गेली काही वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणातील वादळ वाऱ्यांना तोंड देत एक ‘गड’ मजबुतीने उभा आहे. हा ‘गड’ नित्य ‘नितीन’ आहे. नवनवीन कल्पना हा त्याचा श्वास आहे. त्यामुळे विकासाचा गाडा सुंदर आणि गुळगुळीत रस्त्यावर चालविण्याचा त्याचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यामुळे हा ‘गड’ आता केवळ महाराष्ट्राच्या पातळीवर मर्यदित राहिला नाही तर केंद्रीय पातळीवर त्याची ख्याती झाली आहे. एक कार्यक्षम मंत्री म्हणून विरोधक देखील त्यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करतात. हा ‘गड’ कोणता आणि ‘गडकरी’ कोण हे एव्हाना तुम्ही ओळखलेच असेल.
विकासाच्या रस्त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार करणारा हा ‘गडकरी’ केवळ महाराष्ट्रातील जनतेच्या नव्हे तर देशातील जनतेच्या आशेचा केंद्र बनला आहे. सत्ता असूनही तिच्यावर कायम तुळशीपत्र ठेवण्याच्या तयारीत असणारा आणि विकासासाठी ‘सत्ता’ कशी राबवावी याचे एक आदर्श उदाहरण असणारा हा ‘गडकरी’ राजकारणात तर विरळाच म्हणावा लागेल. पट्टीचा खवय्या असणारा हा गडकरी जे ओठातून पोटात जाते त्याची सदैव जाणीव ठेवणारा आहे आणि त्यामुळेच राजकारणात असूनही ‘जे पोटात तेच ओठात’ असे बोलणारा आणि त्याप्रमाणे वागणाऱ्या या नेत्याने एक समंजस राजकारणी म्हणून लोकप्रियता मिळविली आहे.
लोकसभेत नागपूर शहराचा ‘गड’ सांभाळणारे नितीन गडकरी (Nitin Gadkari) मूळचेच चळवळ्या स्वभावाचे आहेत. लहानपणी रा. स्व. संघाचे संस्कार झालेले गडकरी कॉलेज जीवनात अ. भा. विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होते. वैचारिक बैठक पक्की झाल्यावर ते नंतर जनसंघात आणि भाजपमध्ये गेले. निवडणुकीत कधी विजय तर अनेकदा पराजय याचा अनुभव घेत घेत त्यांनी राजकारणात आपली स्वतंत्र प्रतिमा निर्माण केली. पराजयामुळे ते कधी खचले नाहीत वा विजयानेही कधी हुरळून गेले नाहीत. १९८० मधील प्रसंग त्याची एक साक्ष आहे. जनता पक्षात विलीन झालेल्या जनसंघाने जनता पक्षातून बाहेर पडताना “भारतीय जनता पक्ष” (BJP) या नावाने नव्या राजकीय पक्षाचे रूप धारण केले. नव्या पक्षाची उभारणी होत असतानाच १९८४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला लोकसभेत अवघ्या दोनच जागा मिळाल्या.
अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखे दिग्गज नेते त्या निवडणुकीत पराभूत झाले कारण तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत सर्वच काँग्रेसविरोधी पक्ष पालापाचोळ्यासारखे उडून गेले होते. त्यामुळे भाजपमध्ये कमालीचे नैराश्य निर्माण झाले. स्वतः नितीन गडकरी यांना “या पक्षात आता तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना भवितव्य उरले नाही त्यामुळे तुम्ही दुसऱ्या पक्षाचा आश्रय घ्या” असे सांगण्यात येऊ लागले. परंतु वैचारिक बैठक पक्के असलेले गडकरी ठाम होते. पक्षाच्या दारुण पराभवातच त्यांनी पक्षाचे उज्ज्वल भवितव्य पाहिले आणि वाजपेयी-अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली पक्षकार्याला नव्या जोमाने बांधून घेतले. त्याची फलनिष्पत्ती म्हणून की काय, त्याच्या पुढील निवडणुकीत भाजपच्या खासदारांची संख्या दोनवरून एकदम ८४ वर गेली आणि नंतर वाढत वाढत जाऊन दहाच वर्षात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणित एनडीए आघाडीचे सरकार केंद्रात सत्तेवर आले.
