भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील खाद्यसंस्कृती बहुतांशी मिळती जुळती आहे. मांसाहारी पदार्थ तर दोन्ही देशात जवळपास समान बनवले जातात. चिकन बिर्यानी किंवा खिमा पुलाव सारख्या पाककृतींमध्ये बरेच साम्यही आहे. ब-याच पदार्थींची नावंही सारखी आहेत. यातूनच या दोन देशांमध्ये गम्मतशीर असे वादही झाले आहेत. गेल्या काही वर्षापूर्वी बिर्यांनी मुळात कुणाची हा वाद सुरु झाला होता. आता अशा वादात नव्या पदार्थाची भर पडली आहे, तो पदार्थ म्हणजे चिकन मंचुरियन(Chicken Manchurian). हे चिकन मंचुरियन कुणाचं… ते आधी कोणी बनवलं. भारतातल्या शेफनी तयार केलं की, पाकिस्तनमधल्या शेफनी. चिकन मंचुरियन (Chicken Manchurian) तयार केलं हा वाद सुरु झाला आहे. त्याला कारण ठरला आहे, तो न्यूयॉर्क टाइम्सने प्रकाशित केलेला एक खाद्यसंस्कृतीवरील अहवाल. यात न्यूयॉर्क टाइम्सने चिकन मंजुरियन (Chicken Manchurian) पहिल्यांदा पाकिस्तानमधील शेफनी तयार केल्याचे प्रमाणपत्र देऊन टाकले आणि हा वाद सुरु झाला.

चिकन मंजुरियन (Chicken Manchurian) हा पदार्थ भारतात सर्वच प्रांतात मिळतो. हा पदार्थ आतापर्यत चायनीज म्हणूनच ओळखला जात होता. मात्र या एका पदार्थावर फक्त चीनचं नाही तर भारत, पाकिस्तान आणि अमेरिका यांनीही दावा केला आहे. त्यामुळेच आता न्यूयॉर्क टाइम्सने सारख्या वृत्तपत्रानं त्याला पाकिस्तानचे असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानं हा पदार्थ पाकिस्तानमध्ये कसा गेला आणि त्याचे नाव कसे ठेवले गेले हा प्रश्न विचारण्यात येत आहे.
मुळात मंचुरियन हा पदार्थ शाकाहारी राहिलेल्या भाज्यांचा वापर करुन केलेला हा पदार्थ खूप लोकप्रिय झाला. त्याच पदार्थावर आधारीत मग चिकन मंचुरियनची निर्मिती करण्यात आली. चिकन, फ्लॉवर, कोबी, कोळंबी, पनीर यापासून आता वेगवेगळ्या चवीचे मंचुरियन तयार केले जातात. हा आता चायनीज भारतीय चवीचा फ्युजन पदार्थ म्हणूनही ओळखला जातो. कारण ब-याच ठिकाणी मंचुरियन तयार करताना त्यात भारतीय मसाल्यांचाही वापर करण्यात येतो. या सर्वात सोया सॉसचा चवीनुसार वापर करुन तळलेला हा पदार्थ मग सॉसच्या एका ग्रेव्हीमध्ये टाकला जातो. या मंचुरियनचे जेवढे प्रकार आता आहेत. तेवढ्याच देशांनी हा पदार्थ कोणाचा यावर दावे ठोकले आहेत.
वास्तविक भारतातील कुठल्याची चायनीज हॉटेलमध्ये गेलात तर चिकन मंचुरिअन (Chicken Manchurian) हा पदार्थ चायनीज पदार्थांच्या यादीमध्ये दिसतो. पण मंचुरिअन हा पदार्थ मुळ चायनाचा नसून त्याचा शोध भारतातील चायनीज हॉटेलमध्ये लागला आहे. 1975 मध्ये मुंबईतील क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचा शेफ नेल्सन वांग यांनी चिकन मंचुरिअनचा (Chicken Manchurian) शोध लावल्याची माहिती आहे. वांग यांनी हा पदार्थ कसा तयार केला, याच्या मागे एक किस्सा आहे. एका ग्राहकानं हॉटेल बंद होतांना पोटभर जेवणाची ऑर्डर केली. त्यावेळी काही मोजके पदार्थ उपलब्ध होते. अशावेळी वांग यांनी हे सर्व पदार्थ एक करुन त्यापासून चिकन मंचुरिअन तयार केले, आणि ते या ग्राहकाला चवीला दिले. भरपूर लसूण, आले आणि हिरव्या मिरच्या घालून तयार केलेली ही चिकनची डिश तेव्हाच हिट झाली. वांग यांनी त्यात भारतीय मसाल्यासोबत चायनीज सॉसचाही वापर केला होता. सोया सॉस, टोमेटो सॉस, चिली सॉस आणि कॉर्नस्टार्च यांचा वापर करुन केलेला हा पदार्थ तेव्हा सर्वांना आवडला होता. पुढे हा पदार्थ या हॉटेलमधील सर्वात लोकप्रिय पदार्थ ठरला. शाकाहरी मंचुरिअनमध्ये कोबी, फ्लॉवर, पनीर, मशरुम, बेबी कॉर्न आदींचा वापर होऊ लागला. तेव्हापासून आतापर्यत मंचुरिअनचे अनेक प्रकार सर्वच हॉटेलमध्ये उपलब्ध आहेत. फारकाय अगदी रस्त्यावर मिळणा-या चायनीज पदार्थांमध्येही हे चिकन मंचुरिअन पहिल्या क्रमांकावर असते.
========
हे देखील वाचा : दलाई लामांनी दिला चीनला धक्का…
========
आता याच चिकन मंचुरिअनचा (Chicken Manchurian) शोध कोणी लावला यावर वाद सुरु झाला आहे. अलीकडेच, न्यूयॉर्क टाइम्सने प्रकाशित आशियातील खाद्यपदार्थांच्या एका माहितीमध्ये चिकन मंचुरिअनचा उल्लेख आहे. आणि हा पदार्थ पाकिस्तानमधील मुळ असल्याचे सांगण्यात आले आहे. न्यूयॉर्क टाइम्सने प्रकाशित केलेल्या रेसिपीमध्ये चिकन मंचुरिअन हा पदार्थ 90 च्या दशकात पाकिस्तानमधील लाहोर येथे हसीन कुआंग यांनी तयार केले असल्याचा उल्लेख केला आहे. मुळात त्याआधीच भारतात हा पदार्थ 1975 मध्ये शेफ नेल्सन वांग यांच्यानावावर लिहिला गेला आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, साउथ चायना मॉर्निंग पोस्ट ने 2017 मध्ये एक अहवाल प्रकाशित केला होता. त्यात त्यांनी चिकन मंचुरियनचा उगम भारतात झाल्याचे नमूद केले आहे. या पदार्थापुढे भारतात रहाणारे चिनी शेफ नेल्सन वांग यांचे नावही लिहिले आहे. असे असतांना न्युऑर्क टाईम्सनं पाकिस्तानचं नाव जोडून या दोन देशात आणखी एक वादाचे कारण पुढे केले आहे. अर्थात खाद्यप्रेमींना या वादांनी काहीही फरक पडणार नाही. चिकन मंचुरिअन असो वा व्हेज मंचुरिअन, खाद्य शौकीनांच्या यादीत त्याला पहिला नंबरच असणार आहे.
सई बने