कुसुमाग्रज म्हणजे वि. वा. शिरवाडकर यांचे खरे नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांच्या काकांचे नाव वामन शिरवाडकर असे होते त्यांना ते दत्तक गेल्यामुळे त्यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर असे झाले. त्यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ साली झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण पिंपळगाव येथे झाले. तर माध्यमिक शिक्षण नाशिक येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये म्हणजे आजचे जे.जु.स. रुंगठा विद्यालय आहे तेथे झाले. १९३० साली ते ठाकरसी विद्यालयात असताना त्यांच्या कविता ‘रत्नाकर’ मासिकातून प्रसिद्ध होत असत. अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून १९३२ साली जो सत्याग्रह झाला त्यात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी नुसत्या कविताच नाही तर कथा, कादंबऱ्या, नाटके, ललित साहित्य याबरोबरच अनेक वृत्तपतत्रातून पत्रकारिता पण केली. त्यांचा आवडता लेखक पी. जी. वुडहाऊस आणि आवडता नट चार्ली चॅप्लीन हा होता.
वि. वा. शिरवाडकर त्यांनी आपले गद्य लेखन वि. वा. शिरवाडकर या नावाने केले तर पद्य लेखन ‘कुसुमाग्रज’ (Kusumagraj) या नावाने केले. मराठी साहित्यात त्यांचे मोलाचे योगदान हे आहेच परंतु ते माणूस म्ह्णूनही उत्तम होते. त्यांनी कधी कुणाला दुखवले नाही. त्याची ‘कणा’ कविता घ्या आज ती कविता अनेक तरुणाचे खऱ्या अर्थाने स्फूर्तीस्थान आहे.
त्यांची नाटके तर खऱ्या अर्थाने अजरामर आहेत. खरे तर ते पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आले आणि साहित्य संघाच्या अ. ना. भालेराव यांना भेटले तेव्हा त्यांनी त्यांना नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले कारण त्यावेळी मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपू नये असे भालेराव याना वाटत होते. शिरवाडकरांनी सुमारे १९ नाटके लिहिली त्यांची नावे अशी आहेत ऑथेल्लो, आनंद, आमचं नाव बाबुराव, एक होती वाघीण, कौंतेय, जेथे चंद्र उगवत नाही, दिवाणी दावा, दुसरा पेशवा, दूरचे दिवे, देवाचे घर, नटसम्राट, नाटक बसते आहे, बेकेट, मुख्यमंत्री, ययाति, देवयानी, राजमुकुट, विदूषक, वीज म्हणाली धरतीला, वैजयंती. त्याच्या नटसम्राटने (Natsamrat) तर संपूर्ण नाट्यविश्वाला भुरळ पाडली. आजही प्रत्येक कलाकार मग तो कोणत्याही भाषेचा असो त्याला नटसम्राटमध्ये काम करण्याची इच्छा असते कारण त्यातील भाषेचे सौदर्य आणि जिवंतपणा हेच आहे.
१९४२ साली त्यांचा ‘विशाखा’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. हा काव्यसंग्रह म्हणजे मराठी साहित्यातील एक मैलाचा दगड ठरला आहे. त्यांनी विपुल लेखन केले. त्यांचे सुमारे बावीस कविता सग्रह प्रसिद्ध आहेत. काही कविता संग्रहाची नावे अशी आहेत, अक्षरबाग, जाईचा कुंज, जीवन लहरी, छंदोमयी, प्रवासी पक्षी, मुक्तायन, मेघदूत, जाईचा कुंज, थांब सहेली, पांथेय, मराठी माती, महावृक्ष, माधवी, मारवा, मुक्तायन, रसयात्रा, वादळ वेल, विशाखा, श्रावण, समिधा, स्वगत, हिमरेषा इत्यादी. मला त्यांनी एकदा त्याची ‘देणं’ ही कविता लिहून पाठवली होती. जी कविता मला खूप आवडत होती.
कुसुमाग्रजांच्या १९८० च्या आधीच्या कविता आणि नंतरच्या कविता पाहिल्या तर खूप फरक जाणवतो. त्याची कविता काळानुसार बदलत होती आणि हेच कवितांच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. आजही नवीन पिढीला कुसुमाग्रज जवळचे वाटतात त्याचे हेच कारण आहे. त्यांनी कथासंग्रह पण लिहिले त्यांची नावे अपॉईंटमेंट, काही वृद्ध काही तरुण, फुलवाली, बारा निवडक कथा, सतारीचे बोल अशी आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी कल्पनेच्या तीरावर, जान्हवी, वैष्णव या कादंबऱ्याही लिहिल्या. शिरवाडकरांचे सर्व साहित्य पाहिले तर एक गोष्ट जाणवते ती म्हणजे त्यांचे साहित्य समाजाभिमुख आहे. त्यांच्या साहित्यात कुठे अहंकार दिसत नाही तर अभिमान दिसतो, अगतिकता दिसते पण लाचारी दिसत नाही हे महत्वाचे. त्यांची कणा ही कविता घ्या किंवा कोलंबसाचे गर्वगीत घ्या, ह्या कवितेतून सतत कोणत्याही दुःखाला, अडचणीला सामोरे जाण्यासाठी त्या प्रवृत्त करतात. नुसताच निराशावाद किंवा आक्रोश नाही. कारण नुसता निराशावाद किंवा आक्रोश फक्त समाजामध्ये नकारात्मकता पसरवतो.
त्यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रजांना खूप पुरस्कार मिळाले. १९९१ साली पद्मभूषण पुरस्कार मिळाला, त्यांच्या ‘विशाखा’ काव्य संग्रहाला ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळाला. नटसम्राट नाटकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. १९६४ साली मडगाव येथे भरलेल्या अखिल भारतीय साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद मिळले, १९७० साली कोल्हापूर येथे भरलेलं ५१ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद मिळाले.
हे देखील वाचा: कथाव्रती – अरविंद गोखले
मला आठवतंय कुसुमाग्रज जाण्याआधी त्यांच्या घरी प्रवीण दवणे बरोबर गेलो होतो, ते आजारीच होते, नुकताच ऑक्सिजनचा मास्क काढला होता, अर्थात प्रवीण दवणे बरोबर असल्यामुळे मला त्यांना भेटता आले. त्यांना त्या अवस्थेत बघून माझ्या डोळ्यात पाणी आले , त्यांनी माझी विचारपुस केली. मी बॅँक बेंचेस मुलांना शिकवतो हे सांगितले तेव्हा ते मला म्हणाले “अरे तू अण्णा हजारे यांच्यासारखी सारखी शाळा काढ”. मी नुसता हो म्हणालो कारण माझ्याकडे ते सोपस्कार करण्यासासाठी जे काही लागते ते नव्हते. त्यांनी मला त्याही अवस्थेत स्वाक्षरी दिली. त्यांनी हातात पेढा ठेवला, त्याना नमस्कार केला आणि निघालो आणि काही दिवसात त्याचे निधन झाले.
कुसुमाग्रज नावाचा तारा आपल्या पृथीवरून १० मार्च १९९९ रोजी निखळला आणि तसाच तो आकाशात त्याच नावाने आता लुकलुकत आहे हे महत्वाचे.
लेखकः सतीश चाफेकर