मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली आहे. महाराष्ट्र सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे. मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात बुधवारी सुनावणी झाली. वर्ष 2020-21 साठी मराठा आरक्षण स्थगित करण्यात आल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. पदव्युत्तर आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे यावर निर्णय घेता येणार नाही, पण वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमामध्ये मराठा आरक्षणाचा लाभ देता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.
सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारव घणाघाती टीका केली आहे. राज्याच्या इतिहासात मराठा समाजाच्या दृष्टीनं आणि संपूर्ण राज्याच्या दृष्टीनं आजचा ‘काळा दिवस’ असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितलं की, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा आमच्या सरकारनं टिकणारे आरक्षण दिलं होतं. मुंबई हायकोर्टानं आमची बाजू मान्य केली होती. मुंबई हायकोर्टानं मान्यतेची मोहोर उठवली होती. मात्र, ‘महाभकास’ आघाडीला हे आरक्षण टिकवता आलं नाही, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी घणाघाती टीका केली.
तात्पुरती स्थगिती हा शब्द योग्य नाही आहे. खंडपीठाचा निकाल लागेपर्यंत आता आरक्षण नाही. आता याबद्दल आंदोलन करुनही उपयोग नाही आहे. आम्ही याविषयी आग्रह धरत होतो, पण आम्ही तयारी केलीये असं फक्त ट्वीट करून अशोक चव्हाण हे फक्त सांगत होते. सरकारनं स्वत: हून घटनात्मक खंडपीठाकडे जावं असा अर्ज केला नाही, इतर राज्यांच्या आरक्षणाला स्थगिती नाही आहे. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारला हे आरक्षण नको होतं, असा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
अभिनेत्री कंगना रणौत हिनं मुंबईची तुलना पीओकेशी केली. तिच्या वक्तव्याबद्दल आम्ही सहमत नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. मात्र, कंगनाच्या मागे हे एखाद्या लांडग्यासारखे लागले आहेत. हे वागणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना शोभणारे नाही, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली.
कायद्यानं कारवाई करता आली असती. पण ही दादागिरी चालणार नाही. कोणीही कोर्टात जाऊ शकत होतं. फक्त एकट्या कंगनाचंच अनधिकृत बांधकाम आहे का, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थित केला आहे. कोरोना काळात एकही अशी कारवाई करु नये असं सांगितलं आहे. तरी कारवाई करण्यात आली.