Home » ‘या’ गणेश मंदिरात होतो ब्राह्मी नदीचा उगम

‘या’ गणेश मंदिरात होतो ब्राह्मी नदीचा उगम

by Team Gajawaja
0 comment
Brahmi River
Share

कर्नाटक राज्यातही एक काश्मिर वसलेले आहे.  होय, हे कर्नाटकातले काश्मिर म्हणजे येथील कोप्पा हे समुद्रसपाटीपासून जवळ असलेल्या चिकमंगळूर जिल्ह्यात आहे. कोप्पा हे लहान शहर सह्याद्री पर्वतरांगांनी व्यापलेले आहे. हा संपूर्ण परिसर निसर्गाच्या देणगीनं अतिशय सुंदर असाच आहे, त्यामुळे याला कर्नाटकचे काश्मिर म्हटले जाते. याशिवाय या गावामध्ये अनेक ऐतिहासिक मंदिरे आहेत. त्यापैकी एक मंदिर 1000 वर्ष जुने असून या मंदिरातूनच ब्राह्मी नदीचा उगम होत असून हे मंदिर अत्यंत सुंदर आहे. हे आहे, श्री कमंडला गणपती मंदिर. कमंडला गणपती मंदिर हे ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे मंदिर आहे. या मंदिरात जाऊन कमंडला गणपतीची सेवा किंवा ध्यान केले तर सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी धारणा आहे. याशिवाय कमंडला गणपती मंदिरातून सतत वाहणारा जलसाठा कमंडला तीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. हे तीर्थ म्हणजे, ब्राह्मी नदीचा उगम मानला जातो.  या पवित्र पाण्याचा उगम कसा होतो, हे गुढ गेल्या अनेक वर्षापासून कोणालाही उलगडले नाही. या पाण्यावरुनच मंदिराला कमंडला गणपती मंदिर असे नाव पडले आहे.  या पाण्यापासून झालेल्या तलावात स्नान करण्यासही भक्तांची गर्दी असते, हे पाणी औषधी मानले जाते.  तसेच त्यास स्नान केल्यास शनिदोष कमी होतात, असेही सांगितले जाते.  त्यामुळे तेथे भेट देणा-या भाविकांच्या गर्दीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.  (Brahmi River)

कर्नाटक राज्यातील या कमंडला गणपती मंदिराची स्थापना खुद्द माता पार्वतीनं केल्याचे सांगितले जाते. पौराणिक कथेनुसार, मंदिरातील गणेशमूर्तीची स्थापना देवी पार्वतीदेवीने केली आहे. खुद्द देवी पार्वतीला शनीदोषाचा त्रास होत होता.  तेव्हा तिला देवांनी शनीदेवाची पूजा करण्याचा सल्ला दिला.  शिवाय तप करण्यासही सांगितले. हे तप करण्यासाठी देवी पार्वतीनं कोप्पा हा समुद्रकिना-यावरील परिसर निवडला. येथे शनिदोषापासून मुक्त होण्यासाठी देवी पार्वतीनं गणेशाची स्थापना केली. देवी पार्वतीनं स्थापन केलेली हिच मुर्ती या मंदिरात असल्याचे सांगितले जाते. येथे देवी पार्वतीला शनीदोषांपासून मुक्ती मिळाली. तेव्हापासून या मंदिरात पुजा केल्यास शनीदोषापासून मुक्ती मिळते आणि गणपतीचा विशेष आशीर्वाद मिळतो, असा भक्तांचा विश्वास आहे.  मंदिरातील भगवान गणेश सुखासन या स्थितीत बसलेले आहेत. अशा स्थितीत असलेली ही एकमेव गणेशाची मुर्ती आहे.  या गणेशाच्या  एका हातात  मोदक तर दुसऱ्या हातात अभयहस्त आहे.  गणेशाला विद्येची देवता म्हणण्यात येतं.  कमंडला गणपती मंदिर तर विद्यार्थ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. ज्यांना सतत शैक्षणिक अपयश येतं त्यांना या कमंडला गणपती मंदिरात जाऊन गणेशाची पूजा करण्याचा सल्ला देण्यात येतो.  शनीदोष असलेल्या व्यक्तीही या मंदिरात येऊन गणेशाची आराधना करतात.  (Brahmi River)

कमंडला तीर्थ हे ब्राह्मी नदीचे उगमस्थान आहे. भगवान गणेशाच्या पायाजवळून या नदीचा उगम होतो, त्यामुळे याला अतिशय पवित्र मानले जाते.  स्वतः भगवान ब्रह्मदेवाने निर्माण केलेली ही नदी असल्याची आख्यायिका आहे. जेव्हा देवी पार्वती तप करण्यासाठी या स्थानावर आली तेव्हा ब्रह्मदेवांनी देवीला आशीर्वाद दिला. आशीर्वाद देतांना ब्रह्मदेवांनी आपल्या कमंडलूमधून पाणी शिंपडले. हे पाणी जिथे पडले तिथून या ब्राह्मी नदीचा उगम झाला आणि त्याला कमंडला तीर्थ असे नाव पडले. यातून होणा-या नदीला ब्राह्मी नदी हे नाव पडले.  (Brahmi River)

=========

हे देखील वाचा :  ‘या’ ठिकाणी आहे 108 खांबांचे शिवमंदिर

=========

या ब्राह्मी नदीचा उगम होतो, ते स्थानही अत्यंत सुंदर आहे. ब्राह्मी नदीचे (Brahmi River) उगमस्थान हे 8 पाकळ्यांच्या फुलासारख्या, कोरलेल्या पवित्र दगडावर एक छोटेसे चौकोनी व्यासपीठ आहे. यातून बाहेर येणारे पवित्र पाणी कल्याणी-कमंडला तीर्थाशी जोडलेले आहे. येथे वर्षभर गणपतीसमोर पवित्र पाणी म्हणून सतत पाणी वाहत राहते.  या भागात समुद्र जवळ आहे. पण हे गणेशाच्या पायाजवळून निघणारे पाणी अतिशय गोड असते.  शिवाय कितीही उन्हाळा असला तरी पाण्याचा स्त्रोत थांबत नाही.  हेच गुढ रहस्य अनेकांना या मंदिरात घेऊन येते.  अतिशय गोड अशा या पाण्यापासून तयार झालेल्या नदीमध्ये स्नान करण्यासही गर्दी असते.  तसेच कमंडल गणेशाच्या पायापासून निघणा-या या ब्राह्मी नदीचे पाणीही भक्त आपल्या घरी आणतात.  

सई बने

 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.