Home » Sakura: स्वच्छता प्रिय जपानी नागरिकांनी का बंद केला चेरी ब्लॉसम फेस्टिवल

Sakura: स्वच्छता प्रिय जपानी नागरिकांनी का बंद केला चेरी ब्लॉसम फेस्टिवल

by Team Gajawaja
0 comment
Share

वसंत ऋतूचे आगमन फक्त भारतात साजरे केले जात नाही. तर भारताचा मित्र देश असलेल्या जपानमध्येही वसंत ऋतूचे आगमन उत्साहात साजरे केले जाते. जपानमध्ये, वसंत ऋतूच्यावेळी सर्व रस्ते चेरी ब्लॉसमच्या फुलांनी गुलाबी होऊन जातात. जपानी भाषेत याला सकुरा म्हणतात. तिथे सकुराचे आगमन नवीन जीवन आणि सौदर्याचे प्रतीक मानले जाते. यावेळी बहुतेक जपानी नागरिक हे घराबाहेर पडतात, आणि बहरलेल्या चेरी ब्लॉसमच्या वृक्षांसोबत आपला वेळ घालवतात. ही प्रथा जपानमध्ये “मोनो नो अवेअर” म्हणून ओळखली जाते. जपानच्या सांस्कृतिक वारशाचे हे एक प्रतीक आहे. साधारण फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासून जपानच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये ही चेरी ब्लॉसमची फुले फुलण्यास सुरुवात होते, आणि त्यानुसार त्या शहरामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागते. ही हजारो वर्षे जुनी परंपरा आहे. यानिमित्त कुटुंबे, मित्र आणि सहकारी पिकनिक, अगदी जेवणाची पार्टीही या चेरी ब्लॉसमच्या वृक्षांखाली साजरी करतात. यातून ते आपल्या जीवनात आनंद देणा-या या वृक्षांप्रती आपले आभारही व्यक्त करतात. ( Sakura )

मात्र यावेळी जपानमध्ये ही परंपरा खंडित झाली आहे. गेल्या काही वर्षापासून चेरी ब्लॉसमच्या हा सिझन जपानचा पर्यटनसिझन म्हणून ओळखला गेला आहे. या तीन महिन्यात जपानमध्ये मोठ्या संख्येनं परदेशी पर्यटक दाखल होतात. यावर्षीही मोठ्या संख्येनं पर्यटक जपानमध्ये दाखल झाले. मात्र त्यांनी जपानच्या स्वच्छता आणि शांतता या दोन तत्त्वांना मातीमोल केले. अर्थात जपनाच्या रस्त्यावर पर्यटकांनी टाकलेले खाऊचे पॅकीट कागद दिसू लागले. शिवाय पर्यटकांच्या आरड्याओरड्यानं जपानी नागरिक हैराण झाले. त्यामुळे त्यांनी पर्यटक नको, आम्हाला आमची शांतता आणि स्वच्छता हवी, असे सांगून सरकारकडे हा चेरी ब्लॉसम फेस्टिवल थांबवण्याची मागणी केली. अर्थात जपान सरकारनंही नागरिकांच्या मागणीचा मान ठेऊन करोडो रुपयांची उलाढाल करणारा चेरी ब्लॉसम फेस्टिवल रद्द केला असून परदेशी पर्यटकांना जपानची द्वारे बंद केली आहेत.

दरवर्षी जपानमध्ये फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात चेरी ब्लॉसम फेस्टिवल होतो. यात जपानच्या बहुतेक शहरातील रस्ते गुलाबी आणि पांढ-या रंगाच्या सुंदर अशा फुलांनी सजून जातात. हे मनमोहक दृष्य बघण्यासाठी जपानचे नागरिक आणि परदेशी पर्यटकही या शहरांना भेट देतात. चेरी ब्लॉसमला जपानी भाषेत साकुरा म्हणतात. या साकुराच्या निमित्तानं जपानच्या पर्यटन व्यवसायातही मोठी आर्थिक उलाढाल होते. अलिकडच्या वर्षात साकुरा एवढा लोकप्रिय झाला आहे की, ज्या भागात या फुलांच्या बागा बहरतात, त्या जपानच्या शहरातील बहुतांश हॉटेल ही वर्षभर आधीच हाऊसफूल झालेली असतात. मात्र यावर्षी याच पर्यटकांच्या वाढत्या संख्येनं जपानी नागरिक हैराण झाले आहेत. ( Sakura )

=======

हे देखील वाचा : China : लग्न करा अन्यथा….

=======

जपानमधील माउंट फुजी जवळील फुजीयोशिदा येथील अराकुरायमा सेंजेन पार्क चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल यावर्षी रद्द करण्यात आला आहे. त्याला कारण ठरली आहे, या फेस्टिव्हलसाठी झालेली प्रवाशांची अतीगर्दी. मोठ्या संख्येनं आलेल्या या पर्यटकांच्या वर्तनामुळे येथील स्थानिक रहिवासी एवढे वैतागले की त्यांनी सरकारकडे हा फेस्टिव्हल रद्द करण्याची मागणी केली. पर्यटकांनी येथील स्थानिक रहिवाश्यांच्या शांततेत भंग टाकण्याचा प्रयत्न केला. मोठ्यानं आवाज करत गप्पा मारणे, गाणी लावणे, भांडणे, आरडाओरडा करणे, यामुळे फुजीयोशिदाचे नागरिक कंटाळून गेले. शिवाय मोठ्या संख्येनं आलेल्या या पर्यटकांनी फुजीयोशिदाच्या रस्त्यावर मोठी घाणही केली. कचरा टाकण्याच्या सर्व नियमांना गुडाळून ठेवत कागदाचे पॅकेट, पाण्याच्या बाटल्या रस्त्यावर फेकून दिल्या. त्यामुळे निसर्गाला मोठा धक्का बसत असल्याची टीका स्थानिकांनी केले.

दरवर्षी सुमारे २००,००० पर्यटक फुजीयोशिदाला भेट देतात. यावेळी ही संख्या अधिक झाली होती. बहुतांश ठिकाणी गर्दी होती. मग या पर्यटकांनी बागांमध्ये आपला मुक्काम केला आणि त्यामुळे चेरी ब्लॉसमच्या वृक्षांनाच लक्ष केल्याच्या घटना घडल्या. या सर्वांमुळे फुजीयोशिदाच्या नागरिकांनी हा फेस्टिव्हल रद्द करावा अशी मागणी केली आणि स्थानिक परिस्थिती पाहता ही मागणी सरकारनं मान्यही केली. आता फुजीयोशिदामध्ये हा चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल रद्द झाल्यावर अन्य शहरात भरणा-या फेस्टिव्हल बाबतही प्रश्नचिन्ह निर्माण जाले आहे. ( Sakura )

टोकियोमध्ये शिंजुकू ग्योएन, उएनो पार्क आणि चिदोरीगाफुची, सेन्सोजी मंदिर येथे हा फेस्टिव्हल भरतो. शिवाय नागोया येथील यामाझाकिगावा नदी चेरी ब्लॉसम पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक येतात. शिवाय क्योटो शहरातही अनेक ठिकाणी चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल होतो. या सर्वांसाठी मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटकांनी बुकींग केली आहे. त्यामुळे हे फेस्टिव्हल रदद केले तर पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसणार आहे. मात्र जपान सरकार याबाबत स्थानिकांची चर्चा करुन बाहेरुन येणा-या पर्यटकांसाठी कडक नियम तयार करण्याच्या विचार करत आहे. ( Sakura )

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.