Home » साजिद मीरचा चीनला कळवळा…

साजिद मीरचा चीनला कळवळा…

by Team Gajawaja
0 comment
Sajid Mir Terrorist
Share

‘काहीतरी खूप चुकीचे होत आहे’,  भारत सरकारच्या या कठोर आणि चपखल वक्तव्याची सध्या चर्चा होत आहे. हे बोल ज्याला लागले आहेत, त्याला त्याची दाहकता जाणवली आहे. हे वाक्य भारत सरकारतर्फे संयुक्त राष्ट्राच्या सभेत उच्चारण्यात आलं आहे. ते ज्या देशाला उद्देशून बोलण्यात आलं आहे, तो देश आहे, चीन. सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौ-यावर आहेत. महासत्ता असलेल्या अमेरिकेत नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी रेडकार्पेट टाकण्यात आले आहे. मोदी यांचे होणारे हे शाही स्वागत पाहून चीन आणि त्यापाठोपाठ पाकिस्तानचा त्रागा होत आहे. भारताचा वापर अमेरिका स्वार्थासाठी करत असल्याची ओरडही चीननं केली. पण त्यानेही काहीही फरक पडला नाही, हे पाहून मग चीननं असं पाऊल उचललं की, हा देश नक्की किती नकारात्मक मानसिकतेचा आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.   पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौ-यावर चिडलेल्या चीननं 26/11 च्या मुंबई हल्ल्याला जबाबदार असलेला दहशतवादी साजिद मीर (Sajid Mir Terrorist) याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. चीनच्या या भूमिकेवर भारतानं कडक भूमिका घेतली आहे. चीन दहशतवाद्यांना पाठिंबा देत, हे चुकीचे असल्याचे स्पष्ट वक्त्वव्य केले आहे. मात्र याबरोबरच चीनला दहशतवादी साजिद मीर याचा एवढा कळवळा का आला? हे जाणून घेणंही महत्त्वाचं आहे. (Sajid Mir Terrorist)

26/11 च्या मुंबई हल्ल्याला कोणताही भारतीय विसरु शकणार नाही. या हल्ल्याला जबाबदार असलेला लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी साजिद मीर (Sajid Mir Terrorist) त्याची मायभूमी असलेल्या पाकिस्तानमध्ये आहे. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या हल्ल्यात साजिद मीर पाकिस्तानातून दहशतवाद्यांना सूचना देत होता. या दहशतवाद्याला जागतिक दहशतवादी असा शिक्का मारला जावा ही भारताची भूमिका आहे. मात्र या भारताच्या भूमिकेला चीननं विरोध केला आहे. चीननं संयुक्त राष्ट्रसंघात यासंदर्भात मांडलेल्या प्रस्तावाला विरोध करत, पुन्हा आपली दुटप्पी भूमिका पुढे केली आहे. अर्थात चीनच्या या भूमिकेवर भारतानं आपली बाजू लगेच स्पष्ट केली आहे. जगात दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी तयार करण्यात आलेल्या संरचनेत काहीतरी चुकीचे घडत आहे, असे मानण्यास आपल्याकडे काही ठोस कारणे आहेत, असे स्पष्ट करत  चीननं सावध व्हावं, असा इशाराही भारतानं दिला आहे. भारतानं यूएनमध्ये मांडलेला हा प्रस्ताव मंजूर झाल्यास, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या नियम 1267 नुसार, अल-कायदाच्या साजिद मीर (Sajid Mir Terrorist) या दहशतवाद्यावर जागतिक स्तरावर बंदी घातली जाईल. यामुळे साजिद कायदेशीर प्रवास, व्यवहार आणि कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर मदतीपासून वंचित होईल. पण साजिदवर येणारी ही बंधने चीनला मान्य नाहीत. एरवी आपल्या देशात मुस्लिमांवर अनेक बंधने घालणा-या चीननं साजिद मीरला (Sajid Mir Terrorist) पाठिंबा दिला आहे. यामागेही चीनचा वैयक्तिक स्वार्थ दडला आहे.  

