Home » पाचवा आयपीएल किताब जिंकत चेन्नईच ठरली किंग !

पाचवा आयपीएल किताब जिंकत चेन्नईच ठरली किंग !

by Team Gajawaja
0 comment
CSK vs GT
Share

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर रंगलेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सने अतिशय रोमहर्षक सामन्यात गुजरात टायट्न्सचा अखेरच्या चेंडूवर पराभव करत पाचवा आयपीएल किताब आपल्या नावावर केला.आयपीएलच्या इतिहासात पाचव्यांदा ट्रॉफी जिंकणारी चेन्नई सुपर किंग्स दुसरी टीम ठरली. या अगोदर मुंबई इंडियन्सच्या नावावर पाच ट्रॉफीज जिंकण्याचा पराक्रम आहे. (CSK vs GT)

पावसाच्या अडथळ्याने रविवारी खेळवला जाणारा आयपीएलचा अंतिम सामना एक दिवस पुढे ढकलत सोमवारी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारीदेखील इथे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकत गुजरातला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. गुजरातच्या सलामीवीरांनी संघाला धडाकेबाज सुरुवात मिळवून दिली. लयीत असलेला शुभमन गिल आणि व्रीद्धीमान साहा यांनी पॉवरप्लेच्या सात षटकात ६७ धावांची सलामी दिली. रवींद्र जडेजाच्या चेंडूवर शुभमन गिलला महेंद्रसिंग धोनीने सुरेखपणे यष्टीचीत केले. बाद होण्यापूर्वी गिलने २० चेंडूत ३९ धावांचे योगदान दिले. (CSK vs GT)

साहाने एक बाजू लावून धरत आपली फटकेबाजी सुरूच ठेवली. त्याला साई सुदर्शनने योग्य ती साथ दिली. ३९ चेंडूत ५४ धावा ठोकत साहाने धावफलक हलता ठेवला. तो बाद झाल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या फलंदाजीला आला. सुदर्शन ज्या प्रकारे फलंदाजी करत होता त्यामुळे पांड्याला जास्त काही करण्याची गरज पडली नाही. साई सुदर्शनने अप्रतिम फलंदाजीचे प्रदर्शन करत ४७ चेंडूत ९६ धावा केल्या. अवघ्या चार धावांनी त्याचे शतक हुकले. शेवटच्या काही षटकांत हार्दिक पांड्याने काही मोठे फटके लगावत संघाची धावसंख्या ४ बाद २१४ धावांपर्यंत पोहोचवली. आयपीएलच्या इतिहासात अंतिम सामन्यातील ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली.(CSK vs GT)

दुसऱ्या डावाची सुरुवात झाली की लगेच पावसाने हजेरी लावली. या अडथळ्यामुळे सामना काही काळ थांबला होता. पाउस थांबल्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार चेन्नईला १५ षटकात १७१ धावांचे लक्ष देण्यात आले. ऋतुराज गायकवाड आणि डेवोन कॉनवे यांनी फटकेबाजी करत धावगती आटोक्यात ठेवली. ऋतुराज गायकवाडने १६ चेंडूत २६ तर कॉनवेने २५ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. दोन्ही सलामी फलंदाजांना नूर अहमदने माघारी पाठवले.

हे दोघे बाद झाल्यानंतर अजिंक्य राहणे आणि शिवम दुबे यांनी फटकेबाजी करत संघाला लक्ष्याच्या जवळ नेले. शेवटच्या काही षटकात मोहित शर्माने सामना गुजरातच्या बाजूला झुकवला असला असे वाटत असतांनाच रवींद्र जडेजा संघाच्या मदतीला धावून आला. शेवटच्या दोन चेंडूंवर चेन्नईला विजयासाठी दहा धावांची गरज होती. जडेजाने षटकार आणि चौकार लगावत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. महत्वाच्या सामन्यात दबाव झेलत रवींद्र जडेजा संघासाठी धावून आला आणि संघाला पाचवे आयपीएल चषक मिळवून दिले.(CSK vs GT)

========

हे देखील वाचा : IPL मध्ये आतापर्यंत ‘या’ खेळाडूंनी पटकावली आहे ऑरेंज कॅप

========

तत्पूर्वी चेन्नईकडून महिषा पथिराना सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. ४ षटकात ४४ धावा मोजत त्याने २ बळी मिळवले. रवींद्र जडेजा आणि दिपक चहर यांनी प्रत्येकी एक बळी मिळवत त्याला योग्य साथ दिली. मोहित शर्मा गुजरातच्या गोलंदाजीचा हिरो ठरला. सामना हातातून गेला आहे असे वाटत असतांना त्याने गुजरातच्या बाजूने सामना वळवत ३ षटकात ३६ धावा मोजत ३ बळी मिळवले. नूर अहमदने देखील १७ धावांच्या मोबदल्यात २ फलंदाजांना माघारी पाठवले.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.