अमेरिका आणि चीन (China) या दोन बलाढ्य देशांमध्ये सध्या तणाव वाढत आहे. या दोन देशांमध्ये वाढत चाललेल्या तणावात आणखी एका कारणाची भर पडली आहे ती म्हणजे कोरोना…जगाला हादरवणाऱ्या कोरोनाचा फैलावच काय पण उगमही चीनमधूनच झाल्याचा दावा आता अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी केला आहे. चीनच्या (China) वुहान मधील लॅबमधून जगात कोरोना पसरल्याची माहिती अमेरिकेच्या गुप्तचर संघटनांकडून देण्यात आली आहे. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी मधून सुरक्षेतील त्रुटींमुळे हा विषाणू लिक झाल्याचा दावा अमेरिकेच्या संशोधन संस्थेच्या अहवालात करण्यात आला आहे. हा विषाणू म्हणजे एखाद्या बायोवेपन तंत्रज्ञानापेक्षा कमी नव्हता. त्यामुळे संपूर्ण मानवी जीवनाला धोका निर्माण झाला होता. हा मोठा अपराध असून चीनला (China) याची संपूर्ण माहिती होती. पण चीननं ही माहिती जगापासून लपवल्याचा गंभीर आरोप अमेरिकेतर्फे करण्यात आला आहे. या आरोपाला अर्थातच चीननं नकार दिला आहे आणि अमेरिकेने केलेल्या आरोपांबाबत नाराजीही व्यक्त केली आहे. या दोन देशांमध्ये वाढत असलेल्या तणावामध्ये भर टाकणारी घटना म्हणून याकडे बघितले जात आहे. चीनमधील (China) कोरोनाचे वादळ अद्यापही शांत झाले नाही. अशात आता अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी पुरावे सादर करत हा विषाणू चीनमधूनच लिक झाल्याचे सांगितले आहेत. या घटनेमुळे चीनचे खोटे पुन्हा एकदा जगापुढे उघड झाले आहे.
अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या अहवालामध्ये चीनच्या वुहान लॅबमधूनच कोरोनाचा प्रसार झाल्याचे सांगण्यात आले आहे. अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने कोरोनाच्या विषाणूशी संबंधित अंतिम अहवाल सादर केला. त्यात हा विषाणू वुहान लॅबमधून बाहेर पडल्याचे सांगण्यात आले आहे. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी मधून सुरक्षेतील त्रुटींमुळे हा विषाणू लिक झाल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. यानंतर अवघ्या काही दिवसांतच तो जगभर पसरला. कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून, वुहानच्या प्रयोगशाळेतून कोरोनाची गळती झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. येथे काम करणा-या संशोधकांच्या माध्यमातून हा संसर्ग प्रथम काही मोजक्या स्वरुपात चीनच्या वुहानमध्ये पसरला. पण त्यांनी नंतर व्यापक रुप घेत अवघ्या चीनला (China)आपल्या आवाक्यात घेतलं. त्यानंतर जगभर कोरोनाचा हाहाकार झाल्याचा निष्कर्ष संबंधित अहवालात काढण्यात आला आहे. मात्र, चीन सरकार आणि वुहान लॅबने हे आरोप फेटाळून लावले आहेत.
कोरोना विषाणूच्या उत्पत्तीबाबत दोन परस्परविरोधी सिद्धांत सांगण्यात येत आहेत. एक म्हणजे हा विषाणू अज्ञात प्राण्यापासून मानवापर्यंत पोहोचला आणि दुसरा म्हणजे चीनच्या वुहानमधील संशोधन प्रयोगशाळेतून काही प्रयोग करतांना कोरोनाचे विषाणू बाहेर पडले. या प्रयोगशाळेत असेच विषाणू चीनकडून (China) तयार करुन त्याचा बायोवेपन म्हणून वापर करण्याची योजना होती, असेही सांगण्यात आले. चीनमध्ये कोरोना विषाणू पहिल्यांदाच आढळून आला. यानंतर, 2020 च्या सुरूवातीस, तो जवळजवळ जगभरात पसरला. WHO च्या म्हणण्यानुसार, कोरोना व्हायरसमुळे जगात आतापर्यंत 70 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या मुद्द्याचा राजकीय वापर केला. त्यांनी जगभरातील कोरोना व्हायरसला चीनच जबाबदार असल्याचे विधान अनेकवेळा केले. आता पुन्हा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी दिलेल्या अहवालामुळे कोरोना कुठून आला हा वाद निर्माण झाला आहे.
======
हे देखील वाचा : जगातील सर्वाधिक महागड्या शाळा, फी भरण्यातच जाईल आयुष्यभराची कमाई
======
दरम्यान वुहानमधून कोरोनाव्हायरस लीक झाल्याचा अमेरिकेचा दावा चीनने फेटाळला आहे. अमेरिकन अहवाल पाहून चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाला धक्काच बसल्याचे सांगण्यात आले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या ऊर्जा विभागाचा अहवाल साफ फेटाळून लावला आहे. चीनचे (China) म्हणणे आहे की कोरोनाव्हायरसच्या उत्पत्तीचा चिनी प्रयोगशाळेशी संबंध जोडणे पूर्णपणे चुकीचे आहे आणि या प्राणघातक महामारीचे असे राजकारण करणे चुकीचे असल्याचेही सांगण्यात आले. अमेरिकेने कोणतेही विधान करतांना त्याबाबत काळजी घ्यावी, असा सल्लाही चीनने दिला आहे. तसेच कोरोना हा किती घातक होता याचे परिणाम चीनवर अधिक झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत. चीनमध्ये अजूनही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेनं पुन्हा कोरोनाचे उगमस्थान चीनमध्येच असल्याचे ठामपणे सांगितले आहे. यामुळे या दोन्ही देशातील वाढत्या तणावात भर पडणार आहे.
सई बने