Home » ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर परेश पटेल यांच्या पहिल्या ऑडीशनचा भन्नाट किस्सा 

‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर परेश पटेल यांच्या पहिल्या ऑडीशनचा भन्नाट किस्सा 

by Team Gajawaja
0 comment
परेश पटेल
Share

महाराष्ट्रभर सध्या चर्चा आहे ती आगामी ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ या मराठी चित्रपटाची. या चित्रपटामध्ये अंकुश चौधरी, प्राजक्ता माळी, शुभा खोटे, प्रिया बेर्डे, संजय मोने, आनंद इंगळे यांच्यासह अनेक नामवंत कलाकार आहेत. याचसोबत या चित्रपटाचं अजून एक वैशिष्टय म्हणजे या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर आहेत ‘मिसाइल मॅन अवॉर्ड २०२१’ पुरस्कार विजेते परेश अशोक पटेल. ‘मिसाइल मॅन अवॉर्ड २०२१’ हा पुरस्कार माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या नावे दिला जातो. 

गेल्या ७ वर्षांपेक्षा अधिक काळ मनोरंजनसृष्टीत कास्टिंग डायरेक्टर म्हणून कार्यरत असणारे परेशजी म्हणजे एक बहुआयामी व्यक्तिमत्व! परेश एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आले. घरात चित्रपटसृष्टीशी निगडित कोणतेही वातावरण नव्हते. 

एकदा शाळेत असताना वास्तव चित्रपटातील एक प्रसंग त्यांनी परफॉर्म केला त्यांनतर त्यांचे प्रचंड कौतुक झाले. या प्रसंगानंतर त्यांच्या मनात अभिनयाची आवड आणि आत्मविश्वास निर्माण झाला. कॉलेजमध्ये असताना त्यांना ऑडिशन देण्यासाठी बोलविण्यात आलं. या क्षेत्राबद्दल काहीही माहिती नसल्यामुळे ऑडिशन कशी देतात, स्क्रीन टेस्ट म्हणजे काय, या साऱ्याबद्दल ते अनभिज्ञ होते. 

ऑडिशनला गेल्यावर परेश यांच्या हातात डायलॉगचा कागद देण्यात आला आणि त्यांना बाहेर जायला सांगितले. बाहेर गेल्यावर त्यांनी बघितलं, तिथे आलेल्या सर्वांच्याच हातात एकाच डायलॉगचा कागद होता. यासंदर्भात त्यांनी विचारणा केली असता त्यांना कळलं की, ऑडिशन अशीच असते. तरुण वय होतं त्यामुळे हे ऐकून डोक्यात एक वेगळीच सणक गेली आणि ते तिथून तडक निघून आले. 

यानंतर परेशजींनी आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. हातात डिग्री आल्यावर त्यांना ‘Topsline 1252’ या कंपनीमध्ये नोकरी मिळाली. नोकरीदरम्यान कामानिमित्त त्यांचा अनेक सेलिब्रेटींशी संबंध येत असे.  या नोकरीदरम्यान त्यांचा संगीतकार राजेश रोशनजी यांच्याशी परिचय झाला आणि इथेच त्यांच्या आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली. 

राजेश रोशनजी यांनी परेशजींची हुशारी बघून त्यांना सेक्रेटरी बनवायचे ठरवले. परेशजींनीदेखील ही ऑफर स्वीकारली. जवळपास अडीच वर्ष ते राजेश रोशनजी यांचे सेक्रेटरी होते. क्रिश ३ या चित्रपटाच्या म्युझिक टिमचाही ते एक भाग होते. 

चित्रपटसृष्टीची दुनिया खूप मोठी आहे. चित्रपटसृष्टी म्हणजे कलाकार, डायरेक्टर, निर्माता, गायक, गायिका, संगीतकार, कॅमेरामन एवढीच ठराविक मंडळी नाहीत. यामध्ये अनेक महत्वाच्या ‘भूमिका’  असतात, त्यापैकीच एक म्हणजे कास्टिंग डायरेक्टर! जाहिरात, चित्रपट किंवा टीव्ही मालिकेतील पात्रांच्या निवडीमध्ये कास्टिंग डायरेक्टरचा मोठा वाटा असतो. 

राजेश रोशनजी यांचे सेक्रेटरीपद सोडल्यावर परेशजींनी कास्टिंग डायरेक्टरच्या भूमिकेमध्ये प्रवेश केला. स्टार प्लस वाहिनीच्या ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेसाठी त्यांनी  कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केले. कास्टिंग डायरेक्टर म्हणून ‘साथ निभाना साथिया’ ही त्यांची पहिली हिंदी, तर झी युवावरील ‘शौर्य’ ही त्यांची पहिली मराठी मालिका होती. ‘झांगडगुत्ता’ या चित्रपटाच्या रूपाने त्यांना मराठी चित्रपटसृष्टीत कास्टिंग डायरेक्टर म्हणून संधी मिळाली. त्यांनतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. 

परेशजींनी आजवर दोन हिंदी चित्रपटांसह अर्धा डझनपेक्षा जास्त मराठी चित्रपटांसाठी, तसेच १५ पेक्षा जास्त टेलिव्हिजन शो आणि २० पेक्षा जास्त जाहिरातींसाठी कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केले आहे. याशिवाय काही कार्यक्रमांसाठी त्यांनी आर्टिस्ट मॅनेजरचं कामही केलं आहे. यामध्ये प्राजक्ता माळी हीचा पहिला वहिला हिंदी शो Bollylands.com (MX player), स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२१, स्टार प्रवाह महागणेश उत्सव २०२१, सोनी मराठी कुटुंब दिवाळी सोहळा २०२१, स्टार प्रवाह धूम धडाका न्यू इअर इव्हेंट अशा लोकप्रिय कार्यक्रमांचा, तर ‘लकडाऊन बी -पॉझिटिव्ह’ या आगामी चित्रपटाचा समावेश आहे. 

====

हे देखील वाचा: माझी मेहनत १०० पटीने जास्त असणार आहे – अभिज्ञा भावे

====

मार्च २०२० मध्ये सुरु झालेल्या कोरोना नावाच्या अभूतपूर्व संकटाने अनेकांच्या आयुष्यात वादळ आणले. तेव्हा सिनेसृष्टीतील कित्येकांनी पुढे येऊन कित्येक गरजूंना मदतीचा हात दिला. परेशजी यात मागे कसे राहतील? त्यांनी २०२० मध्ये पुण्यातील महात्मा गांधी अंध शाळेसाठी “बस कुछ दिनों कि बात है” हे शैक्षणिक गाणे तयार केले. हे गाणे झी म्युझिक चॅनेलवर प्रसारित करण्यात आले. या गाण्यासाठी झी म्युझिककडून मिळालेली सर्व रक्कम त्यांनी या अंध शाळेला दिली होती. 

====

हे देखील वाचा: सोयरीक चित्रपटाच्या शानदार प्रिमियरला नामवंत कलाकारांची हजेरी.

====

परेश अशोक पटेल यांचे बालपण मुंबईतच गेल्यामुळे त्यांना मराठी भाषेबद्दल विशेष प्रेम आहे. सध्या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकारांकडून त्यांना ‘सेलिब्रेटी मॅनेजमेंट’ करण्यासंदर्भात विचारणा होत आहे. ऑडिशन न देताच गेलेले परेशजी अखेर मनोरंजनाच्या दुनियेचा भाग बनलेच!


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.