Home » आता शेर सिंह राणा यांच्या आयुष्यावर येणार बायोपिक

आता शेर सिंह राणा यांच्या आयुष्यावर येणार बायोपिक

by Team Gajawaja
0 comment
Sher Singh Rana
Share

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकची चलती आहे असं म्हणायला हरकत नाही. या सर्व बायोपिकमध्ये आता एका नव्या बायोपिकची भर पडणार आहे. शेर सिंह राणा (Sher Singh Rana) यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक लवकरच येतोय. आता तुम्ही म्हणाल शेर सिंह राणा कोण? शेर सिंह राणा म्हणजे फुलनदेवी यांची हत्या करणारा आणि अफगाणिस्तानमध्ये जाऊन सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या अस्थी मायभूमीत घेऊन येणारा वीर….या दोन टोकाच्या घटनांमुळे शेर सिंह राणा यांचे अवघे आयुष्यच एका चित्रपटासारखे आहे. काही ठिकाणी त्यांना खुनी म्हणून ओळखले जाते, तर काही ठिकाणी एखाद्या वीरासारखा त्यांचा मान राखण्यात येतो. या शेर सिंह राणा (Sher Singh Rana) यांच्यावर बायोपिकची घोषणा झाली असून प्रमुख भूमिकेत विद्युत जामवाल याचे नाव नक्की झाले आहे. शेर सिंह राणा यांचा सध्या मुक्काम उत्तराखंड येथे असून त्यांच्यावरील बायोपिकचे हक्क श्रीनारायण सिंह यांच्याकडे गेल्या काही वर्षापूर्वीच त्यांनी दिले आहेत.

शेर सिंह राणा यांचे आयुष्य म्हणजे एका चित्रपटापेक्षाही रंजक आहे. त्यांचा जन्म 17 मे 1976 रोजी उत्तराखंडच्या रुडकी येथे झाला. त्यांचे खरे नाव पंकज सिंह राणा. आईवडील आणि दोन भाऊ असे हे राणा कुटुंब होते.सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या राणा यांचे नाव फुलनदेवी हत्याकांडामुळे प्रकाशझोतात आले. फुलनदेवी यांच्यावर मध्यप्रदेशमधील बेहमई या गावांत ठाकूर समाजातील काही व्यक्तींनी बलात्कार केला होता. या घटनेनंतर फुलनदेवी डाकू झाल्या. या भागात त्यांची मोठी दहशत होती.

आपल्यावर झालेल्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी त्यांनी बेहमई गावात एका लग्नसमारंभात चक्क पोलीसांच्या वेशात एन्ट्री घेतली आणि त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या 22 व्यक्तींना एका रांगेत उभं करुन गोळी मारुन हत्या केली.14 फेब्रुवारी 1981 रोजी झालेल्या या हत्याकांडामुळे फुलनदेवी हे नाव देशातच काय पण विदेशातही गाजले. या बेहमई हत्याकांडानंतर फुलनदेवी यांनी आत्मसमर्पण केले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला आणि त्यांना शिक्षा मिळाली.

जेलमधून सुटल्यावर फुलनदेवी राजकारणात उतरल्या. निवडणूक लढल्या आणि जिंकल्याही. डाकू असलेली एक महिला, खासदार झाली हा मोठा चर्चेचा विषय झाला. हे सर्व नियमीत असताना अचानक फुलनदेवी यांची हत्या झाली. 25 जुलै 2001 रोजी दिल्लीमधील त्यांच्या सरकारी घरात गोळ्या घालून फुलनदेवी यांची हत्या करण्यात आली. दोन दिवसानंतर फुलनदेवी यांच्या मारेकऱ्यांनी आत्मसमर्पण केले. त्याचे नाव होते शेर सिंह राणा.

बेहमई हत्याकांडात मारल्या गेलेल्या 22 राजपुतांच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच फुलनदेवींची हत्या केल्याचा जबाब राणा यांनी दिला. राणा यांच्यावर खटला चालला. त्यांची रवानगी तिहार जेलमध्ये झाली. 17 फेब्रुवारी 2004 रोजी म्हणजे बरोबर तीन वर्षानंतर शेर सिंह राणा तिहार जेलसारख्या भक्कम जेलमधून फरार झाला. या घटनेनं मोठी खळबळ उडाली.

big disclosure of Sher Singh Rana in Phoolan Devi murder case - फरारी के  दिनों में जमशेदपुर में था फूलन देवी का हत्यारोपित शेर सिंह राणा

====

हे देखील वाचा: प्राईम व्हिडीओने केली आपली पहिली कायद्यावर आधारित मालिका ‘गिल्टी माइंड्स’ची घोषणा

