हिंदू धर्मामध्ये चारधाम यात्रेला अनन्य साधारण महत्त्व आहे. स्कंद पुराणातही या यात्रेचे महत्त्व सांगण्यात आले आहे. चारधामच्या (Chardham Yatra) दर्शनाने सर्व प्रकारची पापे नष्ट होतात असा उल्लेख ग्रंथांमध्ये केलेला आहे. प्राचीन काळापासून या चारधाम यात्रेला जाणा-या भाविकांची संख्या मोठी आहे. ही चारधाम यात्रा एप्रिल महिन्यात सुरु होत असून यात्रेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. गेल्यावर्षी चारधामयात्रेसाठी (Chardham Yatra) लाखाहून अधिक भाविक आले होते. मात्र यावेळी या यात्रेचे आयोजन सर्वाधिक आव्हानात्मक ठरणार आहे. कारण जोशीमठ येथे होत असलेली पडझड यामुळे अनेक हॉटेल्स आणि उपहारगृहे तोडण्यात आली आहेत. अशावेळी भाविकांची संख्या वाढली तर त्यांच्या रहाण्याचा प्रश्न उभा रहाणार आहे. अशावेळी भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून उत्तराखंड सरकार विविध योजना राबविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी ऑनलाईन बुकींगही सुरु करण्यात येणार आहे. भाविकांनी यात्रेसाठी बुकींग केल्यावर त्यांना ठराविक वेळ देण्यात येणार असून त्याचवेळेत भाविकांना दर्शन घेता येणार आहे, यामुळे या धार्मिक स्थळांवर होणारी भाविकांची जास्त गर्दी कमी करण्याचा प्रयत्न सरकारचा असणार आहे.
चारधाम यात्रेचे (Chardham Yatra) वेळापत्रक जाहीर झाले आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर यमुनोत्री धामचे दरवाजे उघडण्यात येणार आहेत. उत्तराखंड सरकारकडून या तारखांची औपचारिक घोषणा करण्यात आली. 22 एप्रिलला गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे उघडले जाणार आहेत. तर केदारनाथ धामचे दरवाजे 25 एप्रिलला आणि बद्रीनाथ धाम मंदिराचे दरवाजे 27 एप्रिलला उघडले जाणार आहेत.
या चारधाम यात्रेसाठी (Chardham Yatra) उत्तराखंड सरकारने जोरदार तयारी सुरू केली आहे. यावेळी सरकारपुढे बद्रीनाथ धाम आणि जोशीमठ येथे काम करण्याचे मोठे आव्हान आहे. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्वपार चालत आलेल्या परंपरा तंतोतत पाळल्या जातात. त्या परंपरा सांभाळत या नव्या आव्हानांना तोड द्यावे लागणार आहे. 22 एप्रिल अक्षय्य तृतीयेला, कृतिका नक्षत्रात 12.41 मिनिटांनी अभिजित मुहूर्तावर यमुनोत्री धामचे दरवाजे उघडल्यावर हजारो भाविक येथे दाखल होतील अशी शक्यता आहे. 22 एप्रिल रोजीच आई यमुनेची उत्सव डोली तिच्या मातृगृह म्हणजे खुशीमठ, खरसाळी येथून सकाळी 8.25 वाजता बंधू शनिदेव आणि सोमेश्वर महादेव यांच्या नेतृत्वाखाली यमुनोत्री धामसाठी निघणार आहे. याआधी 21 रोजी माँ गंगेच्या भोग मूर्तीचे गंगोत्रीकडे प्रस्थान होणार आहे. या तारखा जाहीर झाल्यावर उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रेच्या तयारीला वेग आला आहे. यात्रेकरूंच्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी सरकारने अनेक महत्त्वाच्या योजनांवर काम सुरू केले आहे. देश-विश्वातून येणाऱ्या यात्रेकरूंचा प्रवास सुरळीत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. चारधाम यात्रेला (Chardham Yatra) येणाऱ्या भाविकांची विक्रमी संख्या नोंद होईल अशी शक्यता असल्यानं सरकारनं त्यासाठी ऑनलाईन बुकींगची आणि तसेच दर्शनाचीही घोषणा केली आहे. याशिवाय काही अन्य सुविधाही सरकारतर्फे देण्यात येत आहेत. गंगोत्री धामला जाऊ न शकणारे भाविक गंगोत्री धामची आरती घरी बसून बघू शकरणार आहेत. चारधाम यात्रेदरम्यान (Chardham Yatra) आरतीचे थेट प्रक्षेपण उत्तराखंड पर्यटन विभागाच्या वेबसाइटवर दररोज केले जाणार आहे. यात्रा हंगामापूर्वीच आतापर्यंत साडेसहा लाखांहून अधिक भाविकांनी चारधामला (Chardham Yatra) भेट देण्यासाठी नोंदणी केली आहे. हा आकडा पाहता, यात्रा सुरू होईपर्यंत हा 15 लाखांच्या वर भाविक येतील असे सांगण्यात येते.
यावेळी, विशेषत: बद्रीनाथ धामच्या दर्शनासाठी, बद्रीनाथ धाममध्ये मास्टर प्लॅन अंतर्गत काम सुरू असल्याने भाविकांवर अनेक बंधने येणार आहेत. मास्टर प्लॅन अंतर्गत बद्रीनाथ धाममध्ये अनेक गेस्ट हाऊस, धर्मशाळा आणि हॉटेल्स पाडण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत भाविकांना तेथे थांबवण्यात काही अडचणी येऊ शकतात. भाविकांनी येतांना या सर्व अडचणींचा विचार करुनच नियोजन करावे असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे.
======
हे देखील वाचा : ब्रिटनमध्ये ‘हिंदू’ हे सर्वाधिक आरोग्यसंपन्न
=====
चारधाम यात्रा (Chardham Yatra) कधी आणि का सुरु झाली, हे जाणणेही उत्सुकतापूर्ण आहे. पौराणिक ग्रंथानुसार प्राचीन तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याने पौराणिक ज्ञान वाढते. प्राचीन संस्कृती जाणून घेण्याची संधी मिळते. ज्याचा लाभ दैनंदिन जीवनातील उपासनेत सापडतो. म्हणूनच चार धाम वेगवेगळ्या दिशांना स्थापन झाल्याचे सांगण्यात येते. यातील बद्रीनाथ धाम हे तीर्थक्षेत्र भगवान विष्णूंना, बद्रीनाथच्या रूपात समर्पित आहे. बद्रीनाथ अलकनंदा नदीच्या काठावर वसलेले आहे. त्याची स्थापना भगवान श्री राम यांनी केली असे मानले जाते. या मंदिरात नर-नारायणाची पूजा केली जाते आणि अखंड दीप प्रज्वलित केला जातो. बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडल्यावर सुमारे 6 महिने पूजा केल्यानंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दरवाजे पुन्हा बंद केले जातात.चारधाम यात्रा अत्यंत कठीण असली तरी भाविक मोठ्या संख्येनं ही यात्रा करण्यासाठी उत्तराखंडमध्ये दाखल होतात. यावर्षीही ही संख्या मोठी असणार आहे. मात्र जोशी मठ येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर या यात्रा नियोजनाचे आव्हान सरकारसमोर असणार आहे.
सई बने