श्रीकांत नारायण
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गेल्या महिन्यात आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा महाविस्तार केला आणि लगेचच नव्या मंत्र्यांना कामाला लावले आहे. काही नवे मंत्री, मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या मतदारसंघात जाऊन सत्कार-सोहळ्याची सुखस्वप्ने पाहत असतानाच त्यांना, भाजपतर्फे ‘जनआशीर्वाद यात्रा’ काढण्याचे फर्मान काढण्यात आले. त्यामुळे काही मंत्र्यांचा चांगलाच हिरमोड झाला असेल आणि मंत्रिपद म्हणजे कसा ‘काटेरी मुकुट’ असतो याचीही लवकरच खात्री पटली असेल.
वास्तविक उत्तरप्रदेशसह काही राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे त्या राज्यांमध्ये भाजपतर्फे याआधीच जनआशीर्वाद यात्रा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र महाराष्ट्रात नजीकच्या काळात विधानसभा निवडणुका नसतानाही राज्यातील चार नव्या केंद्रीय मंत्र्यांना आपापल्या विभागात जाऊन जनआशीर्वाद यात्रा काढण्याचा पक्षातर्फे आदेश देण्यात आला.
महाराष्ट्रात पुढील सहा महिन्यात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी २२ महापालिकांसह, अनेक नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा निवडणुकीचीच शक्तिपरीक्षा असल्यामुळे कदाचित या चार नव्या मंत्र्यांना ‘जनआशीर्वाद यात्रा’ काढण्यास फर्मावले असावे.

शिवाय यानिमित्ताने राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला कायम धारेवर धरण्याची संधीही मिळू शकते हा विचार करूनच भाजपतर्फे हा महत्वाचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला असावा. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील नवे केंद्रीय मंत्री नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि भारती पवार यांनी आपापल्या जनआशीर्वाद यात्रा सुरूही केल्या आहेत.
यापैकी नारायण राणे (Narayan Rane) यांच्याकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नारायण राणे हेच शिवसेनेला चांगल्याप्रकारे शह देऊ शकतात अशी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपश्रेष्ठींची खात्री पटल्याने त्यांच्याकडे साहजिकच ही जबाबदारी सोपविण्यात आली असावी. त्याच उद्देश्याने त्यांना मंत्रिपदही देण्यात आले आहे.
नारायण राणे हे आधी शिवसेनेत होते. शिवसेनेत असताना त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपदही भूषविले होते. त्यामुळे त्यांना शिवसेनेचा ‘खरा चेहरा’ माहित असल्यामुळे आणि शिवसेनेला ‘कोणत्या भाषेत उत्तर’ द्यायचे याचीही त्यांना ‘कला’ माहित असल्यामुळे त्यांच्यावर मुंबई महापालिकेची जबाबदारी टाकण्यात आली असावी हे उघड आहे. त्याप्रमाणे जनआशीर्वाद यात्रा सुरु करताना राणे यांनी त्याची झलकही दाखविली आहे.
नारायण राणे यांनी आपल्या जनआशीर्वाद यात्रेची सुरुवातच दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन त्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन केली. ”बाळासाहेबांचे आशीर्वाद मला हवे होते आणि ते यानिमित्ताने मला मिळाले” असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले. आणि नंतर त्यांनी शिवसेनेवर आपल्या भाषेत नेहमीप्रमाणे तोंडसुख घेतले.

