Home » नेपाळ राजघराण्याचा रक्तरंजीत इतिहास

नेपाळ राजघराण्याचा रक्तरंजीत इतिहास

by Team Gajawaja
0 comment
Nepal Black day
Share

1 जून 2001 ही तारीख नेपाळच्या इतिहासात काळ्या दिवसासारखी (Nepal Black day) आहे. आपल्या शेजारच्या या छोट्या देशात बरोबर 22 वर्षापूर्वी एक भयानक हत्याकांड घडले. या हत्याकांडांनं या देशातील राजेशाही संपूष्टात आली. हे हत्याकांड राजघराण्यातीलच एका राजकुमारानं घडवलं.  त्यानं आपल्या राजा असलेल्या वडिलांसह आई, भाऊ, बहिण आणि अन्य नऊ नातेवाईकांना गोळ्या घालून ठार केलं. नंतर स्वतःलाही संपवले.  हे हत्याकांड होत असतांना राजकुमाराला थांबवण्याचा प्रयत्न करणारे अनेक जखमी झाले. जखमी इतके होते की,  त्या दिवशी नेपाळच्या सर्वात मोठ्या हॉस्पिटलमध्ये बेडच शिल्लक राहिले नव्हते. एवढ्या मोठ्या हत्याकांडानंतर राजकुमारानं असं का केलं हा प्रश्न विचारला गेला.  तेव्हा मोबाईलचा जमाना नव्हता. वृत्तपत्र आणि मासिकाचे रकानेच्या रकाने भरुन या हत्याकांडावर लेख येत असत आणि त्यामागचे कारणही येत असे.  यामागे राजकुमाराचे प्रेम, त्याला मिळालेला राजघराण्याकडून नकार ते अमेरिकेची गुप्तहेर संघटना आणि नेपाळमधील माऊवादी आदी सर्वांची नावं पुढे करण्यात आली, चर्चा झाली. पण हे कोडं कधीच सुटलं नाही. कारण हत्याकांड करणारा राजकुमारही जखमी झाला होता आणि तीन दिवसानंतर त्याचाही मृत्यू झाली. 22 वर्षापूर्वी झालेल्या या हत्याकांडानं नेपाळमधील राजघराण्याचा अंत झाला. यासर्वांमागे एका साधूचा शाप असल्याची कथाही नंतर सांगण्यात येऊ लागली. पण असे असले तरी नेपाळसारख्या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला या हत्याकांडानं हादरवलं होतं. त्यामुळे 1 जून ही तारीख नेपाळच्या इतिहासात काळ्या अक्षरात लिहिली गेली. (Nepal Black day)

नेपाळच्या राजघराण्याच्या पार्ट्या खास असायच्या. यात राजघराण्यातील सर्व सदस्यांनी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी सहभागी व्हावे असा दंडक होता. कुटुंबाचे एक छोटे संमेलनच या पार्टीतून व्हायचे. अशीच पार्टी 1 जून 2001 रोजी, शुक्रवारी होत होती. काठमांडूमधील नारायणसिटी पॅलेसमध्ये पार्टी होती. यात प्रिन्स दीपेंद्र उशीरा आला. तो येताच जाणीव झाली की, त्यानं दारु घेतली असून त्याला उभंही राहता येत नव्हतं. त्याला त्याचा लहान भाऊ निरंजन आणि चुलत भाऊ पारस यांनी त्याच्या खोलीत नेऊन झोपवले. प्रिंन्स दीपेंद्रच्या वागणुकीनं पार्टी काही काळ थांबली. पण काही वेळात राणी ऐश्वर्याही तेथे पोहचली. राजाही काही वेळानं आले आणि सर्व कुटुंबीय पुन्हा गप्पा आणि हास्यात रंगून गेले. तासाभरानंतर प्रिन्स दीपेंद्र आर्मीचा गणवेश घालून पार्टीच्या स्थळी आला. त्याच्या एका हातात जर्मन मशीनगन MP5K आणि दुसऱ्या हातात Colt M16 रायफल होती. शिवाय त्याच्या पँटमध्ये 9 एमएमची पिस्तूलही लावलेली होती. दीपेंद्रला अशा अवस्थेत बघून सर्वांना आश्चर्य वाटले. कोणी काही बोलण्यापूर्वी त्यानं आपले वडील, राजे बिरेंद्र शाह यांच्याकडे पाहिले आणि क्षणात बंदुकीच्या गोळ्या चालू झाल्या.  यात पहिला बळी गेला तो राजे बिरेंद्र यांचा. मग राणी ऐश्वर्या,  धाकटा भाऊ प्रिन्स निरजन,  दीपेंद्रचे काका, बहिणी, त्यांचे पती या सर्वांवर गोळ्या झाडण्यात आल्या. शेवटी दीपेंद्रनं स्वतःवरही गोळ्या मारुन घेतल्या. (Nepal Black day)

