Home » ब्रिटनमध्ये ‘४०० पार’ करणाऱ्या लेबर पार्टीचं भारत कनेक्शन

ब्रिटनमध्ये ‘४०० पार’ करणाऱ्या लेबर पार्टीचं भारत कनेक्शन

by Team Gajawaja
0 comment
Labor Party
Share

५ जुलै २०२४. ब्रिटनमधून आलेल्या एका बातमीने साऱ्या भारताचं लक्ष वेधलं. झालं होतं असं की ब्रिटनच्या पंतप्रधान पदी असणाऱ्या भारतीय वंशाच्या ऋषि सुनक यांनी आपला पंतप्रधान पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच ब्रिटनमध्ये निवडणूक घेतली. या निवडणुकीत ऋषि सुनक यांच्या नेतृत्वातील कंझर्व्हेटिव्ह पार्टीचा पराभव झाला. किर स्टार्मर यांच्या नेतृत्वात लेबर पार्टीने ‘४०० पार’ हे ध्येय ब्रिटनमध्ये खरं करून दाखवलं. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की या लेबर पार्टीचं आपल्या भारतातील स्वातंत्र्यलढा आणि आपल्या भारताला मिळालेले स्वातंत्र्य या गोष्टींशी फार जवळचं कनेक्शन आहे. काय आहे हे कनेक्शन? (Labor Party)

भारतीय स्वातंत्र्यलढा सर्वसामान्य जनतेपर्यंत घेऊन जाण्याचं श्रेय लोकमान्य टिळक यांना जातं. म्हणूनच आपण त्यांना ‘भारतीय असंतोषाचे जनक’ असं म्हणतो. त्यासोबतच आपल्या स्वातंत्र्यलढ्याला थेट ब्रिटनमधूनच समर्थन मिळावं यासाठी लोकमान्य टिळक यांनी एक फार मोठी योजना आखली होती, हे फार कमी जणांना माहिती असेल. १९१८ साली इंडियन होम रूल लीगचे अध्यक्ष म्हणून लोकमान्य टिळक इंग्लंडला गेले होते. त्यावेळी ब्रिटनमध्ये लेबर पार्टीचं महत्त्व वाढत होतं हे लोकमान्य टिळक यांच्या लक्षात आलं. या लेबर पार्टीला बळकटी देण्याच्या टिळक यांनी आखलेल्या योजनेला बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी समर्थन दीलं. लेबर पार्टीच्या प्रचारासाठी तब्बल २० हजार पाउंड यांचा निधी सयाजीराव गायकवाड यांच्या लोकमान्य टिळक यांनी लेबर पार्टीला मिळवून दिला. पुढे या निधीचा योग्य वापर करत लेबर पार्टीने आपली मुळं मजबूत केली. (Labor Party)

लोकमान्य टिळक यांचं 1920 साली निधन झालं आणि सयाजीराव गायकवाड हे 1939 साली हे जग सोडून गेले. मात्र त्यांनी दिलेल्या निधीमुळे ही पार्टी ब्रिटनमधील शक्तिशाली पार्टी म्हणून उदयास येत होती. दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा १९४५ साली निवडणुका झाल्या तेव्हा ब्रिटनमध्ये दोन प्रमुख राजकीय पक्ष होते. पहिली होती लेबर पार्टी. या पार्टीने महत्त्वाकांक्षी सामाजिक सुधारणा कार्यक्रम जनतेसमोर ठेवला होता. या लेबर पार्टीच्या १९४५च्या जाहीरनाम्यात भारताला स्वशासनाची संधी देण्याचा स्पष्ट उल्लेख होता. पण त्याचवेळी या निवडणुकीतील दुसरी पार्टी होती कंझर्व्हेटिव्ह पार्टी. या पार्टीचे प्रमुख असणारे विन्स्टन चर्चिल यांचा दुसऱ्या महायुद्धातील ब्रिटनच्या विजयात सिंहाचा वाटा होता. या कंझर्व्हेटिव्ह पार्टीच्या जाहीरनाम्यात असं म्हटलं होतं की भारतीय सैन्याने दुसऱ्या महायुद्धात जे शौर्य दाखवलं त्यानंतर भारताला सार्वभौमत्व देण्याची त्यांची मागणी दुर्लक्षित केली जाऊ शकत नाही. विन्स्टन चर्चिल हे स्वतः भारताला स्वातंत्र्य देण्याच्या कट्टर विरोधात होते. पण सुदैवाने १९४५ च्या निवडणुकीत लेबर पार्टी विजयी झाली. क्लीमेंट ॲटली ब्रिटनचे पंतप्रधान झाले. आणि त्यांनी आपल्या जाहिरनाम्यानुसार भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दिशेने ॲटली सरकार पाऊले उचलू लागले.

सप्टेंबर १९४५ रोजी भारताचे तत्कालीन व्हॉईसरॉय लॉर्ड व्हेवेल यांनी एका जाहीर कार्यक्रमात ॲटली सरकारचे भारताविषयीचे धोरण जाहीर केले. १९३० पासून भारतीयांनी संविधान समिति स्थापन करण्याची मागणी केली होती, ही मागणी मान्य करण्यात आली होती. भारतातील ब्रिटिश गव्हर्नमेंटने पहिल्यांदाच भारताला पूर्ण स्वातंत्र्य देण्याची जाहीर घोषणा केली. लोकमान्य टिळक यांची पूर्ण स्वराजची मागणी प्रत्यक्षात उतरवून लेबर पार्टी २०,००० पाऊंड्सची परतफेड करणार असं इंग्लंडमध्ये बोललं जाऊ लागलं. (Labor Party)

याबाबत भारतातील कॉँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोन प्रमुख राजकीय संघटनांसोबत ॲटली सरकारने चर्चा केली. १९४६ साली ॲटली सरकारने भारताला पूर्ण स्वातंत्र्य देण्यासाठी एक ॲक्ट बनवण्याच्या दिशेने सरकार पावलं उचलू लागलं. हा ॲक्ट होता इंडिया इंडिपेंडन्स ॲक्ट, १९४७ अर्थात भारतीय स्वतंत्रता अधिनियम, १९४७.

====================

हे देखील वाचा : ब्रिटनमध्ये १४ वर्षानंतर सत्तांतर

====================

१८ जुलै १९४७ रोजी ब्रिटिश संसदेत हा ॲक्ट शाही मंजूरीसह पारित झाला आणि भारताला पूर्ण स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झालं. ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी 20 फेब्रुवारी 1947 रोजी लंडनमधील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये घोषणा केली की ब्रिटिश सरकार 30 जून 1948 पर्यंत ब्रिटिश भारताला संपूर्ण स्वराज्य देईल. त्यानंतर सत्ता हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरु होईल. (Labor Party)

अखेर १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस उजाडला. लाखो अनाम वीरांच्या बलिदानातून भारत स्वतंत्र झाला, हे कधीही नाकारता येणार नाही. परंतु लेबर पार्टीमुळे आणि लेबर पार्टीला बळकटी देण्याच्या लोकमान्य टिळक यांच्या योजनेमुळे हा दिवस लवकर आला, हे मान्य करावंच लागेल.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.