पाकिस्तानमध्ये आता जे अराजकतेचे वातावरण आहे, त्यासाठी एक महिला जबाबदार असल्याचा आरोप पाकिस्तान सरकारतर्फे करण्यात येत आहे. या महिलेचे नाव आहे बुशरा बीबी. पाकिस्तानचे माजी पतंप्रधान आणि पाकिस्तन तहरीक-ए-एन्साफ या पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांची तिसरी पत्नी असलेल्या बुशरा बीबी यांनी इम्रान खान यांच्या सुटकेसाठी आंदोलन सुरु केले. या आंदोलनाची व्याप्ती एवढी वाढली की, इम्रान खानच्या पक्षाचे समर्थक रस्त्यावर उतरले. त्यातही बुशरा बीबीच्या भोवती पाकिस्तानमध्ये एक गुढ आहे. या बुशरा बीबीचा चेहरा अद्याप कोणीही पाहिलेला नाही. ही बुशरा बीबी पांढ-या बुरख्यात रस्त्यावर उतरली आणि इम्रान खानच्या समर्थकांना अधिक जोश आला. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या समर्थकांचे नियंत्रण सुटले. बुशरा बीबीच्या नेतृत्वाखाली ते इस्लामाबादमध्ये घुसले आणि पोलीसांबरोबर हिंसक चकमकी सुरु झाल्या. (Bushra Bibi)
पाकिस्तान सरकारने पंतप्रधान इम्रान खान यांचे समर्थक इस्लामाबादमध्ये पोहोचू नये यासाठी शिपिंग कंटेनर ठेवून रस्ते अडवले. इंटरनेट-मोबाइल सेवा बंद केली. तरीही बुशरा बीबी यांच्या नेतृत्वाखाली समर्थक इस्लामाबादमध्ये दाखल झाले. त्यानंतर मात्र पाकिस्तान सरकारनं आंदोलकांना गोळ्या घालण्याचे आदेश दिले. यामुळे इम्रान खान यांच्या समर्थकांचे मनोबल खचले आणि त्यांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात पोलीस मोठ्या संख्येनं जखमी झाले असून पाकिस्तान सरकार या सर्वांसाठी बुशरा बीबीला जबाबदार धरत आहे. बुशरा बीबी एक शक्तिशाली नेता म्हणून उदयास येत असल्याचीही चर्चा आहे. इम्रान खान यांचे सरकार असतांना या बुशरा बीबीवर अनेक आरोप झाले आहेत. अगदी भेटवस्तूंमध्ये फेरफार ते जादूटोणा असे आरोप बुशरा बीबीवर होत आहेत. इम्रान खानची धार्मिक मार्गदर्शक असणारी ही बुशरा बीबी नेमकी कोण याची चर्चा आता होत आहे. बुशरा बीबी ही इम्रान खान यांची तिसरी पत्नी आहे. इम्रान खानला पाकिस्तानचे पंतप्रधानपद हवे होते. त्यासाठी तो बुशरा बीबीकडे धार्मिक मार्गदर्शन घ्यायला गेला. इथेच या दोघांनी लग्न करण्याचे निश्चित केले. बुशरा बीबीसोबत लग्न केल्यावर सहा महिन्यात इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. (International News)
बुशरा बीबीचा जन्म 1971 मध्ये मध्य पंजाबमधील पुराणमतवादी, राजकीयदृष्ट्या प्रभावशाली कुटुंबात झाला आहे. ती वट्टू कुळातील आहे. हा एक जमीनदार जाट समूह आहे. बुशरा यांचे कुटुंबिय पाकपट्टण येथील रहिवासी आहे. हे शहर बाबा फरीद यांच्यामुळे ओळखले जाते. याच बाबा फरीद यांच्यामुळे बुशरा धार्मिक झाली आणि इम्रान खानही याच बाबा फरीद यांचा अनुयायी असल्याचे सांगितले जाते. बुशराचे 1989 मध्ये खावर मनेका याच्याबरोबर लग्न झाले. बुशराचे सासरे गुलाम मुहम्मद मनेका हे बेनझीर भुट्टो यांच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ सीमाशुल्क अधिकारी होते. त्यांचे भाऊ अहमद रझा मनेका हे सध्या पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे सदस्य आहेत. बुशरा आणि खावर या जोडप्याला तीन मुली आणि दोन मुलं आहेत. बुशाराच्या मुलांनी लाहोरच्या ऍचिसन कॉलेजमधून पदवी संपादन केली असून परदेशात उच्च शिक्षण घेतले आहे. बुशराची मोठी मुलगी मेहरु मेनका ही राजकारणी मियां अत्ता मुहम्मद मनेका यांची सून आहे. तिच्या अन्य दोन मुलींचेही लग्न झाले आहे. पण या लग्नाच्या बंधनातून बुशरा 2017 मधून बाहेर पडली. त्याला इम्रान खान जबाबदार असल्याचे बोलले जाते. (Bushra Bibi)
इम्रान खान आणि बुशरा हे बाबा फरीद यांचे अनुयायी आहेत. त्यांच्याच दरबारात या दोघांची 2015 मध्ये भेट झाली. त्यादरम्यान बुशरा या सुफी धर्माच्या अभ्यास करु लागल्या. भविष्य सांगू लागल्या. बुशरा या काळी जादू करत असल्याची चर्चाही सुरु झाली. इम्रान खान आणि त्यांच्या भेटागाठीही वाढू लागल्या. या दोघांनी लग्नही केले, पण आपल्यासोबत घटस्फोट होण्यापूर्वीच बुशरानं इम्रानसोबत लग्न केल्याचा आरोप त्यांच्यावर खावर मनेका यांनी लावला आहे. यासंदर्भात बुशरा यांच्यावर अजूनही खटला सुरु आहे. मुस्लीम कौटुंबिक कायद्यानुसार, स्त्रियांना पतीचा मृत्यू झाल्यानंतर किंवा घटस्फोट झाल्यानंतर काही महिन्यांपर्यंत पुनर्विवाह करण्यास मनाई आहे. खवर मेनका यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर निर्धारित वेळ पूर्ण होण्यापूर्वीच बुशरा बीबीने इम्रान खानशी लग्न केल्याचा आरोप आहे. (International News)
=====
हे देखील वाचा : राजावर झाला चिखलाचा पाऊस !
========
बुशरा यांच्यासोबत लग्न झाल्यावर सहा महिन्यात इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान झाले, आणि बुशरा यांच्या शब्दाला पाकिस्तानमध्ये प्रचंड मान आला. त्यासोबत बुशरा या काळीजादू करतात, ही कुजबुज वाढली. बुशरा यांच्या अद्याप कुठलाही फोटो झळकलेला नाही. त्या कशा दिसतात, हे कोणीही पाहिलेले नाही. याबद्दल अत्यंत धार्मिक असलेली स्त्री, असा गौरवोद्दगार इम्रान खान काढतात. बुशरामुळे आपल्या जीवनाला स्थैर्य आल्याचे खान सांगत असले तरी बुशरा यांनी अनेक घोटाळे केल्याचे नंतर सिद्ध झाले आहे. सरकारी भेटवस्तूंमधून बेकायदेशीरपणे नफा कमावल्याबद्दल त्यांनाही आपल्या पतीप्रमाणे दोषी मानण्यात आले आहे. इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकालात परफ्यूम, डिनर सेट आणि हिऱ्यांचे दागिने यासह अनेक भेटवस्तूंची बेकायदेशीरपणे विक्री केल्याचा बुशरा यांच्यावर आरोप आहे. या भेटवस्तूंची किंमत 140 दशलक्ष रुपयांहून अधिक होती. याशिवाय सरकारी कामात बुशरा या वारंवार ढवळाढवळ करत असल्याचा आरोपही आहे. मात्र बुशरा यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांना तुरंगवासाची शिक्षा झाली आहे. आता तुरुंगातून बाहेर पडल्यावर बुशरा आपल्या पतीसाठी लढा देत आहेत. (Bushra Bibi)
सई बने