बिहार निवडणुकांचे निकाल आलेत. आपल्या महाराष्ट्र निवडणुकांसारखेच बिहारचे निकालही एकतर्फी आणि धक्कादायक आले आहेत. भाजप आणि नितीश कुमार यांच्या जनता दलाने पुन्हा एकदा खणखणीत यश मिळवलं आहे . तब्बल २० वर्षांची अँटी इन्कमबंसी असतानाही बिहारने पुन्हा एकदा मोदी आणि नितीश कुमारांवर विश्वास टाकला आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या गोष्टी भाजप जनता दलाच्या बाजूने गेल्या , भाजपने एवढी मुसंडी कशी मारली, लालूंच्या राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसचं पानिपत का झालं? आणि शेवटी मग आता मुख्यमंत्रीपद कोणाकडे असणार? जाणून घेऊया. (Bihar Election)

तर बिहार विधानसभेच्या २४३ जागांपैकी २०२ जागा नितीश यांच्या जनता दल (युनायटेड) आणि भाजप आघाडीने जिंकल्या आहेत. एक प्रकारे, एनडीएने २०१० च्या कामगिरीची जवळजवळ पुनरावृत्ती केली आहे, जेव्हा भाजप-जेडीयू युतीने २०६ जागा जिंकल्या होत्या . त्यामुळे आता पुन्हा एकदा एक मजबूत भाजप जेडीयू आणि इतर पक्षांच्या युतीचं सरकार बिहारमध्ये स्थापन होणार आहे. मात्र प्रश्न हा पडतो कि आरजेडी काँग्रेस युतीचा असा दारुण पराभव झालाच कसा. तर सुरवातीला त्याचीच काही कारणं पाहूयात. आरजेडीच्या नेतृत्वाखालील आघाडीचा पराभव होणामागील गेली तीन टर्म एकंच कारण कायम असते ते म्हणजे जंगलराजची भीती. जेव्हा बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांचं सरकार होतं तेव्हा दिवसाढवळ्या गुन्हेगारीच्या घटना घडत. गुन्हेगारांवर कोणताही अंकुश नव्हता असता ज्याला विरोधी पक्षांनी जंगलराज म्हटलं होतं. (Latest News)
त्यामुळे १९९० आणि २००० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळातील बिहारमधील तथाकथित ‘जंगल राज’ची सावली त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत राजदला सतत त्रास देत राहिली. तेजस्वी यादव यांनी पक्षाला नवीन पिढीसाठी पुन्हा ब्रँड करण्याचा प्रयत्न केला परंतू अराजकता, अपहरण, टोळीयुद्धे आणि अनियंत्रित बाहुबली वर्चस्वाच्या आठवणी ग्रामीण बिहारमध्ये अजूनही जिवंत आहेत. ज्यामुळे यादव आणि मुस्लिम वर्ग वगळता इतर सामाजिक घटक आरजेडीला पुन्हा चान्स देण्यास तयारच नाही हे पुन्हा एकदा हायलाइट झालं आहे . नितीश कुमार यांच्या नेतृत्वखालील विजयाचं दुसरं महत्वाचं कारण म्हणजे सत्तेत असल्याने नितीश कुमार यांना अनेक गोष्टी डिलिव्हर करता आल्या तर आरजेडीचे तेजस्वी यादव नुसत्या या गोष्टींचं आश्वासनच देत राहिले. निवडणुकांचा प्रचार चालू झाल्यानंतर आरजेडीने नितीश कुमार यांच्यावर आरोप लावला होता तो म्हणजे ते तेजस्वी यादव यांनी आश्वासन दिलेल्या योजनांची कॉपी करतात. (Bihar Election)
तेजस्वी यांनीच पहिल्यांदा घोषणा केली होती की जर त्यांनी सत्तेत आल्यास महिलांना दरमहा २५०० रुपये दिले जातील. त्यांनीच वृद्धांना दिल्या जाणाऱ्या तुटपुंज्या पेन्शनची खिल्ली उडवली होती आणि अधिक देण्याचे आश्वासन दिले होते. ग्रामीण भागातील वाढत्या वीज बिलांविरुद्धही त्यांनी मोहीम राबवली होती. मात्र सत्तेत असलेल्या नितीश कुमार यांनी या साऱ्या योजना राबवल्या. महिलांच्या खात्यात १० हजार रुपये जमा झाले. वृद्धांची पेन्शन वाढवण्यात आली. आणि वीजबिलही माफ करण्यात आले. ज्यामुळे लोकांनी ज्यांनी या गोष्टी प्रॉमिस केल्या त्याऐवजी ज्यांनी या गोष्टी प्रत्यक्षात डिलिव्हर केल्या यावर विश्वास ठेवला आणि नितीश कुमारांच्या नेतृत्वात पुन्हा संधी देण्यात आली. भाजप आणि नितीश कुमार यांना विजय मिळवून देण्यात तिसरा महत्वाचा फॅक्टर जो महाराष्ट्रसारखा बिहारमध्येही चालला तो म्हणजे लाडकी बहीण फॅक्टर. (Latest News)
