नव्या वर्षात सौदी अरेबियानं नव्या विचारांची भेट दिली आहे. या देशात 2018 मध्ये सौदी महिलांना प्रथमच गाडी चालवण्याचा अधिकार मिळाला. आता 2023 मध्ये सौदी अरेबिया मधील महिला बुलेट ट्रेन (Bullet Train) चालवतांना दिसणार आहेत. युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांच्या व्हिजन-2030 अंतर्गत असलेल्या या योजनेमध्ये सौदी अरेबियात महिलांना मोठी संधी मिळाली आहे. या संधीचे चीज करत तिथे गेल्या 4 वर्षांत नोकरदार महिलांच्या संख्येत 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ब्रुकिंग्स संस्थेच्या अहवालानुसार, 2018 मध्ये, सौदी अरेबियामध्ये 20% महिला नोकरदार होत्या. 2020 च्या शेवटी, हा आकडा 33% पर्यंत वाढला आहे. आता यात बुलेट ट्रेन (Bullet Train) चालवणा-या महिलांची भर पडणार आहे. प्रशिक्षणानंतर 32 महिलांची पहिली तुकडी तयार झाली असून मक्का आणि मदिना दरम्यान त्या चालवणार असलेल्या बुलेट ट्रेनची चाचणी घेण्यात आली. नववर्षानिमित्त यासंबंधीचा फोटो सोशल मिडीयावर शेअर करत सौदी अरेबियानं जगाला सकारात्मक असा संदेश दिला आहे.
सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांच्या व्हिजन-2030 अंतर्गत महिलांचे बुलेट ट्रेन (Bullet Train) चालवण्याचे स्वप्न साकार होणार आहे. सौदी अरेबिया रेल्वेने (SAR) याबाबत माहिती दिली. यासोबतच या महिला बुलेट ट्रेन चालकांचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडीओला लाखो लाईक मिळत असून सौदी अरेबियाच्या उपक्रमाचे जगभरातील महिलांकडून स्वागत करण्यात येत आहे. आता सौदीत 32 महिलांच्या पहिल्या तुकडीने बुलेट ट्रेन (Bullet Train) चालवण्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यासंबंधीच्या व्हिडिओमध्ये हा बहुमान मिळालेली महिला आपला आनंद व्यक्त करीत आहे. या प्रकल्पाचा भाग बनून आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्हाला ही संधी मिळाली याचा आम्हाला अभिमान असल्याचे तिने सांगितले आहे. प्रशिक्षणानंतर आता या बॅचमधील महिला 453 किलोमीटर लांबीच्या हरमन हायस्पीड लाईनवर बुलेट ट्रेन चालवणार आहेत. हा मार्ग मक्का आणि मदिना यांना जोडतो.
अलीकडच्या काळात सौदी महिलांनी देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. क्राउन प्रिन्स आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांनी 2016 मध्ये व्हिजन 2030 लाँच केले. देशाच्या अर्थव्यवस्थेचे तेलावरील अवलंबित्व कमी करणे हा त्याचा उद्देश आहे. याअंतर्गत असे अनेक कार्यक्रम राबवले जात आहेत, ज्यामध्ये महिलांचाही मोठा वाटा आहे. आता सरकारी कार्यालयांव्यतिरिक्त अनेक महिला खासगी क्षेत्रातही काम करत आहेत. त्यांचा शैक्षणिक क्षेत्रातील वाटाही झपाट्याने वाढला आहे. 2022 च्या सुरुवातीला महिलांसाठी 30 बुलेट ट्रेन (Bullet Train) ड्रायव्हरच्या जागा काढण्यात आल्या. नंतर या जागा 32 पर्यंत वाढवण्यात आल्या. विशेष म्हणजे या 32 पदांसाठी 28 हजार महिलांनी अर्ज केले होते. सौदी अरेबियात महिलांसाठी अनेक उपक्रम खुले करण्यात आले. त्यात ‘शिप्स ऑफ द डेझर्ट’मध्ये प्रथमच महिलांनी उंटांच्या स्पर्धेत भाग घेतला होता. रियाधमध्ये आयोजित या स्पर्धेत कोट्यवधी रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमात सुमारे 40 महिलांनी सहभाग घेतला.
=========
हे देखील वाचा : पुतिन सरकार रशियातील सैनिकांना स्पर्म फ्रीज करण्याची का देतेय सुविधा?
=========
अलिकडेच सौदी अरेबियानं आपल्या धोरणांमध्ये अमुलाग्र बदल केला आहे. तिथे ख्रिसमसही साजरा करण्यात आला आणि नववर्षाचेही उल्हासात स्वागत करण्यात आले. यावर काहींनी टीका केली असली तरी सौदी अरेबियाच्या शासकांनी याकडे दुर्लक्ष केलं आहे. आपल्या देशाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आणि या विकासात पुरुषांचा जेवढा सहभाग हवा आहे, तेवढाच सहभाग महिलांचाही हवा आहे. एकूण एकीकडे इराण सारख्या देशात महिलांवर होणारी हिजाबची सक्ती होत आहे. इराणमध्ये 22 सप्टेंबर रोजी महासा अमिनी यांच्या मृत्यूनंतर हिजाबविरोधी निदर्शने सुरू झाली. या निदर्शनांमध्ये आतापर्यंत 500 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ज्यामध्ये 69 मुलांचाही समावेश आहे. इराणमध्ये आंदोलकांना फाशी देण्यात येत आहे. सौदी अरेबियानं मात्र महिलांच्या हाती विकासाची दोरी दिल्याचे सकारात्मक चित्र आहे.
सई बने…