Home » युरोपवर कॅमल फ्लूचे संकट…

युरोपवर कॅमल फ्लूचे संकट…

by Team Gajawaja
0 comment
Camel Flu
Share

कतारमध्ये जागतिक फुटबॉल स्पर्धा रंगात आली आहे.  आता काही दिवसातच महाअंतिम मुकाबला होणार आहे.  कतार देशानं यासाठी अभूतपूर्व अशी तयारी केली आहे.  अवघं कतारच नव्हे तर आजुबाजुचे देशही या फुटबॉल फिव्हर मध्ये रंगून गेले आहेत. असे असले तरी या फिव्हर सोबत आणखी एका फिव्हरनं जागतिक आरोग्य संघटनेची धाकधूक वाढवली आहे. हा आहे, कॅमल फ्लू. कोरोनापेक्षाही या कॅमल फ्लूच्या (Camel Flu) संसर्गाची शक्यता अधिक असल्यानं ही भीती अधिक वाढली आहे.  2012 मध्ये पहिल्यांदा सौदी अरेबियामध्ये MERS विषाणूचे अर्थात कॅमल फ्लूचे(Camel Flu) प्रकरण समोर आले. हा श्वसनाचा आजार असून लंडऩ आणि ऑस्ट्रेलियामध्ये सध्या या तापाचे रुग्ण आढळले आहेत.  WHO कडे नोंदवलेल्या MERS प्रकरणांपैकी अंदाजे 35 टक्के मृत्यू झाले आहेत. कोरोनानंतर या कॅमल फ्लूने थैमान घातले आहे.  लंडनच्या डॉक्टरांनही फिफा विश्वचषक बघून येणा-या चाहत्यांमध्ये कॅमल फ्लूबाबत (Camel Flu) सावधानता बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत.  

कतारमध्ये होणाऱा फिफा विश्वचषक ऐन रंगात आल्यावर आता त्यावर कॅमल फ्लूचे (Camel Flu) सावट पसरले आहे. फुटबॉलचे सामने बघून परतणाऱ्या चाहत्यांनी कॅमल फ्लूपासून दूर राहून योग्य ती तपासणी करुन घ्यावी यासाठी आता ऑस्ट्रेलियामध्येही आवाहन करण्यात येत आहे.  तसेच कतारहून परतणाऱ्या फुटबॉल चाहत्यांना जगातील आरोग्य संघटनेनंही इशारा दिला आहे. कतारहून आपापल्या देशात परतणाऱ्या सर्व चाहत्यांनी MERS बद्दल माहिती करुन घेण्याचेही आवाहन आता करण्यात येत आहे. यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी (यूकेएचएसए) ने डॉक्टरांना ताप आणि श्वासोच्छवासाचा त्रास असलेल्या लोकांचा शोध घेण्यास सांगितले आहे. कोरोनानंतर आता सर्व जग सावरले आहे. अशातच कोरोनापेक्षाही दहापट संसर्गाची क्षमता असलेला हा कॅमल फ्लू पसरला तर त्याचा पुन्हा परिणाम होऊन अर्थव्यवस्थेला जबर फटका बसू शकतो.  त्यामुळेच धास्तावलेल्या आरोग्य संघटना आता कतारहून परतणा-या फुटबॉलप्रेमींना आवश्यक त्या सूचना देत आहेत.  

ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य मंत्रालयाने त्यांच्या वेबसाइटवर कतारहून परत आलेल्या चाहत्यांसाठी काय काय काळजी घ्यावी याची मोठी यादीच जाहीर केली आहे. कतारहून परतलेल्या नागरिकांनी  स्वच्छतेचे पालन करावे तसेच ज्यांचा उंटांबरोबर संपर्क झाला असेल, त्यांनी विशेष काळजी घ्यावी असेही आवाहन आहे.  

======

हे देखील वाचा : ट्युनीशियातील आर्थिक आणि राजकीय संकटाची काय कारणं आहेत?

======

आत्तापर्यंत जगभरात MERS प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनाही सतर्क झाली आहे. एप्रिल 2012 ते ऑक्टोबर 2022 पर्यंत, जागतिक आरोग्य संघटनेने MERS-CoV चे 2,600 रुग्ण नोंदवले असून त्यामध्ये 935 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  2012 मध्ये पहिल्यांदा सौदी अरेबियामध्ये MERS विषाणूचे प्रकरण समोर आले.  हा श्वसनाचा आजार आहे.  हा देखील एक प्रकारचा कोरोना विषाणू आहे.  विशेष म्हणजे कोविडपेक्षाही हा विषाणू धोकादायक मानला जातो.  त्याचवेळी जागतिक आरोग्य संघटनेनं या कॅमल फ्लू बाबत धोक्याचा इशारा दिला होता.  मात्र तेव्हा फार फैलाव न झालेला हा विषाणू आता फिफा विश्वचषकाच्या निमित्तानं जमा झालेल्या लाखो-करोडो लोकांच्या गर्दीमुळे अधिक फैलावण्याचा धोका आहे.  कोरोनाप्रमाणेच या कॅमल फ्लूमध्ये (Camel Flu) ताप आणि श्वास घेण्यास अडचण येण्याचा धोका असतो.  त्यामुळे फिफा विश्वचषकाचे चाहते कतारहून परत आल्यावर इंग्लंडमध्ये त्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.  तसेच वैद्यकीय कर्मचा-यांना या फिफा चाहत्यांवर लक्ष ठेवण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.  फिफा बघण्यासाठी गेलेले चाहते, कतार आणि आसपासच्या आखाती देशात पर्यटनही करुन आले आहेत. आखाती देशातील पर्यटनात उंटांवरुन करण्यात येणारी सफारी हा मुख्य आकर्षणाचा विषय असतो आणि हजारो पर्यटकांनी हा आनंद लुटला आहे. आता त्याच पर्यटकांना कॅमल फ्लूचा (Camel Flu) धोका जास्त असल्याची माहिती पुढे आली आहे.  हा आजार कोविड-19 पेक्षा प्राणघातक असून त्यात मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.  

आत्ता कुठे कोरोनाचे नाव पुसण्यास सुरुवात झाली असतांना कॅमल फ्लू नावाचं संकंट पुन्हा आलं आहे.  या कॅमल फ्लूचा झपाटा बघितल्यावर वर्षाअखेरपर्यंत कॅमल फ्लू किती थैमान घालू शकतो याचा अंदाज येणार आहे.  कारण आत्तापर्यंत फिफा बघण्यासाठी गेलेले फुटबॉलचे फक्त दहा टक्के चाहते आपापल्या देशात परत आले आहेत.  18 तारखेला विश्वचषकाचा अंतिम सामना झाल्यावर हे पर्यटक परत येण्यास सुरुवात होणार आहे. त्यानंतर पंधरा दिवसात कॅमल फ्लू किती फैलावू शकतो, हे स्पष्ट होणार आहे. अर्थात त्यामुळे नव्या वर्षाच्या स्वागतावर या कॅमल फ्लूचा धोका कायम रहाणार आहे.

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.