गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगला आहे. त्यातच आज मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंगना रनौतच्या पाली हिली परिसरातील कार्यालयाची पाहणी केली. मुंबई महापालिकेच्या नियमानुसार हे कार्यालय बांधलेलं आहे का याचा आढावा यावेळी मनपा कर्मचाऱ्यांनी केली.
आज तीन अधिकारी आणि तीन कर्मचारी असलेलं सहा जणांचं पथक पाली हिलमधील कंगनाच्या कार्यालयात पोहोचलं. त्यांनी या संपूर्ण कार्यालयाची पाहणी केली. कंगनाच्या कार्यालयाला लागून असलेल्या इतर बंगल्यांचीही बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. एकूणच या मार्गावर बांधकाम रस्त्यावर आलं आहे का? इतर गोष्टी बेकायदेशीर आहेत का? बांधकामाबाबत काही त्रुटी आहेत का? याचा आढावा बीएमसीच्या पथकाने घेतला. काही ठिकाणी त्यांनी रस्त्याची मापंही घेतली आहेत. यावेळी कंगनाच्या कार्यालयाच्या रंगरंगोटीचं काम सध्या सुरु आहे. हे काम करणाऱ्या पाच कामगारांचीही बीएमसीच्या पथकाने किरकोळ चौकशी केली. त्यानंतर बीएमसीचं पथक तिथून निघून गेलं.
गेल्या अनेक दिवसांपासून कंगना रानौत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र पोलीस दलावर ट्विटरमार्फत टीका करत आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत कंगनाने पंगा घेतल्याने बीएमसीने ही पाहणी केली नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.