Home » चेन्नईच ठरली सुपर किंग्स, दिल्लीचे आव्हान संपुष्टात.

चेन्नईच ठरली सुपर किंग्स, दिल्लीचे आव्हान संपुष्टात.

by Team Gajawaja
0 comment
CSK vs DC
Share

चेन्नईमधील एम ए चिदंबरम स्टेडियम मध्ये रंगलेल्या सामन्यात धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघाने दणदणीत विजय मिळवत प्लेऑफ मधील आपले स्थान अजून बळकट केले आहे. मागच्या काही सामन्यांत विजयी घौडदौड करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचा आयपीएल मधील या वर्षीचा प्रवास जवळपास संपुष्टात आला आहे. कालच्या सामन्यातील विजयानंतर महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नईने १२ सामन्यात ७ विजयांसह १५ गुण घेत गुणतालिकेतील आपले दुसरे स्थान बळकट केले आहे.(CSK vs DC)

प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने वीस षटकात ८ बाद १६७ धावांपर्यंत मजल मारली. स्लो असणाऱ्या चेन्नईच्या पिचवर त्यांच्या सलामी जोडगोळीला आपली जादू दाखवता आली नाही. डेवोन कॉनवे १० धावांवर बाद झाल्यानंतर ऋतुराजने थोडा जम बसवायचा प्रयत्न केला. परंतु सुरुवात चांगली होऊन देखील त्याला लवकरच पव्हेलीयनची वाट धरावी लागली. यावर्षी फार्मात असलेल्या अजिंक्य रहाणेलादेखील आपली जादू दाखवता आली नाही.(CSK vs DC)

मोईन आली लवकरच माघारी परतल्यानंतर शिवम दुबेने फटकेबाजी करत चेन्नईला सावरण्याचा प्रयत्न केला. अम्बाती रायुडूची संयमी खेळी आणि महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जडेजाची शेवटच्या षटकांतील फटकेबाजीच्या बळावर चेन्नई १६७ धावांच्या समाधानकारक लक्ष्यापर्यंत पोहोचू शकली. दिल्लीकडून मिचेल मार्श आणि अक्षर पटेल यांनी उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन करत अनुक्रमे ३ आणि २ बळी घेत चेन्नईच्या धावगतीला ब्रेक लावण्याचे काम केले.(CSK vs DC)

गोलंदाजीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर चेन्नईने दिलेल्या लक्षाचा पाठलाग करतांना दिल्लीला समधानकारक सुरुवात करता आली नाही. कर्णधार डेव्हिड वार्नरला भोपळा न फोडताच माघारी परतावे लागले. त्यानंतर चेन्नईच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या फलंदाजीला सुरुंग लावला. मिचेल मार्श, मनीष पांडे, फील साल्ट, रिपल पटेल यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. रायले रीसो आणि अक्षर पटेल यांनी झुंजार वृत्ती दाखवत लढा देण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत सामना हातून निसटला होता. त्यांच्या शेवटी केलेल्या फटकेबाजीमुळे दिल्लीला हरण्यातीलअंतर कमी करता आले, पण जिंकता आले नाही.(CSK vs DC)

=======

हे देखील वाचा : धोनीचा ‘तो’ गगनचुंबी षटकार होणार ऐतिहासिक!

======

इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेला महिषा पथिराना सामन्यावर आपली छाप सोडून गेला. चार षटकांमध्ये ३७ धावा देत त्याने दिल्लीच्या ३ फलंदाजांना घरचा रस्ता दाखवला. दीपक चहर आणि रवींद्र जडेजा यांनी अनुक्रमे २ आणि १ बळी घेत त्याला योग्य साथ दिली. निर्धारित वीस षटकात दिल्लीचा संध १४० धावांपर्यंतच मजल मारू शकला आणि चेन्नईने २७ धावांनी दणदणीत विजय मिळवला.(CSK vs DC)

या विजयानंतर चेन्नईने प्ले ऑफ मधील आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे तर दिल्लीच्या धुरंधरांचा आयपीएलच्या या पर्वातील प्रवास संपुष्टात आल्यागत जमा आहे. मागच्या वर्षीच्या ढिसाळ कामगिरीनंतर चेन्नईचा संघ या वर्षी चांगलाच लयीत दिसत आहे. तत्पूर्वी सामन्यातील अष्टपैलू कामगिरीमुळे रवींद्र जडेजाला सामनावीराचा किताब प्रदान करण्यात आला.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.