पाकिस्तानी दहशतवाद्याला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात चीनने अडथळा आणण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येही चीनने साजिदला (Sajid Mir Terrorist) जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला स्थगिती दिली होती. पाकिस्तानी दहशतवादी मौलाना मसूद अझहरचा भाऊ अबुल रऊफ असगर उर्फ ​​अब्दुल रऊफ अझहरचा संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्यासाठी अमेरिका आणि भारताने आणलेल्या प्रस्तावालाही चीनने गेल्या वर्षी विरोध केला होता. तसेच लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईदचा मुलगा तलहा सईद याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्तावही चीनने रोखला होता. एफबीआयच्या माहिती नुसार दहशतवादी साजिद मीर हा मूळचा पाकिस्तानचाच आहे. त्याला इब्राहिम, वासी, खालिद, वाशीभाई, भाई अली, मुसा भाई, वाशी इब्राहिम, साजिद माजीद आणि इब्राहिम शाह या नावांनीही ओळखले जाते. त्याचा जन्म पाकिस्तानातील लाहोर येथे झाला असून साजिद हिंदी, इंग्रजी, उर्दू आणि अरबी भाषा उत्तम बोलू शकतो. साजिद मीरवर (Sajid Mir Terrorist) अमेरिकेने $5 दशलक्ष म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 41 कोटी रुपये बक्षीस ठेवले आहे. 

अमेरिकन गुप्तचर संस्था एफबीआयच्या म्हणण्यानुसार, दहशतवादी साजिद मीर 2001 पासून लष्कर-ए-तैयबासाठी सक्रिय होता. त्याने लष्कराच्या सहकार्याने अनेक दहशतवादी हल्ल्यांची योजना अंमलात आणल्या आहेत. 21 एप्रिल 2011 रोजी, मीरला युनायटेड स्टेट्स जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवले. त्याच्यावर विदेशी सरकारी मालमत्ता नष्ट करण्याचा कट, दहशतवाद्यांना मदत करणे, अमेरिकेबाहेरील नागरिकाची हत्या आणि सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. अमेरिकेने 22 एप्रिल 2011 रोजी मीरविरोधात अटक वॉरंट जारी केले होते.

========

हे देखील वाचा : तालिबान आणि बुद्ध मुर्ती

========

ऑक्टोबर 2022 मध्ये मुंबईत झालेल्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताने दहशतवादी साजिद मीरचा (Sajid Mir Terrorist) ऑडिओ जगासमोर आणला. या ऑडिओ क्लिपमध्ये दहशतवादी साजिद मीर, पाकिस्तानातून मुंबईतील दहशतवाद्यांना हल्ल्याबाबत फोनवर सूचना देत असल्याचे स्पष्ट होत आहे. या साजिदची पाकिस्तानकडे मागणी करण्यात आल्यावर पाकिस्तानने साजिद मीरला मृत घोषित केले होते. पण नंतर वाढत्या आंतराष्ट्रीय दबावामुळे साजिद (Sajid Mir Terrorist) जिवंत असल्याचे पाकिस्ताननं जाहीर करुन त्याला अटक केली. दहशतवाद्यांना पैसे दिल्याच्या आरोपावरून पाकिस्तानच्या न्यायालयाने जूनमध्ये त्याला 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. मात्र तरीही साजिदवर कुठलेही बंधन पाकिस्तानमध्ये नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेकवेळा साजिद पाकिस्तानमधील सार्वजनिक स्थळांवर फिरत असल्याची छायाचित्रे अमेरिकेकडून दाखवण्यात आली आहेत. अशा दहशतवाद्यावर कठोर बंधने घालण्यासाठी आलेल्या प्रस्तावावर खोडा टाकत चीननं भारत आणि अमेरिकेवरही मात केल्याचे चित्र निर्माण केले आहे. मात्र यातून चीन स्वतःलाच अधिक नुकसान करुन घेत असल्याचा इशारा भारतानं दिला आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.