Home » प्राचीन घरांचा वारसा जोपासणारे चेट्टीनाड हेरिटेज टाउन

प्राचीन घरांचा वारसा जोपासणारे चेट्टीनाड हेरिटेज टाउन

by Team Gajawaja
0 comment
Chettinad Heritage
Share

दक्षिण भारतातील तमिळनाडू राज्यात अनेक मंदिरे ही भारतीय स्थापत्यशास्त्राच्या वैभवाची साक्ष देणारी आहेत. पण तामिळनाडूमध्ये फक्त मंदिरेच नाहीत तर तेथील घरेही भारतीय वास्तूशास्त्राचा उज्ज्वल इतिहास सांगतात. ही घरे म्हणजे छोटे राजवाडेच आहेत.आताच्या छोट्या कुटुंबाच्या व्याख्येत ही घरे संयुक्त कुटुंबाला सामावून घेतात. शिवाय प्रत्येकाला सोयीचे वाटेल अशा सुख सोयींनी ती युक्त आहेत.  तामिळनाडूच्या कराईकुडी शहराच्या उत्तरेस असलेले चेट्टीनाड हेरिटेज (Chettinad Heritage) टाउन हे या सर्वांसाठी खास आहे. येथील भव्य घरे ही भारतीय संस्कृतीची प्रतिक ठरत आहेत. आता ही भव्य घरे लग्नसमारंभ किंवा कौटुंबिक गेटटूगेदरसाठी वापरली जातात. येथे चित्रपटांचे शुटींगही करण्यात येते. तसेच फोटोशुटींगसाठी ही घरे आवडते स्थान आहे.  

तामिळनाडूच्या कराईकुजीमधील हे चेट्टीनाड हेरिटेज (Chettinad Heritage) शहर पर्यटकांनी कायम गजबजलेले असते. येथील घरांची व्यापकता आणि सुंदरता बघून पर्यटक हरखून जातात.अत्यंत बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेऊन तयार केलेली ही घरे, छोटे राजवाडे म्हणूनही ओळखली जातात.  येथील चेट्टीनाड (Chettinad Heritage) महाराजांचा राजवाडा हे त्यातील प्रमुख आकर्षण आहे. पण हा राजवाडा आतून बघता येत नाही. या राजवाड्यात राजघराण्याचे सदस्य राहतात,  त्यामुळे हा राजवाडा केवळ बाहेरुन बघता येतो. पण फक्त राजवाडा बाहेरुन बघता आला तरी त्याचे स्वरुप आतून किती देखणे असेल याचा अंदाज येतो. या राजवाड्याचा मुख्य दरवाजा अतिशय भव्य असून तो सागवान लाकडापासून तयार केलेला आहे.  त्याच्यावर अत्यंत सुंदर अशी नक्षी आहे. तसेच राजवाड्याभोवती उंच तटबंदी, राजवाड्यासमोरची अत्यंत देखणेपणाने सजवलेली जागा आणि त्याच्या मध्यभागी असलेल्या छतावर कोरलेल्या मूर्ती हे सर्व बघूनच पर्यटक समाधानी होतात. या राजवाड्याच्या समोर आणखी एक सुंदर हेरिटेज (Chettinad Heritage) हवेली आहे. ती बघता येते. शिवाय आसपासच्या अनेक गल्ल्या या अनेक सुंदर आणि पुरातन घरांनी भरून गेल्यासारख्या आहेत.   

