सनातन धर्मात चार धाम यात्रा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. हा चारधाम यात्रा करणा-या व्यक्तीला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्तता मिळते, असे मानले जाते. चारधाम यात्रा आठवड्याभरातच सुरु होत असून या यात्रेसाठी 19 लाखांहून अधिक भाविकांनी नोंदणी केल्याची माहिती आहे. हिंदू धर्मात, चार धाम यात्रा अत्यंत पवित्र मानली जाते. ही यात्रा आत्मशुद्धी आणि मोक्षप्राप्तीचे साधन मानले जाते. असे असले तरी ही यात्रा अत्यंत कठिण असते. बदलत्या हवामानाचा फटका या यात्रेतील भाविकांना बसतो. त्यामुळे ही यात्रा अधिक सुलभरित्या व्हावी यासाठी उत्तराखंड सरकारनं आधीच यात्रेकरुंना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला लाखो भाविकांनी पाठिंबा देत नोंदणी केली आहे. (Char Dham)
30 एप्रिल 2025 रोजी अक्षय्य तृतीया आहे. याच पवित्र दिवसापासून चारधार यात्रा सुरु होणार आहे. या यात्रेच्या सुरुवातीला गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दरवाजे सकाळी 10.30 मिनिटांनी उघडतील. या पवित्र क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी या दोन्ही धामवर आत्तापासूनच भाविक यायला लागले आहेत. याशिवाय केदारनाथ धामचे दरवाजे 2 मे रोजी सकाळी 7 वाजता उघडणार आहेत. तर चारधाम यात्रेमधील चौथे धाम असलेल्या बद्रीनाथ धामचे दरवाजे 4 मे रोजी उघडतील. या चारधाम यात्रेसाठी उत्तराखंड प्रशासन गेल्या चार महिन्यापासून मोठ्या प्रमाणात यात्रा मार्गावर सुविधा करण्यासाठी व्यस्त आहे. हा मार्ग कठिण असून दरवर्षी बदलत्या हवामानाचा फटका यात्रेकरुंना बसतो. शिवाय एकदम आलेल्या लाखो भाविकांमुळे सर्व यंत्रणाही ठप्प होण्याची भीती असते. (Latest News)
त्यामुळेच या चारधाम यात्रेसाठी येणा-या भाविकंनी आधी नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार 19 लाखांहून अधिक प्रवाशांनी चारधाम यात्रेसाठी नोंदणी केली आहे. यमुनोत्री आणि गंगोत्री धामसाठी 3 लाखांहून अधिक भाविकांनी नोंदणी केली आहे. केदारनाथसाठी सर्वाधिक भाविकांनी नोंदणी केली आहे. 6 लाख 48 हजारांहून अधिक लोकांनी केदारनाथसाठी नोंदणी केली आहे. या भाविकांच्या संख्येत या आठवड्यात वाढ होण्याचीही शक्यता आहे. हा भाविकांचा आकडा 10 लाखांपर्यंत जाईल, अशी शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे. याशिवाय, बद्रीनाथ धामसाठी 5 लाख 74 हजारांहून अधिक भाविकांनी नोंदणी केली आहे. यातही वाढ होण्याची शक्यता असल्यानं प्रशासनानं आपली तयारी या वाढीव भाविकांच्या संख्येनुसार सुरु केली आहे. (Char Dham)
याशिवाय उत्तराखंडराज्यातील हेमकुह साहिब हे तिर्थक्षेत्रही खूप महत्त्वाचे आहे. या हेमकुंड साहिबची यात्राही कठिण समजली जाते. या यात्रेसाठी यावर्षी 32 हजारांहून अधिक भाविकांनी नोंदणी केली आहे. चारधाम यात्रा ही उत्तराखंड राज्याची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख आहे. त्यामुळेच या यात्रेत सहभागी झालेल्या भाविकांना कुठलिही अडचण येऊ नये, म्हणून प्रशासन मेहनत घेत आहे. ही पवित्र चारधाम यात्रा यमुनोत्रीपासून सुरु होते. येथे यमुना नदीचा उगम होतो. यमुना नदी ही भारतातील सर्वात पवित्र नद्यांपैकी एक मानली जाते. यमुनाला भगवान सूर्याची कन्या आणि यमदेवाची बहीण म्हणूनही ओळखले जाते. येथे देवी यमुनाला समर्पित मंदिर आणि जानकीचट्टी येथील पवित्र उष्ण झरा प्रसिद्ध आहे. त्यानंतर यात्रा गंगा नदीचा उगम असलेल्या गंगोत्री येथे जाते. गंगोत्री हा चारधाम यात्रेचा दुसरा मुक्काम आहे. असे मानले जाते की, प्रवासादरम्यान गंगोत्री धामला भेट दिल्याने भक्ताचे सर्व पाप नष्ट होतात. येथे अतिशय सुंदर गंगा माता मंदिर आहे. त्यानंतर बहुतांश यात्रेकरु पवित्र अशा केदारनाथ यात्रेसाठी रवाना होतात. (Latest News)
केदारनाथ मंदिर हे भगवान शंकरांना समर्पित आहे. केदारनाथ मंदिर उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात आहे. पौराणिक कथेनुसार, हे मंदिर पांडवांनी बांधले होते. सध्याच्या मंदिराचे स्वरूप आदिगुरु शंकराचार्य यांनी 8 व्या शतकात बांधल्याची माहिती आहे. या मंदिराबाबत शिवपुराणात असा उल्लेख आहे की, या ठिकाणी भगवान विष्णूचे अवतार नर-नारायण दररोज पार्थिव शिवलिंग बनवून भगवान शिवाची पूजा करत असत. त्यामुळे या जागृत स्थानी मोठ्या संख्येनं भाविक दर्शनासाठी येतात. बद्रीनाथ धाम हे या यात्रेतील शेवटचे धाम आहे. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ धाम भगवान विष्णूला समर्पित आहे. येथे भगवान विष्णू 6 महिने विश्रांती घेतात, अशी मान्यता आहे. हे मंदिर 8 व्या शतकात आदि शंकराचार्य यांनी स्थापन केल्याची माहिती आहे. येथेच चारधाम यात्रेचा समारोप होतो. (Char Dham)
=======
हे देखील वाचा : Donald Trump : महासत्ता करणार भारताचे अनुकरण !
Palitana City : हे आहे जगातील एकमेव शाकाहारी शहर !
=======
चारधाम यात्रेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइनही नोंदणी करता येते. यासाठी हरिद्वार आणि ऋषिकेशमध्ये 20 नोंदणी केंद्रे उभारली आहेत. शिवाय उत्तराखंड सरकारच्या अधिकृत वेबसाइट, registrationandtouristcare.uk.gov.in द्वारे नोंदणी करण्याची सुविधा आहे. चार धाम यात्रेसाठी नोंदणीसाठी कोणतेही शुल्क नसल्याचेही उत्तराखंड सरकारनं जाहीर केले आहे. चारधाम यात्रा ही उत्तराखंडमधील चमोली, रुद्रप्रयाग आणि उत्तरकाशी या तीन जिल्ह्यांची आर्थिक वाहिनी म्हणून ओळखली जाते. शिवाय हरिद्वार, डेहराडून, टिहरी आणि पौडी जिल्ह्यातील हजारो नागरिक या यात्रेमधून आपली उपजिवीका करतात. (Latest News)