चीन या देशातील तरुण वर्गावर कार्यालयीन कामकाजाचा बोजा वाढत आहे. चीनच्या बहुतांश कार्यालयात १२-१२ तास काम करण्याचे बंधन आहे. चीनची घटती लोकसंख्या यामुळे भविष्यात ही समस्या वाढत जाण्याची शंका व्यक्त होत आहे. कर्मचा-यांना नेमून दिलेल्या तासांपेक्षा जास्त वेळ काम करावे लागत असले तरी त्याचे योग्य मानधनही त्यांना मिळत नाही. त्यामुळे चीनमधील कर्मचारी मानसिक तणावाखाली असल्याचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. हा तणाव कमी करण्यासाठी वेगवेगळे मार्ग हे कर्मचारी शोधत आहेत. त्यातील सर्वाधित चर्चेत असलेला उपाय म्हणजे, बॉसची विक्री करणे. होय, सध्या चीनमधील कार्यालयात त्यांच्या बॉसची विक्री करण्यात येत आहे. (Boss for Sale)
विशेषतः चीनमधील तरुण वर्गाचा यात समावेश आहे. त्यासाठी एक वेबसाईट तयार करण्यात आली असून हे तरुण त्यात त्यांच्या बॉसची बोली लावतात. तो बॉस किती त्रासदायक आहे, त्यावरुन त्याची बोली ठरते आणि ती वाढत जाते. यामध्ये खरेदीकारही असतात. ते त्या बॉसकडून काम करुन घेण्यासाठी उत्सुक असतात. अर्थात यात पैशाचा प्रत्यक्ष व्यवहार होत नसला तरी आपल्या खडूस बॉसची कमीत कमी किंमतीमध्ये विक्री केल्याचे समाधान या कर्मचा-यांना मिळते. त्यातून ते आपल्या कामातील तणाव दूर करत आहेत. मात्र या वेबसाईटचे दुसरे परिणामही समोर आले आहेत. यातून संबंधित कंपनीमधील काही प्रोजक्टही खुले करण्यात येत आहेत. तसेच कंपनीच्या मालकाची वैयक्तिक माहितीही खुली झाली आहे. यामुळे संबंधिक कंपनीच्या डाटाला धोका निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे बॉस विक्रीची साईट वापरुन आपले मनोरंजन करुन घेणा-या चीनी युवकांना सरकारनं ताकीद दिली आहे. (Boss for Sale)
कामाच्या या ताणातून बाहेर पडण्यासाठी चीनमधील तरुणानी एक विचित्र मार्ग शोधला आहे. चीनमध्ये कार्यालयात कमीत कमी १२ तास काम करण्याची सक्ती आहे. शिवाय सार्वजनिक सुट्टीचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे तेथील कर्मचा-यांमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव आहे. अशा तरुणांनी एक मनोरंजक ट्रेंड सुरू केला आहे. ज्या कर्मचा-यांना ऑफिसमध्ये त्रास होतो, ते त्यांच्या बॉसची चक्क ऑनलाईन विक्री करत आहेत. त्यासाठी ऑनलाइन विक्री प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले आहे. यात चीनमधील प्रख्यात कंपन्यांचाही समावेश आहे. जियान्यु, नावाच्या या साईटवर सेकंड हँड वस्तूंची विक्री होत आहे. त्रासदायक बॉसला येथे विकता येईल, अशी त्याची जाहीरात आहे. या बॉसची विक्री त्याचेच तणावग्रस्त सहकारी करत आहेत.
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालानुसार चीनमध्ये जास्त कामामुळे निर्माण होणाऱ्या तणावाला ‘वर्क स्मेल’ असे म्हटले जाते. या कामाचा ताण कमी करण्यासाठी कर्मचारी त्यांच्याच बॉसला विकून मनोरंजन करुन घेत आहेत. सुरुवातीला बॉसची किंमत ४ ते ९ लाखांपर्यंत लावण्यात येते. विशेष म्हणजे, काहीजण या त्रासदायक बॉसला विकत घेण्यासाठी पुढेही येतात. निव्वळ तणाव दूर करण्यासाठी हा खरेदी आणि विक्रीचा व्यवहार होतो. पैशांचा कुठलाही व्यवहार होत नसला तरी यातून खूप मोठे समाधान मिळत असल्याचे कर्मचा-यांचे म्हणणे आहे. (Boss for Sale)
====================
हे देखील वाचा : जपान करणार ऑटोमॅटिक रस्ता ?
====================
मात्र या साईटचे आता अन्य परिणामही समोर आले आहेत. यामुळे संबंधित कंपनीच्या बॉसची सगळी माहिती सोशल मिडियावर येत आहे. ऑनलाईन माहिती आल्यामुळे कंपनीचे काही प्रोजेक्टही खुले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता या ऑनलाईन साईटवर संमतीशिवाय लोकांना विकणे बेकायदेशीर असणे जाहीर करण्यात आले आहे. यासंदर्भात वकील संघटनेनं जाहीर केलं आहे की, जर इतर व्यक्तीची वैयक्तिक माहिती, कुटुंबातील व्यक्तींची नावे, आयडी क्रमांक, घराचे पत्ते आणि संपर्क क्रमांक हे त्याच्या संमतीशिवाय ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सार्वजनिकपणे उघड केले गेले तर तो गुन्हा ठरु शकतो. यामुळे गोपनीयता भंग केल्याचा गुन्हा संबंधित व्यक्तीवर दाखल होणार आहे. चीनमध्ये, खाजगी माहिती अनधिकृतपणे प्रकाशित केली तर दहा दिवसांपर्यंत अटक आणि दंडही होऊ शकतो. अर्थातच हे जाहीर झाल्यापासून या साईटवर बॉसच्या विक्रीमध्ये कमी आली आहे. पण त्यासोबत चीनमधील युवकांचे ढासळते मानसिक संतूलन यावर चर्चा सुरु झाली आहे.
सई बने