भारतामध्ये प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर महाकुंभ होत असतांना अमेरिकेमध्येही त्रिवेणीनं आपला ठसा उमटवला आहे. हा एक अल्बम असून हिंदू धर्मातील मंत्र आणि संगीत यांचा अप्रतिम मिलाफ असलेल्या या त्रिवेणी अल्बमला ग्रॅमी पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आले आहे. अमेरिकेतील नॅशनल अकादमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स अँड सायन्सेस द्वारे देण्यात येणारा हा पुरस्कार ग्रॅमी नावानं प्रसिद्ध आहे. जगभरातील संगीत क्षेत्रातील मान्यवरांसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळणे हे सर्वात मोठी दाद असते. यावर्षीच्या ग्रॅमी पुरस्कार भारतीय-अमेरिकन संगीतकार चंद्रिका टंडन यांच्या त्रिवेणी या अल्बमला मिळाला आहे. (Chandrika Tandon)
या पुरस्काराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रिका टंडन यांचे अभिनंदन केले आहे. टंडन यांनी त्यांचे सहकारी दक्षिण आफ्रिकेचे बासरीवादक वॉटर केलरमन्स आणि जपानी व्हायोलिन वादक एरू मात्सुमोतो यांच्यासह हा पुरस्कार जिंकला आहे. जगभरातून करोडो चाहत्यांनी या त्रिवेणी अल्बमला पसंती दिली आहे. भारतीय संगीताची आणि मंत्रांची महती सांगणा-या या अल्बमला प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर महाकुंभ सुरु असतांना सन्मान मिळाल्यानं विशेष आनंद व्यक्त करण्यात येत आहे. (International News)
अमेरिकेत झालेल्या 67 व्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये चंद्रिका टंडन यांच्या त्रिवेणी अल्बमला सर्वोत्कृष्ट न्यू एज अल्बम या श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कार मिळाला आहे. त्रिवेणी अल्बममध्ये भारतीय प्राचीन मंत्रांना बासुंरी आणि अन्य वाद्याच्या तालात गुंफण्यात आले आहे. व्यावसायिक आणि गायिका असलेल्या चंद्रिका टंडन यांच्या या अल्बमला अनेकांनी पसंतीची पावती दिली आहे. आता त्यावर ग्रॅमीचा ठसा उमटल्यानं पुन्हा एकदा भारतीय संगीत आणि मंत्रांची जादू जगभर पसरली आहे. चंद्रिका टंडन या पेप्सिकोच्या माजी सीईओ इंद्रा नूयी यांच्या मोठ्या भगिनी आहेत. त्रिवणीला मिळालेल्या ग्रॅमी पुरस्कारानं या सर्व कुटुंबाला आनंद झाला असून हा भारतीय संस्कृतीचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले आहे. (Chandrika Tandon)
चंद्रिका टंडन यांचा जन्म चेन्नई येथील एका सनातनी तमिळ ब्राह्मण कुटुंबात झाला आहे. त्यांची आई संगीतकार होती तर वडील स्टेट बँकर होते. चंद्रिका यांचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर वयाच्या 18 व्या वर्षी लग्न ठरवण्याते आले होते. मात्र चंद्रिका यांनी उच्च शिक्षण घेतल्यावरच लग्न करणार अशी भूमिका घेतली. आपला हा हट्ट पूर्ण कऱण्यासाठी त्यांनी दोन दिवस उपोषण केले. अखेर आईनं त्यांची मागणी मान्य केल्यावर त्यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेतले. चंद्रिका यांचे आजोबा, चेन्नई येथे न्यायाधिश होते, तसेच चंद्रिका यांनाही व्हायचे होते. मात्र त्यांच्या एका शिक्षकानं आयआयएममध्ये प्रवेश घ्यावा असा आग्रह केला. त्यामुळे चंद्रिका यांनी आयआयएम अहमदाबादमध्ये प्रवेश घेतला. (International News)
1975 मध्ये आयआयएममधून पदवी घेतल्यानंतर, चंद्रिका टंडन यांनी लेबनीज यादवी युद्धादरम्यान बेरूतमधील सिटी बँकेत एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केले. वयाच्या चोवीसव्या वर्षी त्यांना न्यू यॉर्क शहरातील मॅककिन्से अँड कंपनीमध्ये नोकरीची ऑफर देण्यात आली आणि त्या कंपनीत भागीदार झाल्या. असे पद मिळणा-या त्या पहिली भारतीय-अमेरिकन आहेत. यासर्वात त्यांची संगिताची आराधनाही सुरु होती. शास्त्रीय गायिका शुभ्रा गुहा आणि गायक गिरीश वाजलवार यांच्याकडून चंद्रिका यांनी संगीताचे शिक्षण घेतले आहे. त्यांच्या गाण्यावर हिंदुस्थानी, कर्नाटक आणि पाश्चात्य संगिताचा प्रभाव आहे. चंद्रिका यांनी 2009 मध्ये पहिला अल्बम रिलीज केला. त्यानंतर 2010 मध्ये ‘ओम नमो नारायण: सोल कॉल’ हा त्यांचा अल्बम आला. या अल्बमसाठी चंद्रिका यांना पहिल्यांदा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. आता वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी त्रिवणी अल्बम रिलीज केला. या अल्बमला ग्रॅमी पुरस्कार मिळाल्यानं चंद्रिका यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्रिवेणी हा चंद्रिका यांचा सहावा अल्बम आहे. (Chandrika Tandon)
==============
हे देखील वाचा : Marie Curie या महान महिलेमुळे कॅन्सरग्रस्तांवर यशस्वी उपचार होत आहेत !
Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !
===============
चंद्रिका टंडन या गाण्यासाठी जेवढ्या ओळखल्या जातात, तेवढ्याच उद्योजिका म्हणूनही त्यांची जगभर ओळख आहे. 2015 मध्ये चंद्रिका टंडन आणि त्यांचे पती रंजन टंडन यांनी एनवाययू पॉलिटेक्निक स्कूल ऑफ इंजिनिअरिंगला 100 दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली. तेव्हापासून या कॉलेजचे नाव एनवाययू टंडन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग असे आहे. अमेरिकेत भारतीय अमेरिकन व्यक्तीने दिलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठे देणगी आहे. चंद्रिका टंडन यांनी न्यू यॉर्क विद्यापीठ, एनवाययू लँगोन हेल्थ, अमेरिकन इंडिया फाउंडेशनचे विश्वस्त म्हणून काम केले आहे. शिवाय प्रतिष्ठित अशा येल विद्यापीठातील अध्यक्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रियाकलाप परिषदेचे आणि बर्कली कॉलेज ऑफ म्युझिकमधील अध्यक्षांच्या सल्लागार परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. (International News)
सई बने