अगदी पाच मिनिटापेक्षाही कमी कालावधीत दीपेंद्रनं आपल्या कुटुंबाला संपवलं. सोबत त्याला अडवण्याचा प्रयत्न करणारे कितीतरी जखमी झाले आणि मारले गेले. राजवाड्यात एकच गोंधळ उडाला.सर्व जखमींना तातडीनं काठमांडूच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं.  राणी ऐश्वर्यानं प्रवासातच जीव सोडला. राजे बिरेंद्र जिवंत होते. पण उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.अशीच अवस्था बाकी राजघराण्यातील सदस्यांची होती. फक्त दीपेंद्र तीन दिवस मृत्यूबरोबर झगडत होता. त्यानंतर त्याचाही मृत्यू झाला.(Nepal Black day) 

या घटनेनं नेपाळच काय पण सर्व जग हादरलं. भारतातही सर्व वातावरण सुन्न झालं. विशेष म्हणजे, सिंधिया राजघराण्याला जबर धक्का बसला. कारण या हत्याकांडाला जबाबदार असलेला प्रिन्स दीपेंद्र आणि सिंधिया राजघराण्याबरोबर नातं असलेली देवयानी याचं प्रेमप्रकरण होतं. दोघंही परदेशात एकाच विद्यापीठात शिकले. तिथेच त्यांचं एकमेकांवर प्रेम बसलं. पण या प्रेमाला नेपाळच्या राजघराण्यानं स्विकारलं नाही. राणी ऐश्वर्या यांना त्यांच्या भावाच्या मुलीसोबत प्रिन्सचा विवाह करुन द्यायचा होता. त्यांनी देवयानीला ठाम विरोध केला.  प्रिन्स दीपेंद्र यांनी जवळपास चार ते पाच वर्ष आपल्या कुटुंबाला देवयानीसोबत लग्न करण्यासाठी होकार द्यावा म्हणून तयार करण्याचा प्रयत्न केला.  पण त्यात अपयशी झाल्यानं त्यांनी निराशेनं हे कृत्य केल्याचे सांगितले गेले.  देवयानी ही नेपाळमध्ये तीन वेळा मंत्री राहिलेल्या पशुपती समशेर जंग बहादूर राणा यांची मुलगी. देवयानीची आई, बहादूर राणाची पत्नी ग्वाल्हेर प्रांताचे महाराज जिवाजीराव सिंधिया आणि महाराणी विजयराजे सिंधिया यांची कन्या. या घटनेनंतर देवयानीलाही मोठा धक्का बसल्याचे सांगण्यात आले.  पण त्यानंतर देवयानीची कुठलीही बातमी बाहेर आली नाही.  (Nepal Black day)

=======

हे देखील वाचा : इराण अफगाणिस्तानमध्ये पाण्यासाठी युद्ध…

======

या हत्याकांडानंतर नेपाळमधील माओवादी नेते बाबुराम भट्टराई यांनी ही संपूर्ण घटना राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप केला.  यात अमेरिकेची गुप्तचर संस्था CIA आणि भारताची गुप्तचर संस्था रॉ चा सहभाग असल्याचा आरोपही त्यांनी केला.  हत्याकांडाच्या दिवशी राजा बिरेंद्रचे धाकटे बंधू ज्ञानेंद्र हे राजवाड्यात नव्हते.  त्यामुळे त्यांचा मुलगा राजकुमार पारस यांच्यासह ज्ञानेंद्र यांच्या कुटुंबातील सर्वांचे प्राण वाचले. अर्थात राजगादी नंतर ज्ञानेंद्र यांच्याकडे आली. त्यामुळेच राजगादी मिळवण्यासाठी ज्ञानेंद्र आणि पारस यांनी हे हत्याकांड घडवून आणल्याची चर्चाही झाली. 

यासर्वात एक कथाही सांगण्यात येते. 1769 मध्ये पृथ्वी नारायण शाह यांनी नेपाळमधील तीन संस्थाने जिंकून स्वतःला राजा घोषित केले होते.  एकदा एका साधूनं त्यांना त्याच्याजवळचे दही खायला दिले.  पण राजानं उष्ठे काही खात नाही, म्हणून ते दही टाकून दिले.  हे दही टाकतांना राजाच्या पायाच्या दहाही बोटांवर पडले. तेव्हा साधूंने शाप दिला की दहा पिढ्यानंतर तुझा राजवंश संपूष्टात येईल.  त्याच शापामुळे  नेपाळचे राजघराणे संपल्याची चर्चाही रंगली. अर्थात या सर्व चर्चाच होत्या.  मुळ कारण मात्र प्रिन्स दीपेंद्र यांच्यासोबत निघून गेले. आता या घटनेला 22 वर्ष झाली असली तरी  या हत्याकांडाचे गुढ मात्र जैसे थे आहे.

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.