तामिळनाडूच्या कराईकुडी आणि देवकोट्टई या दोन मुख्य शहराच्या एका भागात ही सुंदर घरे आहेत. त्यात चेट्टियार समाजाचे नागरिक राहतात. दक्षिण भारतात राहणारे चेट्टियार हे यशस्वी व्यापारी म्हणून ओळखले जातात. मसाल्याचे व्यापारी म्हणून त्यांची ओळख आहे.  अत्यंत संपन्न असलेला हा समाज उच्चविद्याविभूषीतही आहे. अथनगुडी टाइल्स बनवण्याची कला चेट्टियार समाजाने विकसित केली आहे. या समाजातील लोकांनी व्यापार चारीदिशेला केला. युरोप, अमेरिका मध्येही त्यांचे व्यापारी संबंध आहेत. व्यापारामुळे जगभर फिरणा-या चेट्टियार समाजानं जगातील उत्तोमोत्तम घरांचे निरीक्षण केले. भारतीय वास्तूशास्त्राला या सर्वांची जोड दिली आणि आपली घरे उभारली. चेट्टियारांच्या समृद्धीचे प्रदर्शन करणाऱ्या या भव्य वाड्यांकडे नजर टाकली तर चेट्टियारांची कल्पकता आणि संपन्नता यांचे दर्शन होते. (Chettinad Heritage)  

या भव्य वाड्यांमध्ये सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा कशी येईल, याचा परिपूर्ण विचार केलेला आहे. घराची सजावट करतांना भारतीय संस्कृती आणि पितळेच्या भांड्याचा वापर केलेला आहे. तसेच तंजोर पेंटिगही या वाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. या सर्व वाड्यांमध्ये  अंगणांसह, अथांगुडी टाइल्स, संगमरवरी आणि सागवान लाकडाने सजलेल्या खोल्या आणि पारंपरिक कलाकृतीं प्रामुख्यानं असतातच.  याशिवाय हे वाडे एक, दोन किंवा तिन मजलीही असतात. साधारण 11,000 चेट्टीनाड वाडे अजूनही अस्तित्वात आहेत. 20 व्या शतकाच्या मध्यात, बहुतेक चेट्टियार कुटुंबे चेन्नईसारख्या शहरांमध्ये स्थलांतरित झाली. आता त्यांच्या या भव्य घरांचा पर्यटकांसाठी वापर करण्यात येतो.  काही ठिकाणी हॉटेलही सुरु झाले आहे. तसेच लग्नसमारंभासाठी ती वापरली जातात.(Chettinad Heritage)

=======

हे देखील वाचा : ‘तुम्ही राक्षसाला जन्म दिलांय’ पुतीन यांच्या आईवडिलांना पत्र

=======

 पारंपारिक चेट्टीनाड (Chettinad Heritage) घरांच्या समोर अंगणही तेवढेच मोठे असते. त्याला थिन्नई म्हणतात. नंतर एक मोकळा व्हरांडा येतो. याचाच वापर विवाहसोहळा आणि विविध उत्सवांसाठी केला जातो. काही वाड्यांमध्ये शंभरहून अधिक खोल्या आढळतात. तर हजाराहून अधिक माणसे सामावून घेण्याची क्षमता या घरात असते. त्यामुळेच अलिकडे लग्न समारंभासाठी या घरांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.  या घरांची रचना करतांना त्यात हवा खेळती राहील याची काळजी घेतलेली असते. त्यामुळे अनेकवेळा पंखा किंवा एसीशिवायही उन्हाळ्यात या घरातील खोल्या थंड असतात. घराचे अंगण जेवढे सुंदर सजवलेले असते, तेवढेच घरातील प्रत्येक खोली ही सजवलेली असते. आतील भागातील दगडी स्तंभ हे नक्षीदार असून त्यावर अनेक प्रतिमा कोरलेल्या असतात.चेट्टियार (Chettinad Heritage) घरे ही व्यापाऱ्यांच्या सामर्थ्याचे आणि सामाजिक प्रतिष्ठेचे प्रतिनिधीत्व करणारी होती. त्यामुळे या व्यापा-यांनी केलेल्या जगभर प्रवासाचे पुरावे या वाड्यात पहायला मिळतात. आजच्या काळात काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या या घरात अनेक वर्षापूर्वी केलेल्या आढळून येतात. पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था हे त्यापैकी एक वैशिष्ट. याशिवाय अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेली ही घरे बघण्यासाठी एक दिवसही अपूर्ण पडतो. भारतीय संस्कृतीची आणि संपन्नतेची झलक बघायची असेल तर या भव्य घरांना नक्की भेट द्यायला हवी.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.