हिमाचल प्रदेशमध्ये पर्यटनासाठी जाणा-या पर्यटकांची संख्या वाढली आहे. देशात गरमीचा सिझन सुरु झाला की हिमाचल प्रदेशाकडे पर्यटकांच पावले वळतात. यासोबतच येथील मंदिरांमध्येही जाणा-या भाविकांची संख्या मोठी असते. हिमाचल प्रदेशमधील पर्वतरांगामध्ये अनेक पौराणिक वारसा असलेली मंदिरे आहेत. असेच एक मंदिर हिमाचल प्रदेशमधील सुंदर पर्वतरांगांमध्ये आहे, ज्याच्या भोवती अनेक रहस्यमयी कथा आहेत. हे मंदिर देवी दुर्गादेवीला समर्पित आहे. स्थानिक भाषेत या मंदिराला देवी चांदी माता मंदिर म्हटले जाते. दरवर्षी हजारो भाविक चांदी मंदिराला भेट देतात. मंदिरात दगडापासून बनवलेली चांदी देवीची प्राचीन मुर्ती आहे. अष्टभुजा असलेली देवीची ही मुर्ती स्वयंभू असल्याची माहिती आहे. यासोबत या मंदिरात भगवान विष्णूची मूर्ती देखील स्थापित आहे. हिमाचल प्रदेशातील कारसोग येथील देवी चांदी माता मंदिर रहस्यमय आणि प्राचीन वारसा सांगणारे आहे. या मंदिराचा नकाशा हा चक्क मुंग्यांनी काढून दिला होता, असे स्थानिक भाविक सांगतात. या मंदिराबाबत अजून एक आख्यायिका आहे, ती म्हणजे, या मंदिरात प्रार्थना कऱण्यासाठी आलेल्या निपुत्रिक जोडप्यांना देवीच्या कृपेनं मूल होते. (Chandi Mata Temple)
हे मंदिर शिमल्यापासून काही अंतरावर आहे. त्यामुळे शिमल्यामध्ये जगभरातून येणारे पर्यटक या चांदी माता मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येतात. वर्षभर या मंदिरात भाविकांची गर्दी असते. लाकडाच्या सहाय्यानं बांधलेले हे मंदिर वास्तूकलेचा अद्भूत नमुना म्हणूनही ओळखले जाते. यावरील कलाकुसर आणि मंदिराची बांधणी हा अभ्यासाचा विषाय ठरला आहे. चांदी माता मंदिर हे हिमाचल प्रदेशातील कारसोगच्या टेकड्यांमध्ये वसलेले एक रहस्यमय मंदिर म्हणून ओळखले जाते. ती देवी दुर्गा मातेचे रुप समजले जाते. शिमल्याहून हे मंदिर अवघे 13 किलोमीटर अंतरावर आहे. कारसोग हे गाव निसर्गसंपन्न आहे. या गावातील हे मंदिरही तेवढेच सुंदर आहे. काससोग गाव सफरचंदाच्या बागा आणि वृक्षांच्या जंगलांनी वेढलेले आहे. या भागात कस्तुरी मृग, घोरल, अस्वल असे अनेक प्राणी दिसून येतात. शिवाय या जंगलात मोठ्या प्रमाणात पक्षांचे वास्तव्य आहे. त्यामुळे वन्यप्रेमी हमखास या भागाला भेट देतात. याच सुंदर भागात देवी चांदी माता मंदिर आहे. हे मंदिर अनेक रहस्यांनी भरलेले आहे. त्यामुळे येथे येणा-या भाविकांची संख्या अधिक आहे. (Marathi News)
या मंदिराबाबत एक आख्यायिका कायम सांगितली जाते, ती म्हणजे या चांदी माता मंदिराचा नकाशा कोणी मनुष्यानं तयार केला नाही तर चक्क मुंग्यांनी तयार केल्याचे सांगण्यात येते. प्राचीन कथेनुसार येथे देवी एका लहान मुलीच्या रूपात प्रकट झाली. देवीनं मग मुंग्यांची दोरी बनवून नकाशा तयार केला आणि या मंदिराची उभारणी केली. शिवाय देवीनं पंडितांना स्वप्नात नकाशाची माहिती दिली होती. मंदिरासोबत बांधलेल्या तलावाचा आणि भांडाराचा नकाशाही मुंग्यांनी तयार केल्याचे स्थानिक सांगतात. हे सर्व मंदिर लाकडापासून तयार केलेले आहे. मंदिराच्या छतावर देवीदेवतांची चित्रे कोरलेली आहेत. या भागात दिसणा-या हरणाच्या अनेक प्रतिकृती मंदिरात आहेत. शिवाय मंदिराच्या छतावर उडणारे गरुड चितरण्यात आले आहेत. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर वाघांचे लाकडी पुतळे बसवलेले आहेत. याशिवाय मंदिराच्या गर्भगृहातील भींतींवर हिंदू धर्मग्रंथातील कथांवरुन चित्रे काढण्यात आली आहेत. या मंदिराबाहेर एक पायऱ्यांची विहीर आहे. ही विहिरही माता चांदी देवीनं स्वतः बांधली असल्याची भाविकांची धारणा आहे. (Chandi Mata Temple)
=======
हे देखील वाचा : Donald Trump : महासत्ता करणार भारताचे अनुकरण !
वयाच्या 20 व्या वर्षात मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे का महत्वाचे?
=======
त्यामुळे या विहिरीतील पाणी हे पवित्र समजले जाते. या मंदिराबाबत आणखी एक आख्यायिका सांगितली जाते की, हे मंदिर सोडून माता चांदी देवी कुठेही जात नाही. पौराणिक कथेनुसार, एकदा सुकेत राज्याचे राजा लक्ष्मण सेन यांनी देवीला सुंदरनगरला आणण्याचा प्रयत्न केला. देवीची मुर्ती प्रथम लाकडी होती, ती मुर्ती एवढी जड झाली की राजाच्या कुठल्याही सेवकला ती उचलात येईना. राजानं देवीची इच्छा न ओळखता, तिला या मंदिरातून जबरदस्तीनं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दाराच्या चौकटीतून बाहेर पडताच, अष्टधातुची मूर्ती काळी पडली. त्यानंतर देवीचा कोप झाला. मात्र राजानं माफी मागितली. पण तेव्हापासून देवीची मुर्ती ही दगडाची झाली आहे. ऑगस्ट महिन्यातील 2 ते 4 या काळात देवीचे मेळा भरतो, तेव्हाच देवी आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी मंदिराबाहेर येते. बाकी बाराही महिने देवीचे हे मंदिर भाविकांसाठी खुले असते. संपूर्ण लाकडी बांधकाम असलेले हे मंदिर अनेक वर्ष जसे आहे, तसेच भक्कम आहे. हा सुद्धा देवीचा एक चमत्कार असल्याची भावना स्थानिकांमध्ये आहे. यामुळेच या देवीचे दर्शन घेण्यासाठी देशभरातील भाविक मोठ्या संख्येनं येतात. (Marathi News)
सई बने