस्टिस मिशन २०२५’ असे या सरावाला नाव देण्यात आले असून हा सराव तैवान सामुद्रधुनी तसेच बेटाच्या उत्तर, नैऋत्य, आग्नेय आणि पूर्वेला होणार आहे. चिनी लष्करी नेतृत्वाने या सरावांचे वर्णन फुटीरतावादी शक्तींविरुद्ध आणि “बाह्य हस्तक्षेपा” विरुद्ध एक मजबूत संदेश असल्याचे केले आहे. या सर्वात रशियानंही तैवानला चीनचा प्रदेश असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे चीन कधीही तैवानवर आक्रमण करेल अशी परिस्थिती आहे. या सर्वात तैवानमधील कंपनी टीएसएमसी चर्चेत आली आहे. ही सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जगातील सर्वात प्रगत चिप्सची एकमेव उत्पादक आहे. तैवानच्या या कंपनीनं अमेरिकेलाही टक्कर दिली आहे. अमेरिकेवर मात करण्यासाठी चीनला या कंपनीची गरज आहे, त्यामुळेच चीन तैवानला काबिज करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती आहे.
हे देखील वाचा
Japan VS China : जपानवर चीनची दादागिरी !
जगात सर्वत्र नव्या वर्षाचे स्वागत कशा पद्धतीनं करायचे याची चर्चा असतांना चीनमध्ये मात्र वेगळंच षडयंत्र रचलं जात आहे. चीन, तैवानवर आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी युद्धाची तयारी करत आहे. नव्या वर्षात चीन तैवानला आपल्यात सामावून घेण्यासाठी उत्सुक आहे. यासाठी बीजिंगमधून लष्करी कारवाया तीव्र करण्यात आल्या आहेत. तैवानच्या समुद्रामध्ये चिनी युद्धनौकांचा वावर वाढला आहे. आता चीन या वर्षाची अखेर होतांना ‘जस्टिस मिशन २०२५’ राबवत आहे. तैवानभोवती हवाई दल, नौदल आणि रॉकेट फोर्सेसचा समावेश असलेला व्यापक संयुक्त लष्करी सराव सुरु झाला आहे. हा सराव म्हणजे चीनकडून तैवानच्या प्रशासनाला देण्यात येणारी आखरी संधी असल्याचे सांगितले जात आहे. वास्तविक चीन आणि तैवान यांच्यामधील तणाव हा १९४९ पासून आहे. चीनच्या आग्नेय किना-यावरील तैवान १९४९ मध्ये वेगळे झाले. तेव्हापासूनच चीनचे सरकार आपला प्रदेश असाच उल्लेख तैवानचा करत आहे. मात्र तैवाननं चीनचे वर्चस्व कायम नाकारले आहे. तैवानला आपल्या देशाच्या क्षेत्रात जोडून घेण्यासाठी चीननं आतापर्यंत अनेक प्रयत्न केले, पण तैवाननं हे सर्व प्रयत्न तोडून आपली प्रगती साधली आहे. या सर्वात तैवाननं तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात केलेली प्रगती उल्लेखनीय आहे.

या प्रगतीमध्ये तैवाननं चीन काय पण अमेरिकेलाही मागे टाकले आहे. त्यातच सेमीकंडक्टर बनवण्यात तैवानच्या कंपनीचे वर्चस्व आहे. तैवानची सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ही जगातील सर्वात प्रगत चिप्स बनवणारी कंपनी आहे. जगातील ९०% पेक्षा जास्त “सुपर-अॅडव्हान्स्ड” चिप्स तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये तयार केल्या जातात. या चिप्स कृत्रिम बुद्धिमत्ता, सुपरकॉम्प्युटर, हायपरसोनिक क्षेपणास्त्रे आणि अत्याधुनिक लढाऊ विमानांमध्ये वापरल्या जातात. या कंपनीमुळेच आता चीन तैवानवर आपले वर्चस्व प्रस्थापित करु पहात आहे. ही सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी म्हणजे, तैवानची सिलिकॉन व्हॅली असल्याचा उल्लेख करण्यात येतो. गंमत म्हणजे, चीनमध्ये तैवानमधील वस्तूंना बंदी असली तरी सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये तयार करण्यात आलेल्या चीप्स मात्र तिथे चालतात. चीनच्या बहुतेक मशीन्स आणि गॅझेट्स या चिप्सवर चालतात. त्यामुळे तैवानवर आपण हल्ला केला तर प्रथम या कंपनीमधील उत्पादन थांबवण्यात येईल, आणि आहे ते उत्पादन नष्ट कऱण्यात येईल, असी भीती चीनच्या प्रशासकांना वाटत आहे. असे झाल्यास, चीनची अवघी अर्थव्यवस्था कोसळण्याची भीती आहे. ही पार्श्वभूमी पाहता, चीन तैवानच्या भोवती जो लष्करी सराव करत आहे, तो फक्त तैवानवर दबाव टाकण्यासाठी होत असल्याचेही सांगितले जात आहे.
हे देखील वाचा
China VS Japan : तैवानवरुन चीन जपान युद्धाच्या उंबरठ्यावर !
या लष्करी सरावासाठी चीनने तैवानभोवती पाच झोन तयार केले आहेत त्यात समुद्र आणि हवाई मार्ग पूर्णपणे व्यापून टाकले आहेत. लाईव्ह-फायर ड्रिल्स, म्हणजेच खऱ्या दारूगोळ्यासह सराव, तेथे सध्या होत आहे. यातून चीन, तैवानला त्याच्या लष्करी सामर्थ्याचे बळ दाखवत आहे. या सर्वात तैवानची बाजूही भक्कम झाली आहे. कारण अमेरिकेने तैवानला अंदाजे ११.१ अब्ज डॉलर्सचे पॅकेज दिले आहे. या पॅकेजमध्ये HIMARS रॉकेट सिस्टीम, ATACMS क्षेपणास्त्रे, जॅव्हलिन आणि हॉवित्झर, ड्रोन तंत्रज्ञान आदी शस्त्रसामुग्री देण्यात आली आहे. या सर्वांबाबत चीननं नाराजी व्यक्त करुन आपला युद्धसराव सुरु केला आहे. आता या युद्धसरावाच्या आड चीन तैवानवर आक्रमण करणार का, हे पुढच्या काही दिवसात उघड होणार आहे.
