Home » पंजाबमध्ये ‘अर्थपूर्ण’ सत्ताबदल

पंजाबमध्ये ‘अर्थपूर्ण’ सत्ताबदल

by Correspondent
0 comment
Charanjit Singh Channi | K Facts
Share

श्रीकांत नारायण

भारतीय जनता पक्ष, आपली सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री एकापाठोपाठ बदलत असतानाच काँग्रेसनेही पंजाबसारख्या महत्वाच्या राज्यात आपला मुख्यमंत्री अचानक बदलण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पायउतार व्हावे लागले.

त्यांच्याऐवजी काँग्रेसने चरणजितसिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांच्याकडे पंजाबची धुरा सोपविण्याचे निश्चित केल्यानंतर सोमवारी चन्नी यांचा नवे मुख्यमंत्री म्हणून शपथविधीही पार पडला. त्यांच्याबरोबर मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत अग्रेसर असलेले रणजितसिंग रंधवा आणि ओमप्रकाश सोनी या दोघांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला.

पंजाबमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होत असल्यामुळे त्या जिंकण्याच्या उद्देशाने काँग्रेसने हा सत्ताबदल केला असावा हे उघड आहे. नवे मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी हे अनुसूचित जातीचे प्रतिनिधित्व करीत असल्यामुळे काँग्रेसने निवडणूक जिंकण्याच्या हेतूने मुख्यमंत्रीपदासाठी ‘दलित कार्ड’ वापरल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेसची ती ‘खासियत’ यानिमित्ताने पुन्हा एकदा प्रकर्षाने दिसून आली.

प्रामुख्याने शीख समुदाय बहुसंख्याने असलेल्या पंजाबमध्ये, शिखांमधील अनुसूचित जातीच्या सदस्याला मुख्यमंत्री करून काँग्रेसने अकाली दल, भाजप आणि आम आदमी पार्टी या महत्वाच्या विरोधी पक्षांना निवडणूकपूर्व फेरीतच गारद करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय पंजाब बरोबरच उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक आदी राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसने पंजाबमध्ये दलित मुख्यमंत्री करून मतदारांना एक वेगळाच संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

Captain Amarinder Singh resigns as Punjab CM
Captain Amarinder Singh resigns as Punjab CM

२०१७ साली पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका काँग्रेसने कॅप्टन अमिरिंदर सिंग (Amarinder Singh) यांच्या नेतृत्वाखाली जिंकल्या खऱ्या मात्र त्यावेळी सत्तारूढ अकाली दलाबद्दल जनतेची असलेली सार्वत्रिक नाराजी हेच काँग्रेसच्या विजयामागचे खरे कारण होते. मात्र अमरिंदर सिंग यांनी तो आपल्या नेतृत्वाचा विजय असल्याचा आभास निर्माण केला आणि नंतर मुख्यमंत्री होऊन पंजाबमध्ये आपली निर्वेध सत्ता स्थापण्याचा प्रयत्न केला.

कॅप्टन अमरिंदर सिंग हे स्वतः पतियाळाचे ‘राजे’ असल्याने त्यांच्या कारभार राजेशाही थाटाचाच होता. शिवाय देशातील प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसची हार होत असल्यामुळे काँग्रेस पक्षश्रेष्ठीच गलितगात्र झाल्याच्या अवस्थेत होते त्यामुळे त्याचा त्यांना फायदा मिळत गेला. त्यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्याची धमकच कोणामध्ये नव्हती.

परंतु नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) या नव्या दमाच्या ‘कलाकारा’ ने भाजपमधून काँग्रेसमध्ये आल्यापासून त्यांच्या नेतृत्वाला विरोध करण्यास सुरुवात केली. सिद्धू यांना त्यांच्या लोकप्रियतेचा फायदाही मिळत गेला आणि अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाला सुरुंग लावण्यात त्यांना हळहळू यश मिळत गेले. त्यामुळे पंजाब काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी सुरू झाली होती काही महिन्यापूर्वी पंजाब प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नवज्योतसिंग सिद्धू यांची निवड करून काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वालाच आव्हान दिले.

