Home » शाळा बदलण्याचा हट्ट, हौसेखातर केलेलं मॉडेलिंग देवेंद्र फडणवीसांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू 

शाळा बदलण्याचा हट्ट, हौसेखातर केलेलं मॉडेलिंग देवेंद्र फडणवीसांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू 

by Team Gajawaja
0 comment
Devendra Fadnavis
Share

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कोणत्याही कारणानं चर्चेत आले की, सगळ्यात आधी आठवण निघते, ती त्यांनी तरुणपणी नागपुरात केलेल्या मॉडेलिंगची! रंगीबेरंगी शर्ट घालून स्टायलिश पोझ देत फडणवीस यांनी केलेलं फोटोसेशन आजही दाद मिळवून जातं.

फार मोजकी नेतेमंडळी अष्टपैलू म्हणण्यासारखी असतात आणि अशा नेत्यांमध्ये सध्या देवेंद्र फडणवीसांचं नाव आघाडीवर आहे आणि त्यांच्या चाहत्यांच्या म्हणण्यानुसार ते न्याय्यही आहे. गेल्या महिन्यात महाराष्ट्राच्या जनतेनं फडणवीस यांचा राजकीय मुत्सद्दीपणा नव्याने अनुभवलेला असला, तरी त्याहीपलीकडे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे बरेच पैलू आहेत. (BJP Leader Devendra Fadnavis)

कमी वयात धडाडीने केलेला राजकीय प्रवास, पक्षश्रेष्ठींपर्यंत असलेली लोकप्रियता, प्रभाव टाकणारं सुसंस्कृत व्यक्तिमत्व, चोख नियोजन, अभ्यासपूर्ण वक्तृत्व आणि सत्तेची समीकरणं बदलवू शकणारी राजकीय हुशारी असे त्यांचे सगळेच गुण सध्या चर्चेत आहेत आणि नेहमीप्रमाणे त्यासोबत खमंग फोडणीसारखे त्यांनी एकेकाळी केलेल्या मॉडेलिंगचे फोटोही नव्याने व्हायरल झाले आहेत.

लाल फुलांचा शर्ट, गॉगल आणि स्टायलिश पोझ

२००६ मध्ये देवेंद्र यांनी नुकतंच वजन कमी केलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आणखी प्रसन्नता आली होती. ते पाहून त्यांचे लहानपणीचे मित्र आणि फोटोग्राफर विवेक रानडे यांनी त्यांना नागपुरामधल्या एका कपड्यांच्या दुकानासाठी मॉडेलिंगची विनंती केली. तेव्हा फडणवीस राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. जनप्रतिनिधीनं अशाप्रकारचं फोटोशूट करण्यात गैर ते काय, असं म्हणत रानडे यांनी देवेंद्र यांना फोटोशूटसाठी तयार केलं आणि त्यांना साजेसं जोरदार फोटोशूटही केलं. (BJP Leader Devendra Fadnavis)

एका फोटोत राखाडी रंगाचा स्वेटर, डोक्यावर गॉगल आणि खुर्चीवर एकच पाय ठेवत दिलेली स्टायलिश पोझ आणि दुसऱ्यात मोठ्या आकाराच्या लाल फुलांचा काळा शर्ट आणि हातात घड्याळ घातलेले देवेंद्र फडणवीस पाहिल्यानंतर राजकीय भूकंप घडवून आणणारे हेच का ते फडणवीस, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. (BJP Leader Devendra Fadnavis)

या वेशेभूषेमधली फडणवीसांची पाच मोठी होर्डिंग्ज तेव्हा नागपुरात जवळपास महिनाभर लागलेली होती. नंतरही रानडे यांनी देवेंद्र यांना परत फोटोशूटसाठी विचारलं होतं, पण “एकदा गंमत म्हणून केलं. मला त्यात रस नाही”, असं म्हणत फडणवीसांनी नकार दिला. राजकारणात “मी परत येईन..” म्हणणारे फडणवीस मॉडेलिंगमध्ये काही परत गेले नाहीत. 

“त्यांचं नुकतंच लग्न झालं होतं आणि कामाचा व्यापही वाढायला लागला होता, म्हणून मी त्यांना फार आग्रह केला नाही”, असं रानडे सांगतात. रानडेंनी आग्रह केला असता तर, कदाचित त्यांच्या मॉडेलिंगचे आणखी फोटोही आपल्याला पाहायला मिळाले असते. 

====

हे देखील वाचा – राजकरणातील दादा ते घरातील मंडळींसाठी आधारवड- अजित पवार

बाणेदारपणा लहानपणापासूनच

लहान असताना देवेंद्र इंदिरा कॉन्व्हेंट नावाच्या शाळेत जायचे, पण अचानक एक दिवस त्यांनी या शाळेत जायचं नाही म्हणून हट्ट धरला. पाच- सहा वर्षाच्या मुलाचा बालहट्ट म्हणून सुरुवातीला घरच्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, पण देवेंद्र आपल्या म्हणण्यावर ठाम होते. त्यांना काही केल्या त्या शाळेत जायचं नव्हतं. आपल्याला दुसऱ्या शाळेत घाला असंच ते सांगत राहिले आणि त्यामागे चक्क राजकीय कारण होतं. (BJP Leader Devendra Fadnavis)

तेव्हा आणीबाणी लागू झालेली होती आणि राजकारणात सक्रिय असलेले देवेंद्र यांचे वडील गंगाधरराव यांना सरकारविरोधी आंदोलनामुळे तुरुंगात जावं लागलं होतं. ज्यांच्यामुळे आपल्या वडिलांना तुरुंगात जावं लागलं, त्यांच्या नावाच्या शाळेत जायचं नाही, असं लहानग्या देवेंद्रचं म्हणणं होतं. घरच्यांनीही त्यांच्या बाणेदारपणाला दाद देत सरस्वती विद्यालय शाळेत त्यांचं नाव घातलं आणि तिथूनच त्यांनी आपलं पुढचं शिक्षण पूर्ण केलं.

उच्च शिक्षित आणि तंत्रज्ञानप्रेमी

नागपूर विद्यापीठामधून कायद्याचे पदवीधर असलेल्या फडणवीसांनी नंतर बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले, शिवाय जर्मनीच्या डीएसई जर्मन फाउंडेशन संस्थेमधून मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमाही मिळवला. तंत्रज्ञानाची प्रचंड आवड असल्यामुळे त्यांच्यासोबत कायम आधुनिक गॅजेट्स असतात. आकडेवारीसह माहिती गोळा करण्याचं त्यांचं वैशिष्ट्य आणि उत्कृष्ट भाषण लिहिणं आणि करणं हे त्यांचे लोकप्रिय गुण. विशेष म्हणजे, ते आपल्या या गुणांचा उपयोग ते सर्वपक्षीय मित्रांना मदत करण्यासाठीही वापरतात; हा त्यांचा अजून एक गुण म्हणावा लागेल. 

कीर्ती परचुरे


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.