२००६ मध्ये महिलांना स्वतंत्र मतदार म्हणून ओळखणारे आणि शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी मोफत सायकलीसारख्या कल्याणकारी योजनांसह महिलांना लक्ष्य करणारे कुमार हे पहिले नेते होते. तेव्हापासून त्यांनी स्थानिक स्वराज निवडणुकीत महिलांना आरक्षण दिले आहे आणि त्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. २०१६ मध्ये लादण्यात आलेली वादग्रस्त दारूबंदी देखील महिला मतदारांना खूश करण्यासाठी होती. या प्रस्तावांमुळे महिला मतदारांचा नितीश यांच्या नेतृत्वावरील विश्वास टिकून राहिला आहे. महत्वाचं म्हणजे दारूबंदीमुळे जरी अवैध दारू विक्री, शासनच राजस्व तोटा वाढला असला तरी नवरा पहिल्यासारखी खूप दारू पिऊन घरी येत नाही असा महत्वाचं निरीक्षण बिहारमधील महिलांनी नोंदवलं होतं. (Bihar Election)

ज्यावेळी तेजस्वी यादव आणि प्रशांत किशोर हे नेते दारू बंदी उठवण्याचं आश्वासन देत होते तेव्हा नितीश कुमार आणि भाजप त्यावर ठाम होती ज्याचा फायदा आता त्यांना झाला आहे. सोबतच ऐन निवडणुकीच्या तोंडावर बिहारमध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेच्या (एमएमआरवाय) महिला लाभार्थ्यांना १०,००० रुपये दिले गेले. ज्यामुळे संपूर्ण महिलावर्ग भाजप आणि नितीश कुमार यांच्या मागे उभा राहिला आणि त्यांना घवघवीत यश मिळालं असं अनुमान बांधलं जात आहे. बिहारमध्ये भाजप आणि नितीश कुमार यांना यश मिळवून देणारा चौथा महत्वाचा फॅक्टर म्हणजे जातीय समीकरणातही त्यांनी आरजेडी काँग्रेस आणि व्हीआयपी महागठबंधनला मात दिली आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, बिहारचे राजकारण मुस्लिम-यादव (एमवाय) युतीवर अवलंबून होते, ज्याचा फायदा आरजेडीला झाला. मात्र आता २०२५ मध्ये, महिला (महिला) आणि ईबीसी (आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय) गटांवर भर देणारे एक नवीन अंकगणित उदयास आले, ज्यामुळे ‘एमई’ घटक निर्माण झाला आणि एनडीएच्या मतांमध्ये मोठी वाढ झाली आहे. (Latest News)
एनडीमध्ये भाजपने सर्व उच्च जातींना एकत्र केले, तर नितीश कुमार यांच्या जद(यू) ने कुर्मी आणि ईबीसींमध्ये एक मजबूत आधार मिळवला, जे बिहारच्या लोकसंख्येच्या सुमारे ३६% आहेत. याव्यतिरिक्त, लोक जनशक्ती पार्टी (राम विलास), राष्ट्रीय लोक मोर्चा आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चा यांमुळे एनडीएच्या दलित आणि मागासवर्गीय जातींच्यामतदारांत घसघशीत वाढ झाली. या जातीय युतीच्या सर्वसमावेशकतेमुळे महागठबंधनच्या ३८% विरुद्ध nda ला जवळजवळ ४९% मते मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आणि ज्याचा परिणाम निकालात दिसला. (Bihar Election)
=======================
हे देखिल वाचा : Obesity Treatment : भारतातील पहिली ‘ लठ्ठपणा कमी करणारा ’ औषधयशस्वी ट्रायलमध्ये यश, बाजारात कधी येणार जाणून घ्या
=======================
थोडक्यात आता भाजपप्रणित NDA बिहारमध्ये पुन्हा एकदा पुढच्या पाच वर्षांसाठी एक मजबूत सरकार स्थापन करेल. मात्र या सर्वांत एक मोठा बदल असेल तो म्हणजे. नितीश कुमार यांची पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची शक्यता आता मावळली आहे. नितीश कुमार यांच वय आणि त्यांची ढासळलेली प्रकृती हा मोठा चिंतेचा विषय होता. मात्र भाजपने साथ दिल्याने तो विषय जास्त मोठा झाला नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपला जे यश मिळाल आहे ते अभूतपूर्व आहे. सोबतच मागच्या निवडणुकित जास्तीच्या जागा मिळूनही भाजपने नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केलं होतं. यावेळी मात्र भाजप असा त्याग करणार नाही असं मत राजकीय विश्लेषक नोंदवत आहेत. नितीश कुमार यांची ढासाळणारी प्रकृती आणि नवीन नेतृत्वाची निर्माण झालेली पोकळी भरून काढताना भाजपाला आपला मुख्यमंत्री बसवणं असंही क्रमप्राप्त आहे. त्यामुळे भाजप नितीश कुमार यांना मागे सारून या वेळी मुख्यमंत्री पदाची खुर्ची घेणार यावर फक्त शिक्कामोर्तब होणंच बाकी आहे असंच दिसतं. (Latest News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