सुरुवातीच्या काळात नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातातच आपले लक्ष्य केंद्रित केले. नागपूरमधून भाजपचे आमदार म्हणून निवडून आल्यानंतर १९९५ ते १९९९ या काळात महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या भाजप-शिवसेनेच्या आघाडी मंत्रिमंडळात ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री झाले. आपल्या आवडत्या खात्याचा त्यांनी पुरेपूर अभ्यास केला आणि त्याचा जनतेलाही लाभ करून दिला. त्याकाळात गडकरी यांनी मुंबई आणि नागपूर शहरात वाहतूक सुरळीत आणि जलद होण्यासाठी उड्डाणपुलांचे जे जाळे निर्माण केले त्याला खरोखरच तोड नव्हती. तसेच मुंबई-पुणे वाहतूक जलद आणि सुरळीत होण्यासाठी त्यांनी ‘एक्स्प्रेस वे’चे काम झपाट्याने पूर्ण केले. भारतातील या पहिल्या सहा पदरी मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्याचे सारे श्रेय गडकरी यांच्या आखीव-रेखीव नियोजनालाच जाते. या ‘एक्सप्रेस-वे’मुळे जणू काही त्यांना रस्ते-विकासाचे वेडच लागले. म्हणूनच की काय, केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार सत्तेवर असताना नितीन गडकरी यांची ‘राष्ट्रीय ग्रामीण रस्ते विकास महामंडळा’च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. यामुळे गडकरी यांच्या रस्तेविकासाच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविण्याची संधी मिळाली. त्यांनी अतिशय परिश्रम घेऊन, सखोल अभ्यास करून आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या असंख्य बैठका घेऊन प्रात्यक्षिकांसह आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला. वाजपेयी सरकारने तो अहवाल लगेच स्वीकारला आणि त्यातून ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजना’ हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला. या योजनेमुळे देशात असंख्य गावे चांगल्या आणि पक्क्या रस्त्यांनी शहरास जोडली गेली.
हे देखील वाचा: मुंडे साहेबांबद्दल तुम्हाला हे माहीत आहे का?
हे काम करीत असतानाच गडकरी यांनी पक्षवाढीसाठीही प्रयत्न केले. २००९ ते २०१३ या अत्यंत कठीण काळात ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षही झाले. कारण त्याच्या आधीच्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला सत्ता मिळाली होती. मात्र त्यानंतर २०१४ साली तसेच २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग दोन वेळा भाजपचे सरकार केंद्रात सत्तेवर आले. पंतप्रधान मोदी यांनी नितीन गडकरी यांना त्यांचे आवडते ‘रस्ते वाहतूक विकास’ हेच खाते दिले आणि गडकरी यांनी ते अतिशय कार्यक्षमतेने सांभाळले. त्यामुळे आज देशात ठिकठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे तसेच ग्रामीण भागातील रस्ते जोडण्याचे काम अतिशय वेगात होताना दिसून येत आहे. ‘कोरोना’सारख्या महामारीच्या काळात लॉकडाऊन असतानाही रस्त्यांची कामे चालूच आहेत त्याला गडकरी यांचा ‘कामाचा धडाका’च कारणीभूत आहे. हे कोणीही मान्य करेल.
नितीन गडकरी हे विदर्भाचे असल्यामुळे जसे पट्टीचे खवय्ये आहेत तसेच बोलण्यातही ‘बेधडक’ आहेत. त्यामुळेच “अकार्यक्षम अधिकाऱ्यांना तसेच भ्रष्टाचारी ठेकेदारांना वेळ आली तर चांगले ‘ठोकून’ काढा” असे जाहीर विधान ते करू शकतात. २०१४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्यावेळी गडकरी यांनी असेच केलेले बेधडक विधान चांगलेच गाजले होते. एका निवडणूक प्रचार सभेत मतदारांना उद्देशून बोलतांना गडकरी म्हणाले होते, “तुम्हाला लवकरच ‘लक्ष्मी दर्शन’ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच दिवसात अवैध मार्गाने मिळविलेला पैसा बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही ‘लक्ष्मी’ला नाही म्हणू नका. मिळेल तेवढे घ्या मात्र मतदान करताना, महाराष्ट्राच्या विकासालाच मत द्या” त्यांच्या या विधानाची निवडणूक आयोगानेही गंभीर दखल घेतली होती. मात्र त्यासंदर्भात केलेल्या बिनतोड ‘युक्तिवादानंतर’ त्यातून ते सहीसलामत सुटले.
राजकारणात राहूनही आणि विशिष्ट विचारसरणीचे असूनही गडकरी यांनी आपला ‘उमदा स्वभाव’ कधी सोडला नाही. लोकशाहीत विरोधी पक्षाचे स्थान हे नेहमीच महत्वाचे असते यावर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे त्यांचे सर्वच पक्षात चांगले मित्र आहेत. विरोधी पक्षाचे नेतेही त्यांच्या कुशल आणि धडाकेबाज कामाची प्रशंसा करतात. त्यामुळेच सध्याच्या ‘कोरोना’ महामारीच्या काळात देशात ‘लस’ आणि इतर कारणावरून जे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यातून गडकरीच तारू शकतात असे काहीजणांना वाटते. भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी ‘कोरोना’च्या संकटकाळातून बाहेर पडण्यासाठी गडकरी यांच्याकडे नेतृत्वाची सूत्रे द्यावीत असे जे विधान केले आहे त्याला काही विरोधी पक्षनेत्यांनीही पाठिंबा दिला आहे. एक समंजस आणि कार्यक्षम नेता म्हणून गडकरी यांनी देशात जे स्थान निर्माण केले आहे त्याचा हा ढळढळीत पुरावाच आहे असे म्हणावे लागेल.
- श्रीकांत ना. कुलकर्णी
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)