Home » China : भूकंपाच्या छायेत चीन !

China : भूकंपाच्या छायेत चीन !

by Team Gajawaja
0 comment
China
Share

म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपामुळे जगभर भीतीचे वातावरण पसरले असतांना आता चीनमध्ये यापेक्षाही मोठा भूकंप येण्याची भविष्यवाणी भूकंपशास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. यासाठी त्यांनी गेल्या 150 वर्षात आलेल्या भूकंपाचा अभ्यास केला असून चीनमध्ये यापुढे कधीही 8 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप येईल, असे एका अहवालात सांगितले आहे. बीजिंग भूकंप एजन्सीचे अभियंता झू होंगबिन हे गेली काही वर्षे जगभरात येत असलेल्या भूकंपाचा अभ्यास करीत आहेत. त्यांनी केलेल्या अभ्यासात 150 वर्षांच्या भूकंपाचे विश्लेषण करण्यात आले आहे. झू यांच्या म्हणण्यानुसार भूकंपाचे केंद्र हे सरकत आहे. हिमालयामध्ये असलेला भूकंपाचा धोका आता चीनच्या दिशेनं सरकला आहे. हा भूकंप एवढा मोठा असणार आहे की, चीनमध्ये त्यानंतर मोठ्या प्रमाणात पडझड होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. सिचुआन, युनान या भागात हा भूकंप येण्याची भीती आहे. (China)

सर्वात काळजीची गोष्ट म्हणजे, झू यांच्या अभ्यासानुसार हा भूकंप आला तर चीनमधील सर्वात मोठे धरण असलेल्या थ्री गॉर्जेस धरणाची परिस्थिती चिंतेची असणार आहे. कारण हे धरण भूकंपाच्या दृष्टीने सक्रिय क्षेत्रात असून याला धक्का लागला तर त्याचे गंभीर परिणाम होणार आहेत. या सर्वांमुळे चीनमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 28 मार्च 2025 रोजी म्यानमारमध्ये 7.7 तीव्रतेच्या विनाशकारी भूकंपात 3000 हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. शिवाय हजारो नागरिक जखमी झाले आहेत. त्याहून अधिक बेघर असून मोठी आर्थिक हानी झाली आहे. हा भूकंप झाल्यापासून जगभर अन्य देशातही भूंकप होत असल्यामुळे मोठा भूकंप येणे बाकी असल्याची भीती संशोधक व्यक्त करीत आहेत. या भीतीमध्ये भर घालणारा अहवाल चीनमध्ये प्रसिद्ध झाला आहे. चीनमधील शास्त्रज्ञ झू होंगबिन यांनी 150 वर्षात पृथ्वीवर झालेल्या भूकंपांचा आणि पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीचा अभ्यास केला आहे. झू आणि त्यांची टिम गेल्या वर्षभर या भूकंपाचा अभ्यास करीत असून त्यांनी लवकरच चीनमध्ये रिश्टर स्केलवर 8 तीव्रतेचा भूकंप येणार असल्याचा इशार दिला आहे. (International News)

चीनसह शेजारच्या देशांमध्येही म्यानमारसारखे मोठे भूकंप येण्याचा इशारा या सर्व अभ्यासकांनी दिला आहे. विशेष म्हणजे, म्यानमारमध्ये विनाशकारी भूकंप येण्याच्या काही दिवस आधीच झू आणि त्यांच्या टीमनं याबाबत अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालात काढण्यात आलेला निष्कर्ष हा पृथ्वीच्या परिभ्रमण गतीमधील चढउतारांशी जोडणा-या वेगाचा अभ्यास करुन काढलेला आहे. झू होंगबिन हे चीनमध्ये सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी भूकंपशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. झू होंगबिन यांनी चीनमध्ये होत असलेल्या जगातील सर्वात मोठे धरण, थ्री गॉर्जैस बाबतही चीन सरकाराला इशारा दिला होता. हे धरण भूकंप प्रवण क्षेत्रात असून ते पूर्ण क्षमतेनं भरल्यास त्याच्या भाराचा परिणाम पृथ्वीच्या वेगावर होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती. तसेच भविष्यात धरणाची हानी झाली तर धरणाच्या खालच्या भागात मोठी विपत्ती येऊ शकते, हेही स्पष्ट केले होते. मात्र चीन सरकारनं झू यांच्या या इशा-याकडे दुर्लक्ष करीत जगातील सर्वात मोठे धरण उभारले आहे. आता झू यांनी दिलेल्या भूकंपाच्या इशा-यानंतर याच थ्री गॉर्जेस धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्नही उभा राहिला आहे. (China)

=========

हे देखील वाचा : Pamban Bridge : जाणून घ्या भारतातील पहिल्या व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिजची वैशिष्ट्ये

Donald Trump : रक्ताचा बदला घेणार ट्रम्प यांना धोका वाढला !

==========

झू होंगबिन यांनी 1879 पासून आतापर्यंतच्या भूकंपीय माहितीचे विश्लेषण केले आहे. झू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना असे आढळून आले की, प्रत्येक भूकंप-सक्रिय कालावधी पृथ्वीच्या परिभ्रमण गतीतील बदलांशी संबंधित होता. जे दिवसाच्या लांबीतील बदलांद्वारे मोजले जाते. म्यानमारमधील भूकंप पृथ्वीच्या परिभ्रमणाच्या संक्रमणकालीन टप्प्यात झाला. सध्या ईशान्येकडील वाढत्या टेक्टोनिक दाबामुळे भूकंप आधीच उच्च-जोखीम असलेल्या क्षेत्रांपैकी एकामध्ये आहे. या अहवालात झू यांनी इशारा दिला आहे की, पृथ्वीवरील भूकंपीय ताण क्षेत्रे आता ईशान्येकडे सरकू लागले आहे. त्यामुळे सिचुआन, युनान आणि हिमालयीन पट्यात भूकंपाचा धोका वाढला आहे. नैऋत्य चीनमधील लाँगमेनशान फॉल्टच्या बंद भागात दाब वाढत असल्याचेही झू यांच्या अभ्यासादरम्यान स्पष्ट झाले आहे. सिचुआनमध्ये 2008 मध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाला कारणीभूत ठरणारा हाच फॉल्ट होता. त्यामुळेच झू यांनी दिलेल्या या इशा-यामुळे चीनमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे. (International News)
सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.