वडिलांचे आशीर्वाद त्यांच्याच मुलाच्या पतनासाठी मिळू शकतील काय? याचा सारासार विचार देखील त्यांनी केलेला नसावा असे दिसते. म्हणजे ज्या पक्षाविरुद्ध त्यांना लढायचे आहे त्याच पक्षाच्या एकेकाळच्या प्रमुखाचे आशीर्वाद त्यांना घ्यावेसे वाटतात हे राजकीय दिवाळखोरीचेच लक्षण आहे असे म्हणावे लागेल. पण ‘पक्षबदलू’ नेत्यांनी अशी वैचारिक ‘दिवाळखोरी’ राजकारणात कधीच आणली आहे आणि त्याला आता सरसकट मान्यताही मिळाली आहे.
शिवसेनेने (Shiv Sena) मात्र राणे यांच्या या कृत्याची लगेच दखल घेतली. शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी, त्यांच्या मते राणे यांच्या पदस्पर्शाने अमंगल झालेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मारक स्थळाचे ‘गोमूत्र’ शिंपडून शुद्धीकरण केले. ते कळल्यानंतर राणे यांनी त्यांच्याच भाषेत शिवसेनेला प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांनी तर शुद्धीकरणाच्या या प्रकाराची ‘तालिबानी कृत्याशी’ तुलना केली त्यामुळे जनआशीर्वाद यात्रा जोपर्यंत चालणार तोपर्यंत असाच कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळणार असे दिसते. थोडक्यात जनआशीर्वाद यात्रेच्या प्रारंभीच राणे यांनी शिवसेनेला ‘अंगावर’ घेतले. आता मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना राणे यांना कशी ‘शिंगावर’ घेणार ते पाहावे लागेल.
दुसरीकडे केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या जनआशीर्वाद यात्रेत पक्षांतर्गत गटबाजीचे दर्शन पाहायला मिळाले. पंकजाताई मुंडे यांना ‘अंगार’ मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी इतरांची ‘भंगार’ या शब्दात तुलना केली त्यामुळे पंकजाताई कार्यकर्त्यांवर भडकल्या आणि त्यांनी आपल्या भगिनी प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिपद न मिळाल्याची खदखद कार्यकर्त्यांवर रागावून व्यक्त केली. अप्रत्यक्ष का होईना पंकजाताईंना आपला राग काढण्याची संधी यानिमित्ताने मिळाली मग त्या अशी संधी कशी सोडतील?

कराड यांच्या या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे मात्र आपली बोलण्याची हौस चांगल्यापकारे भागवून घेत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात भूकंप झाला मात्र आपली साधी वीट ही हल्ली नाही याचेच त्यांना केवढे कौतुक. कदाचित नव्या बदलात दानवे यांना रेल्वे राज्यमंत्रीपद मिळाले असल्याने त्यांची ”वाणी एक्स्प्रेस” सुसाट वेगाने धावत असेल. त्याऐवजी त्यांनी रेल्वेच्या काही योजना सांगितल्या असत्या तर मराठवाड्यातील जनतेला आनंदच झाला असता. परंतु जनतेचे आशीर्वाद मिळायचे असतील तर जनतेची चांगली करमणूक केली पाहिजे असाच त्यांचा ग्रह झालेला दिसतोय.
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेत देखील ‘टिकटॉक स्टार’ आणल्यामुळे गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.
वास्तविक केंद्र सरकारच्या अनेक चांगल्या योजना सामान्य माणसांना कळाव्यात आणि त्या योजनांचा त्यांनी लाभ घ्यावा हा या ‘जनआशीर्वाद यात्रे’चा मुख्य हेतू आहे मात्र या यात्रेत तसे काही दिसत नाही. जागोजागी मंत्र्यांचे सत्कार आणि त्यांनी शिवसेना आणि आघाडी सरकारमधील अन्य पक्षांवर घेतलेले तोंडसुखच प्रामुख्याने पाहायला मिळते. सामान्य जनता तर ते रोजच पाहते आहे. जनतेला यामध्ये फारसा रस नाही हे संबधितांना कधी कळणार?

याशिवाय दुसरे विशेष म्हणजे महाराष्ट्रावरील ‘कोरोना’ महामारीच्या संकटाचे सावट अजूनही कायम आहे. त्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे. मात्र कोणतेही राजकीय पक्ष ही जबाबदारी ओळखून आपली पावले टाकत नाहीत असेच सध्याचे चित्र आहे. जी काही खबरदारी घ्यायची ती जनतेनेच घावी अशीच या पक्षांची अपेक्षा दिसते. त्यामुळे अशा ‘जनआशीर्वाद यात्रे’मुळे जनतेचे खरेच आशीर्वाद मिळणार की जनतेची नाराजी व्यक्त होणार हे निवडणूक निकालातच स्पष्ट होईल.
– श्रीकांत नारायण
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.