सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ निखळ मनोरंजन करणा-या कार्येक्रमाची प्रेक्षक कायमच आतुरतेनं वाट बघत असतात. कसलेले कलाकार, उत्तम स्क्रिप्ट, त्यांची हलकीफुलकी मांडणी, विनोदाचं अचूक टायमिंग आणि या सर्वांना दाद देणारे परिक्षक अशा अनेक गोष्टींमुळे या कार्येक्रमाने अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत असा स्वतःचा एक वेगळाच प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे.
कार्येक्रमातील समीर चौघुले, पंढरीनाथ कांबळे, रसिका वेंगुर्लेकर, निमिष कुलकर्णी आणि इतरही सर्वच कलाकार आणि ते साकारतात ती पात्रं हास्यरसिकांमध्ये तुफान लोकप्रिय आहेत. प्रत्येकाचीच स्वतःची अशी काहीतरी खासियत आहे. आणि त्यामुळेच प्रत्येक पात्राचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. मंचावर कितीही गंभीर परिस्थिती निर्माण झाली असली तरीदेखील समोरच्याला काहीच क्षणात पोट धरून हसायला लावायचं ही ‘विशाखा सुभेदार’ हिची खासियत! त्यामुळेच तिचा मोठा चाहतावर्ग आहे.
====
हे देखील वाचा: लगन’ चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर प्रदर्शित
====
मात्र गेल्या काही दिवसांपासून हास्यरसिक काहीसे नाराज झाले आहेत. याला कारणदेखील तसंच आहे. काहीच दिवसांपूर्वी सगळ्यांची लाडकी ‘विशाखा सुभेदार’ हिने कार्येक्रम सोडणार असल्याचे जाहीर केले. आवडती, खळखळून हसवणारी विशाखा आता हास्यजत्रेत दिसणार नाही या कारणामुळे तिच्या चाहत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. परंतु तिच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर! लवकरच विशाखा आपल्याला एका नव्या रुपात, नव्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
यामध्ये तिच्यासोबत असणार आहे ‘C.I.D.’ फेम दया म्हणजेच दयानंद शेट्टी! ”दया दरवाजा तोड दो” असं म्हणताच एका लाथेनं दरवाजा तोडणा-या दयाचा हिंदी प्रमाणेच मराठीतही मोठा प्रेक्षकवर्ग आहे. लहान मुलांमध्ये तर त्याची खुपचं क्रेझ आहे. दया यापूर्वी ‘सिंघम रिटर्न्स’ मध्ये झळकला होता. आता तो मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे.
====
हे देखील वाचा: स्नेहल तरडे साकारणार “सौ. लक्ष्मीबाई हंबीरराव मोहिते”
====
मराठी पडद्यावर दया काय धुमाकूळ घालतोय हे पाहणं आता रंजक ठरणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटात अंशुमन विचारे, विजय पाटकर, आदित्य पैठणकर, श्रद्धा महाजन, कमलेश सावंत आदी कलाकार देखील दिसणार आहेत. या चित्रपटाबद्दल अद्याप अधिक माहिती समोर आली नसली तरी कलाकारांच्या नावावरुनच हा चित्रपट काय असेल याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.