येत्या २७ जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे. या दिवशी शिवसैनिक मोठ्या संख्येने शुभेच्छा द्यायला जमत असतात, तर येताना आपल्या सोबत हार, तुऱ्यासोबत विधी भेट वस्तू घेऊन येत असतात. मात्र या वर्षी राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदा ते वाढदिवस साजरा करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या संदर्भात ट्विट करून त्यांनी माहिती दिली. यासाठीच यंदा कोणीही कार्यालयात किंवा निवासस्थानी येऊन शुभेच्छा देण्याचा आग्रह करू नये. तसेच हार तुऱ्याऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन देखील राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
जाहिराती आणि बॅनर नको
दर वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसासाठी राज्य भरात विविध ठिकाणी मोठ मोठे बॅनर, भित्ती पत्रके, जाहिराती फलक लावले जाता असतात. मात्र यावर्षी हे लावू नये असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. या ऐवजी गर्दी करण्याचे प्रयत्न न करता विविध ठिकाणी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील नागरिकांसाठी जन आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान शिबिर, तसेच प्लासमा दान करावे असे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.
धोका अजून संपला नाही
राज्यसह देशभरात गेले ४ महिने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याचे सर्वच स्थारांवरून शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. या दरम्यान लॉकडाऊन देखील करण्यात आले. तसेच गेले अनेक दिवस नागरिक, स्वयंसेवी संस्था, राज्य सरकार सर्व परीने या कोरोनाच्या विरोधात लढा देत आहेत आणि त्यांच्या या प्रयत्नांचे चांगले परिणाम देखील दिसत आहेत. मात्र कोरोना धोका अजून संपला नाही, तर आता आपल्याला अधिक सावध राहून नियमांचे पालन करायची गरज आहे असे देखील त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जनतेस आवाहन; pic.twitter.com/SS6ujEYT1z
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) July 23, 2020
शुभेच्छा कोविड योद्धांचा समर्पित
तसेच या वेळी आलेल्या सर्व शुभेच्छा गेले अनेक दिवस अहोरात्र आपले कर्तव्य बजावणाऱ्या कोविद योद्धांचा समर्पित करतो असे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
यांनी देखील केले रद्द
या अगोदर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आपले वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. तर कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रम हाती घेत त्यांचा वाढदिवस साजरा केला.