Home » America : एकीकडे शपथविधी तर एकीकडे जळत असलेल्या लॉस एंजेलिसची छाया !

America : एकीकडे शपथविधी तर एकीकडे जळत असलेल्या लॉस एंजेलिसची छाया !

by Team Gajawaja
0 comment
America
Share

अमेरिकेत काय चालू आहे, याचा अंदाज कोणाला येणार नाही. कॅलिफोर्नियासारख्या राज्यात मोठी आग लागली आहे. लॉस एंजेलिस सारखा अमेरिकेता उच्चभ्रूंचा भाग जळून खाक होत आहे. हॉलिवूडला या आगीनं न भुतो न भविष्यती असे नुकसान झाले आहे. कित्येक प्रसिद्ध कलाकारांनी आपली घरे या आगीमध्ये गमावली आहेत. 15 हजाराहून अधिक इमारती नष्ट झाल्या आहेत. तर लाखो नागरिकांना या भागातून स्थलांतरीत करण्यात आले आहे. या आगीमध्ये घरांसह, शाळा, महाविद्यालये, बॅंका, उद्योगसंस्था, चर्च आदी सर्वांचीच मोठी हानी झाली आहे. (America)

हे एकीकडे होत असतांना अमेरिकेचा एक भाग तुफान बर्फ वृष्टीनं बाधित झाला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. हजारो घरांमध्ये वीजपुरवठाही होऊ शकत नाही. पण अशा परिस्थितीतही अमेरिकेत भावी राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीची तयारी जोरात सुरु आहे. येत्या 20 जानेवारीला डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. हा सोहळा शाही करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी गोळा कऱण्यात येत आहे. अमेरिकेतील अनेक कंपन्या यासाठी पुढे आल्या असून त्यांनी ट्रम्प यांच्या शाही शपथविधी सोहळ्यासाठी पैशाचा पाऊस पाडला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारी रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी 12 वाजता वॉशिंग्टन डीसी येथे शपथ घेतील. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स त्यांना राष्ट्रपती म्हणून शपथ देतील. ट्रम्प यांचा हा शपथविधी सोहळा सर्वार्थांनं वेगळा होत आहे. (Latest Updates)

कारण अमेरिकेचा एक भाग आगीनं जळत आहे, तर दुसरा भाग बर्फवृष्टीनं झाकला गेला आहे. 21 व्या शतकात पहिल्यांदाच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष सुट्टीच्या दिवशी पदाची शपथ घेणार आहेत. ट्रम्प यांच्याव्यतिरिक्त जेडी व्हान्स हे उपाध्यक्ष म्हणून शपथ घेतील. हा शपथविधी सोहळा शाही व्हावा म्हणून ट्रम्प यांनी सर्व यंत्रणेला कामाला लावले आहे. कारण या सोहळ्यासाठी जगभरातील मान्यवरांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे. तसेच शपथविधीसाठी सर्वाधिक निधीही गोळा करण्यात आला आहे. याशिवाय डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासातील पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत ज्यांना शिक्षा झाली आहे. 10 डिसेंबर रोजी, एका पॉर्न स्टारला पैसे देण्याच्या प्रकरणाशी संबंधित 34 आरोप ट्रम्प यांच्यावर होते. त्यांना न्यू यॉर्कच्या मॅनहॅटन कोर्टाने तुरुंगात न पाठवता कोणत्याही अटीशिवाय निर्दोष मुक्त केले आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले पूर्ण लक्ष राष्ट्राध्यक्ष पदाच्या शपथविधी सोहळ्याकडे वळवले आहे. (America)

America

या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यापासून साधारण 75 दिवसांनी अमेरिकेत नव्या राष्ट्राध्यक्षाला वेळ दिला जातो. या काळात सत्ता हस्तांतरणासंबंधात महत्त्वाची कामे कऱण्यात येतात. तसेच व्हाईट हाऊस आणि सरकारमधील महत्त्वाच्या खात्यामधील नियुक्त्या या काळात कऱण्यात येतात. ट्रम्प यांनीही या सर्व नियुक्त्या केल्या असून यापुढे अमेरिकेच्या प्रशासनात मोठे बदल होणार असल्याचे संकेत दिले आहेत. शिवाय प्रशासनामधील अनेक खर्चांवरही कपात आणणार असल्याचे सांगितले आहे. या सर्वांची प्रत्यक्षात सुरुवात 20 जानेवारीपासून होत आहे. या दिवशी ट्रम्प अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून अधिकृत शपथ घेत व्हाईट हाऊसमध्ये दाखल होणार आहेत. या सोहळ्यासाठी बोईंग, गुगल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या कंपन्यांनी खुल्या हातानं ट्रम्प यांना देणगी दिली आहे. एका बोईंग कंपनीनं 1 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 8,61,95,453 रुपये या सोहळ्यासाठी दिल्याची माहिती आता पुढे येत आहे. (Latest Updates)

===============

हे देखील वाचा : America : कुठे आग, कुठे बर्फाचे वादळ अमेरिके त्राहिमाम

America Fire : अमेरिकेच्या जंगलांना भीषण आग ! लावली की लागली ?

===============

याशिवाय तेल उत्पादक शेवरॉन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज मेटा, अमेझॉन आणि उबर यांनीही मोठी रक्कम ट्रम्प यांच्या शाही शपथविधी सोहळ्यासाठी दिली आहे. फोर्ड, जनरल मोटर्स आणि टोयोटा या कार कंपन्यांनीही उद्घाटन समितीला प्रत्येकी $1 दशलक्ष देणगी दिली आहे. ऊर्जा क्षेत्रातील दिग्गज शेवरॉननेही मोठी देणगी दिल्याची माहिती आहे. मुख्य म्हणजे ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित मोठी देणगी देऊनही, सर्व व्हीआयपी तिकिटे विकली गेल्याची माहितीही आहे. भारततर्फे या सोहळ्याला परराष्ट्र मंत्री जयशंकर 20 जानेवारी रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर असतील. यासोबतच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मिले आणि एल साल्वाडोरचे अध्यक्ष नायब बुकेले यांनाही निमंत्रण पाठविण्यात आले आहे. ही शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात चालली असली तरी एकीकडे जळत असलेल्या लॉस एंजेलिसची छाया यावर रहाणार आहे. (America)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.