====

फरार झाल्यानंतर राणा पोलिसांच्या तावडीत सापडला नाही. पण त्यानंतर त्याचे आयुष्य म्हणजे एक थरार कथाच होती. फुलनदेवीची हत्या करुन राणा थेट मुरादाबच्या एका हॉटेलमध्ये राहीले. त्यांच्या काही नातेवाईक आणि मित्रमंडळींनी त्यांना पैशाची मदत केल्याचे सांगण्यात येते.
दोन महिन्यानंतर त्यांना बांगलादेशचा व्हिजा मिळाला. बांगलादेशमधून फोनद्वारे राणा, कुटुंबियांच्या संपर्कात असल्याचीही चर्चा होती. तिथे त्यांना पैसेही मिळायचे. बांगलादेशानंतर राणा दुबईमध्ये काही दिवस राहीले आणि त्यानंतर त्यांनी थेट अफगाणिस्तान गाठलं. इथून राणांच्या आयुष्यातील आणखी एका रंजक कथेला सुरुवात झाली.

शेर सिंह राणा (Sher Singh Rana) अफगाणिस्तानमध्ये गेले तेव्हा सर्वत्र अराजकता होती. या सर्व वातावरणात राणानं तमाम भारतीयांना गौरव वाटेल असं काम केलं. ते म्हणजे अफगणिस्तानच्या गजनीमध्ये जाऊन त्यांनी सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या अस्थी शोधून काढल्या आणि त्या काढून आपल्यासोबत भारतात आणल्या. या सर्वांची खात्री वाटावी म्हणून राणा यांनी ही सर्व घटना आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्या.

या घटनेचा युटूबवर 40 मिनिटाचा व्हिडीओही आहे. अर्थात त्याला प्रचंड लाईक मिळाल्या आहेत. सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या अस्थी भारतात आणल्यावरही शेर सिंह राणा (Sher Singh Rana) पोलिसांच्या हातात सहाजासहजी लागले नाहीत. जेलमधून राणा फरार झाल्याला दोन वर्षाचा काळ झाला होता. अफगाणिस्तानमधून भारतात आल्यावर 2006 मध्ये त्यांना कोलकत्ता येथील एका गेस्ट हाऊसमधून अटक करण्यात आली. पण या सर्वादरम्यान शेर सिंह राणा यांची प्रतिमा बदलली होती.पृथ्वीराज चौहान यांच्या आस्थी आणल्यामुळे त्यांना एखाद्या वीरासारखा मान मिळाला. हिंदू क्षत्रिय सेनेने त्यांचा सत्कार केला. यानंतर त्यांना दिल्ली हाईकोर्ट मधून जामिन मंजूर करण्यात आला.

शेर सिंह राणा (Sher Singh Rana) यांनी गाजियाबादच्या पिलखुआ येथे सम्राट पृथ्वीराज चौहान यांचे मंदिर उभारले आणि तिथेच त्यांच्या अस्थीही ठेवल्या. राजकारणातही त्यांनी प्रवेश केला. राष्ट्रीय जन लोक पार्टी म्हणून पक्षाची स्थापना केली. 2012 मध्ये उत्तर प्रदेशच्या जेवर मतदार संघामधून त्यांनी निवडणूक लढवली. यात राणा यांचा पराभव झाला तरी लोकप्रियता मात्र मिळाली. 20 फेब्रुवरी 2018 रोजी राणा यांचा विवाह मध्यप्रदेशचे माजी आमदार राणा प्रताप सिंह यांची मुलगी प्रतिमा राणा यांच्याबरोबर झाला. या विवाहात राणा यांना 10 करोड 31 लाख रुपये हुंडा म्हणून देण्यात आले होते. मात्र याला नकार देत फक्त एक चांदीचे नाणे स्विकारत त्यांनी लग्न केले. या घटनेलाही खूप प्रसिद्धी मिळाली. दरम्यान राणा यांच्या जीवनावर पंजाबीमध्ये एक गाणेही येऊन गेले. युट्यूबवर असलेल्या या गाण्यालाही लाखो लाईक मिळाले आहेत.

====

हे देखील वाचा: कतरिना कैफची बहीण इसाबेलला RRR मध्ये मिळालेली मोठी भूमिका, या अटीमुळे ऑफर नाकारली

====

शेर सिंह राणा (Sher Singh Rana) यांचे सर्व आयुष्यच एकापेक्षा एक घटनांनी उत्सुकतापूर्ण झाले आहे. त्यांनी जेल डायरी नावाचे पुस्तकही लिहीले आहे. यात फुलनदेवी यांची हत्या, जेलमधून केलेले पलायन, अफगाणिस्तानचा प्रवास… आदी घटनांचा उल्लेख आहे. या सर्व घटना आता चित्रपट रुपात पहायला मिळणार आहेत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.