Home » गुजरात टायट्न्सला धूळ चारत चेन्नई सुपर किंग्स फायनलमध्ये !

गुजरात टायट्न्सला धूळ चारत चेन्नई सुपर किंग्स फायनलमध्ये !

by Team Gajawaja
0 comment
GT vs CSK
Share

इंडियन प्रीमियर लीगच्या क्वालीफायर १ मध्ये चेन्नई आणि गुजरात यांच्यामध्ये रंगलेल्या सामन्यात धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सने मुसंडी मारत जोरदार विजय मिळवून अंतिम सामन्यात धडक मारली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईने दिलेले १७२ धावांचे लक्ष गाठण्यात गुजरातला अपयश आले आणि चेन्नईने १५ धावांनी विजय मिळवत अंतिम सामन्यात आपले स्थान पक्के केले.(GT vs CSK)

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकत हार्दिकने चेन्नईला फलंदाजीचे निमंत्रण दिले. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने गोलंदाजाच्या चुकीमुळे मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली. डेवोन काँनवेच्या साथीने त्याने चेन्नईच्या संथ खेळपट्टीवर संयमी फलंदाजी करत ८७ धावांची सलामी देत संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली. अकराव्या षटकात मोहित शर्माच्या गोलंदाजीवर ऋतुराज गायकवाड झेलबाद झाला. बाद होण्यापूर्वी त्याने आपले काम चोखपणे बजावले. त्याने ४४ चेंडूत ६० धावा ठोकल्या. (GT vs CSK)

त्यानंतर आलेल्या शिवम दुबेला फारशी कमाल दाखवता आली नाही. तीन चेंडू खेळत अवघ्या एकच्या वैयक्तिक धावसंख्येवर नूर अहमदच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला. चांगली सुरुवात मिळूनदेखील अजिंक्य राहणेला मोठी खेळी करता आली नाही. १० चेंडूत १७ धावा करत तो माघारी परतला. त्यानंतर अंबाती रायुडू आणि रवींद्र जडेजा यांनी अनुक्रमे १७ आणि २२ धावांची खेळी करत धावफलक हलता ठेवला. संघाच्या एकूण कामगिरीच्या बळावर चेन्नईने निर्धारित वीस षटकात सात गड्यांच्या मोबदल्यात १७२ धावांपर्यंत मजल मारली. (GT vs CSK)

गुजरातच्या वतीने मोहम्मद शमीने टिच्चून मारा करत ४ षटकात २८ धावांच्या मोबदल्यात २ बळी मिळवले. मोहित शर्माने ४ षटकात ३१ धावा मोजत २ फलंदाजांना माघारी पाठवले. नूर अहमद, दर्शन नळकांडे आणि राशीद खान यांनी प्रत्येकी एक बळी मिळवत त्यांना योग्य साथ दिली. (GT vs CSK)

चेन्नईने दिलेल्या लक्षाचा पाठलाग करायला उतरलेल्या गुजरातला अपेक्षित सुरुवात मिळाली नाही. सलामीवीर व्रीद्धीमान साहाला पॉवरप्ले स्पेशालीस्ट गोलंदाज दिपक चहरने पथिरानाकरवी झेलबाद करत पव्हेलीयनचा रस्ता दाखवला. कर्णधार हार्दिक पांड्या स्वतःला बढती देत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला मात्र धोनीच्या चतुर रणनीतीचा शिकार होत त्याला आपला बळी गमवावा लागला. अवघ्या आठ धावा करून त्याला माघारी परतावे लागले. त्यानंतर मात्र गुजरातच्या मधल्या फळीतील फलंदाजांना काही कमाल दाखवता आली नाही. (GT vs CSK)

========

हे देखील वाचा : IPL मध्ये आतापर्यंत ‘या’ खेळाडूंनी पटकावली आहे ऑरेंज कॅप

========

राशीद खान वगळता बाकीच्या सर्व फलंदाजांनी खेळपट्टीवर हजेरी लावण्याचे काम केले. सलामीवीर शुभमन गिल सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. त्याने ३८ चेंडूत ४२ धावांची संयमी खेळी केली. तर राशीद खानने टोलवाटोलवी करत अवघ्या १६ चेंडूत ३० धावांची जलद पारी खेळली. परंतु या दोघांची खेळी गुजरातच्या विजयाला पुरेशी नव्हती. निर्धारित लक्षाच्या १५ धावा मागे राहत गुजरातला हार पत्करावी लागली.

चेन्नई सुपर किंग्सने या विजयाबरोबरच अंतिम सामन्यात धडक मारली आहे. एकूण १४ हंगामात खेळतांना विक्रमी दहाव्यांदा अंतिम सामन्यात धडक मारली. गुजरातचे आव्हान अजून संपुष्टात आलेले नसून अंतिम सामन्याच्या पात्रतेसाठी त्यांना मुंबई आणि लखनऊ मधील विजेत्या संघासोबत दोन हात करावे लागतील.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.