त्यातच विधिमंडळ काँग्रेस पक्षामधील बहुसंख्य आमदार हे अमरिंदर सिंग यांच्या विरोधात असल्याचे त्याचवेळी स्पष्ट झाल्यामुळे काँग्रेस श्रेष्ठींनी पंजाबच्या नेतृत्वात बदल करण्याचा निर्णय घेतला असावा आणि त्यानुसार त्यांच्या जागी अमरिंदर सिंह यांच्याच मंत्रिमंडळात असलेले मंत्री चरणजितसिंह चन्नी यांच्याकडे पंजाबचे नेतृत्व सोपविण्यात आले.

अर्थात चन्नी यांची निवड करताना पक्षश्रेष्ठींनी नवज्योतसिंग सिद्धू यांनाही डावलल्याचे स्पष्ट झाले. कारण मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत सिद्धू हे स्वतःच गुडघ्याला बाशिंग बांधून होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी चैनी यांच्यासारख्या दलित व्यक्तीची निवड करून  त्यांच्यासकट सर्वांनाच चकित केले.

विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या नेतेपदी चरणजितसिंह चन्नी यांच्या निवडीची घोषणा करताना पंजाबचे प्रभारी हरिसिंग रावत यांनी पंजाबच्या आगामी निवडणुका चन्नी यांच्या मंत्रिमंडळाप्रमाणेच सिद्धू यांच्या लोकप्रिय नेतृत्वाखाली लढविल्या जातील असे जाहीर केले. आणि त्यांच्या या वक्तव्याने जणू काही विरोधी पक्षांना कोलीत मिळाल्यासारखे झाले.

बसपाच्या मायावती (Mayawati) तर यांनी खास पत्रकारपरिषद घेऊन काँग्रेसचा पंजाबच्या दलित मुख्यमंत्र्यांचा चेहरा हा केवळ ‘मुखवटा’ असल्याचा आरोप केला. अकाली दल, भाजप आणि ‘आप’ या पक्षांनीही त्यांच्या सुरात सूर मिळवून काँग्रेसच्या या निर्णयावर टीका केली. मात्र खुद्द मुख्यमंत्री चन्नी यांनी माझ्यासारख्याला मुख्यमंत्री करून काँग्रेसने ‘आम आदमी’ लाच प्राधान्य दिले असे सांगून त्यांच्या आरोपातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. पंजाबमध्ये आगामी काळात चन्नी यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी लागणार आहे हे मात्र निश्चित.

आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसने पंजाबमध्ये अर्थपूर्ण सत्तांतर केले असले तरी नजीकच्या काळात माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग कोणती भूमिका घेतात त्यावर बरेच काही अवलंबून आहे. मुख्यमंत्रीपद सोडावे लागल्यामुळे तीव्र नाराज झालेले अमरिंदरसिंग यांनी नवे मुख्यमंत्री चन्नी यांच्या शपथविधी समारंभावर बहिष्कार घातला होता.

Charanjit Singh Channi With Rahul Gandhi

ते लवकरच भाजपमध्ये जाऊ शकतात अशीही चर्चा लगेच सुरु झाली. तसे झाले तर भाजपला अनायासे पंजाबमधील एक मोठा नेता गळाला लागल्याचे समाधान मिळेल. कारण आगामी निवडणुकीत अकाली दल आणि भाजप यांच्यात पुन्हा युती होण्याची शक्यता फार कमी आहे. अशा वेळेला कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासारखा लोकमान्य नेता भाजपला मिळाला तर भाजपच्या दृष्टीने ती चांगलीच फायद्याची गोष्ट ठरणार आहे.

त्यामुळेच नजीकच्या काळात घडणाऱ्या राजकीय घडामोडीचे पंजाबच्या राजकारणावर दूरगामी परिणाम ठरू शकतात. काँग्रेसची सत्ता टिकणे हे देखील त्यावरच अवलंबून राहणार आहे.

– श्रीकांत नारायण
 (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.

=====

हे देखील वाचा: दोन ‘सरदारां’मधील संघर्ष – पंजाबमधील काँग्रेस ‘तरणार’ की बुडणार ?

=====


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.