आजच्या काळात मोबाइल हा जसा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे, तशीच अजून एक गोष्ट आपल्यासाठी अतिशय महत्वाची झाली आहे. आणि ती गोष्ट म्हणजे हेडफोन. हेडफोनशिवाय आजकाल मोबाइल वापरणारे लोकं दिसतच नाही. रस्त्यावर देखील आपण पाहिले तर लक्षात येईल की, १० पैकी ८ लोकं हेडफोन, इअरफोन घालून वावरतात. गाणी ऐकण्यासाठी, फोनवर बोलण्यासाठी या इअरफोन, हेडफोनचा सर्रास वापर करत आहे.
प्रवास करणारे लोकं अनेक तास हे हेडफोन, इयरफोनचा वापर करताना दिसतात. एवढंच नव्हे तर रस्त्यावरून चालताना, ऑफिसमध्ये, जिममध्ये, पार्कमध्ये, अगदी घरातही लोकं हेडफोन कानात घालून काहीतरी ऐकत असताता, बोलत राहतात किंवा इतर कामंही करतात.
मात्र बराच काळ हेडफोन, इयरफोनचा वापर हा तुमच्या कानांसाठी नक्कीच त्रासदायक ठरू शकतो. गाणे ऐकण्यासाठी थोडा वेळ हेडफोन वापरणे ठीक असते, मात्र ते दीर्घकाळ वापरल्याने आपल्या कानांवर वाईट परिणाम होतो. हेडफोन किंवा इअरफोनमधून येणारा आवाज आपल्या कानाच्या पडद्याजवळ आदळतो. त्याच्या अतिवापरामुळे कानाच्या पडद्याचे नुकसानही होऊ शकते. आज आपण या लेखातून हेडफोन, इयरफोनचा वापर केल्याने आपल्याला कोणत्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागू शकते ते जाणून घेऊया.
– गरजेपेक्षा जास्त वेळ हेडफोन किंवा इअरफोनचा वापर केल्यास आपल्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. बराच काळ हेडफोन्स लावून गाणी ऐकल्यास व्यक्तीचे कान सुन्न अथवा बधीर होऊ शकतात. यामुळे बहिरेपणाचा धोकाही संभवतो.
– डॉक्टरांच्या मते, इअरफोनच्या अतिवापरामुळे कानात वेगवेगळे आवाज येणे, चक्कर येणे, झोप न येणे अशी अनेक लक्षणे दिसू लागतात.
– हेडफोन किंवा इअरफोन यांचा अतिवापर हा आपल्या कानांसाठी हानिकारक ठरतोच, पण त्याचा आपल्या हृदयावरही परिणाम होतो. मोठ्या आवाजात संगीत ऐकल्याने हृदयावर वाईट परिणाम होतो.
– वायरलेस इयरफोनचा जास्त वापर केल्यामुळे मेंदूचा कर्करोग, न्यूरोलॉजिकल आणि आनुवंशिक विकार, स्मरणशक्ती कमी होणं असे काही धोकादायक विकार होऊ शकतात.
– सतत इयरफोन्सचा वापर करून गाणी ऐकल्याने कानाच्या पडद्यावर वाईट परिणाम होतो. डोकेदुखी, श्रवणशक्ती कमी होणं आणि बहिरेपणा येणं आदी त्रास होऊ शकतात.
– कधी दुसऱ्या व्यक्तीचे इयरफोन्स वापरल्यास कानात इन्फेक्शन होण्याची भीती असते. टिनिटस नावाचा रोगदेखील होण्याचा धोका असतो.
– जास्त जोरात इअरफोन लावल्याने मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि कान खराब होतात. यांचा अतिवापर केल्याने तुमची ऐकण्याची क्षमताही कमी होऊ शकते.
– तासनतास इअरफोन लावून आणि मोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवू शकतात. अनेकांना या समस्येचा सामना करावा लागतो.
इअरफोन्स आणि इअरबड्स हे हेडफोनपेक्षा अधिक हानिकारक आहेत. हेडफोन वापरणे काही प्रमाणात सुरक्षित आहे, परंतु केवळ थोड्या काळासाठीच ते वापरावेत. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, इअरफोन्स, बड्स किंवा हेडफोन्स एकावेळी १५-२० मिनिटांपेक्षा जास्त काळ वापरू नयेत. जेव्हा वायरलेस डिव्हाइसेस वापरत नाही, तेव्हा ती गळ्यातून किंवा कानातून काढून टाका. दिवसातून ६० मिनिटांपेक्षा जास्त काळ इयरफोन्स वापरणं हानिकारक आहे.