भारतीय आहार पद्धतीमध्ये गहू हा महत्त्वाचा आहे. अनेकांचा रोजचा दिवस या गव्हापासून बनलेल्या पदार्थांनी होतो. चहा-चपाती, त्यानंतर जेवणातही चपाती, पुरी यांची मागणी असते. भारताच्या कुठल्याही कोप-यात गेले तरी चपाती आणि पुरी यांच्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही. याच गव्हाच्या अनेक जाती आता येऊ लागल्या आहेत. भारतात अलिकडे खपली गहू आणि काळ्या रंगाचा गहू लोकप्रिय होऊ लागला आहे. या गव्हामध्ये साखरेचे प्रमाण कमी असते, तसेच आरोग्यदायी असलेले हे गव्हाचे प्रकार लोकप्रिय होत असतानाच आता निळ्या रंगाच्या गव्हालाही (Blue wheat) मोठी मागणी वाढली आहे. या निळ्या रंगाच्या गव्हामध्ये अधिक आरोग्यदायी मुल्य असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे. त्यामुळेच या गव्हाला मोठी मागणी आहे. या निळ्या गव्हाची (Blue wheat) लागवड शेतक-यांनी करावी आणि डबल फायदा मिळवावा असे आवाहनच शेती तज्ञांनी केले आहे.

भारतात गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. पंजाबला तर गव्हाचे कोठार म्हणतात. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात आणि बिहार ही भारतातील गव्हाचे उत्पादन करणारी प्रमुख राज्ये आहेत. कृषीप्रधान देश म्हणून ओळखल्या जाणा-या आपल्या देशात गव्हाची शेती मोठ्या प्रमाणात होते. याच गव्हाचे उत्पन्न अधिक वाढवण्यासाठी शेतकरी नवनवीन प्रयोग करत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पारंपरिक गहू पिकाची लागवड करताना नव्या गव्हाच्या (Blue wheat) जातीही शोधून काढल्या आहेत. यामध्ये खपली गहू लोकप्रिय ठरला आहे. या खपली गव्हाची लोकप्रियता वाढत असतांना काळ्या रंग्याच्या गव्हाची जात आली. या दोन्हीही गव्हामध्ये अधिक पोषक तत्वे असल्याचे सिद्ध झाले आहे. आता यासोबत निळ्या रंगाच्या गव्हाचे (Blue wheat) पिकही काही शेतक-यांनी घेतले आहे. हा निळा रंगाचा गहू चरबीसोबतच कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी खूप उपयुक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात मुख्य म्हणजे या गव्हाचा रंग. या निळ्या रंगाचे गहू पिठ हे दिसायला खूप छान दिसते, त्यामुळे त्याचा चपाती, पुरी याशिवाय अन्य पदार्थांतही मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. निळ्या गव्हापासून बनवलेले ब्रेड आणि बिस्किटे यांना मोठी मागणी वाढली आहे.
मध्य प्रदेशातील काही शेतकऱ्यांनी निळ्या गव्हाचे (Blue wheat) उत्पादन सुरू केले आहे. निळ्या गव्हाच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. या गव्हाच्या रंगामुळे त्याला प्रथमतः अधिक मागणी होती. मात्र त्यातील पोषक तत्वांची माहिती पुढे येताच ही मागणी दुप्पटीनं वाढली आहे. तसेच या गव्हाची किंमतही अधिक असली तरी त्याला मागणी आहे, हे विशेष. त्यामुळेच आता अन्य शेतक-यांनीही निळ्या रंगाच्या गव्हाची लागवड करण्यावर जोर दिला आहे. परदेशातही या निळ्या गव्हाची (Blue wheat) मागणी वाढली आहे. निळा गहू आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे मत शेतीतल तज्ञांनी मांडले आहे. निळा गहू चरबीसोबतच कोलेस्टेरॉल आणि रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. हा गहू अत्यंत किंमती असला तरी त्याची लागवड करतांना अधिक खर्च करावा लागत नाही. नेहमीच्या गव्हासारखीच या गव्हाची लागवड होते. सामान्य गव्हाच्या पिकाप्रमाणेच निळ्या गव्हाची लागवड केली जाते. त्यामुळेच शेतक-यांना या निळ्या गव्हापासून डबळ फायदा होत आहे. मध्यप्रदेशात आणि उत्तरप्रदेशमधील भदोहीमध्येही निळ्या गव्हाची लागवड केली जात आहे. काळ्या गव्हाच्या लागवडीत यश मिळाल्यानंतर शेतकरी निळ्या गव्हाच्या लागवडीकडे वळत आहेत. हे निळ्या रंगाच्या गव्हाचे बियाणे चेन्नईमध्ये उपलब्ध आहे. त्याला मिळणारी मागणी आणि त्याची किंमत बघता शेतक-यांनी या निळ्या रंगाच्या गव्हाला अधिक पसंती दिली आहे.
========
हे देखील वाचा : उंचावरुन खाली पडत असल्याचे स्वप्न पडले तर त्याचा अर्थ काय होतो?
========
सुरुवातीला जेव्हा काळ्या रंगाचा गहू बाजारात आला तेव्हाही खूप उत्सुकता होती. मात्र नेहमीच्या पिवळ्या रंगाच्या गव्हापेक्षाही काळा गहू आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर काळ्या गव्हाचे उत्पादन महाराष्ट्र, मध्यप्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश, राज्यस्थान या राज्यात मोठ्या प्रमाणात घेण्यात येऊ लागले. काळ्या गव्हाच्या वाणाचे संशोधन मोहाली, पंजाब येथील राष्ट्रीय कृषी खाद्य जैव तंत्रज्ञान संस्था येथे करण्यात आले होते. काळ्या गव्हापासून बनवलेल्या पदार्थांचा जेवणात समावेश असल्यास रक्तदाब नियंत्रणात रहातो. कॉलेस्ट्रॉलचे प्रमाणही यामुळे कमी होत असल्याचे तज्ञ सांगतात. आता या काळ्या गव्हासोबत निळ्या रंगाचा गहूही उपलब्ध झाला आहे. त्यामुळे गव्हाच्या या रंगीन रुपामुळे गव्हाची मागणी अधिक वाढणार आहे.
सई बने