राजाचा देश, म्हणजेच ब्रिटन गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ आहे. याला कारण ठरल्या आहेत, ब्रिटनमध्ये वारंवार होणा-या दंगली. या दंगली रोखण्यासाठी ब्रिटनमधील पोलीस हतबल झालेले दिसत असून दंगेखोरांना नेमकं कसं आवरावं हा प्रश्न ब्रिटनच्या पोलीस दलापुढे उभा राहिला आहे. दोन आठवड्यापूर्वी मुलांना सरकारी नियंत्रणात घेण्यावरुन या दंगलींची सुरुवात झाली. नंतर मुळ ब्रिटननिवासी असलेल्या तीन लहान मुलींवर चाकूहल्ला करण्यात आला. या मुली डान्स क्लासला गेल्या होत्या. तिथेच या मुलींसह अन्य मुलींवरही एका युवकांने चाकूहल्ला केला. त्यात या मुलींचा मृत्यू झाला. तर अन्य पाच मुली गंभीर जखमी झाल्या. या घटनेचा ब्रिटनमधील सर्व स्तरातून निषेध करण्यात आला. मात्र या सर्व घटनांमधील आरोपी हे ब्रिटनमध्ये स्थलांतरीत झालेले आहेत, ही बातमी सोशल मिडियावर व्हायरल झाली. (Britain Riot)
त्यानंतर ब्रिटनमध्ये बेकायदेशीरपणे येणा-यांवर तातडीनं कारवाई करावी आणि या नागरिकांना ब्रिटनमधून बाहेर काढावं, यासाठी निरदर्शनं करण्यात आली. यावेळी ज्यांच्याविरोधात निदर्शने होत आहेत, तो समाजही मोठ्या संख्येनं समोर आला. त्यामुळे ब्रिटनमध्ये अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडत आहेत. या घटना रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही दंगेखोरांनी जखमी केले आहे. पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या आहेत. शिवाय अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे. या सर्व घटनांमुळे ब्रिटनमध्येही स्थलांतरीत झालेल्यांविरोधात मत तयार झाले असून स्थलांतरितांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
इंग्लडच्या साउथपोर्टमध्ये अल्पवयीन मुलींची निघृणपणे हत्या करण्यात आली. हा तरुण कट्टर मुस्लिम स्थलांतरित असल्याचा मेसेज येथील सोशल मिडियावर पसरला आणि संपूर्ण ब्रिटनमध्ये स्थलांतरितांविरोधात संताप उसळून आला. या ठार झालेल्या मुली अवघ्या पाच, सात, नऊ वर्षाच्या होत्या. हल्लेखोरांनी या मुलींवर चाकूचे अनेक वार केले आणि त्यांची हत्या केली. या घटनेमुळे ब्रिटनमध्ये आक्रोश व्यक्त होत आहे. यात हा हल्ला केला तो तरुण स्थलांतरीत असल्याचे समजताच शेकडो आंदोलक रस्त्यावर आले. त्यांनी लिव्हरपूल, ब्रिस्टल, हल आणि बेलफास्ट येथे निदर्शने करण्यास सुरुवात केली. या सर्वांची ब्रिटनमधून स्थलांतरितांची त्वरित रवानगी करण्यात यावी ही मागणी होती. (Britain Riot)
या आंदोलकांविरोधकांचा विरोध करत काही ठिकाणी स्थलांतरित नागरिकांनीही आंदोलन सुरु केल्यावर त्याला दंगलींचे स्वरुप आले आहे. त्यानंतर ब्रिटनमध्ये अनेक ठिकाणी दोन गटांमध्ये हिंसक हाणामारी झाली आहे. यात एकमेकांवर विटा, दगड आणि बाटल्याही फेकण्यात आल्या आहेत. यात अनेक जखमी झाले असून पोलीसांची संख्या अधिक आहेत. दंगेखोरांनी अनेक दुकानांना आगीच्या भक्षस्थानी टाकले आहे. स्थलांतरितांविरोधात होणा-या आंदोलकांविरोधातच स्थलांतरितांनी हिंसक आंदोलन सुरु केल्यानं परिस्थिती गंभीर झाली आहे. या सर्वात ब्रिटनमधील पोलीस दल हतबल झाल्याचे दिसत आहे.(Britain Riot)
सध्या ब्रिटनमधील लिव्हरपूलमधील नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत. आफ्रिका आणि इतर आखाती देशांतून येणारे येथूनच ब्रिटनमध्ये येत आहेत. त्यामुळे हा सागरी मार्ग बंद करावा आणि आमच्या मुलांना या स्थलांतरितांपासून वाचवा अशा आशयाचे फलक घेऊन ब्रिटनचे नागरिक आंदोलन करीत आहेत. मध्यपूर्व आशियाई देशांमधून हजारो स्थलांतरित ब्रिटनमध्ये स्थायिक झाले आहेत. यामुळे मुळ ब्रिटनवासीयांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अलिकडील काही वर्षात या स्थलांतरितांचे गुन्ह्यामधील प्रमाणही वाढले आहे. यात कट्टरवाद्यांचा समावेश अधिक आहे. त्यामुळे ब्रिटनने स्थलांतरितांना दिलेले मुक्त अधिकार आता थांबवावेत अशी मागणी होत आहे.
==================
हे देखील वाचा : ब्रिटनजवळ इस्लामिक राज्य !
================
यातच ब्रिटनधून आणखी एक चिंताजनक बातमी पुढे आली. ब्रिटनमधील न्यायालयाने कुख्यात मुस्लिम धर्मगुरू अंजेम चौधरी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानमधील मुळ असलेल्या या चौधरीनं ब्रिटनमध्ये दहशतवादी संघटना उभी केली होती. ब्रिटनमधील कुख्यात कट्टरपंथी इस्लामी धर्मोपदेशक म्हणून त्याची ओळख होती. याच चौधरीनं ९/११ च्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचे कौतुक केले होते. तसेच ब्रिटीश राजाचा राजवाडा असलेल्या बकिंगहॅम पॅलेसचे मशिदीत रूपांतर करण्याचा आपला इरादाही त्यांनी जाहीर केला होता. अशा कट्टरवाद्यांना ब्रिटनमध्ये स्थान नको, अशी भावना आता ब्रिटनवासीयांची झाली आहे. ब्रिटनच नाही तर अवघ्या युरोपचे स्थलांतरितांसाठीचे उदारमतवादी धोरण त्यांच्याच मुळावर आल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे. (Britain Riot)
सई बने