Home » निळू फुले (Nilu Phule): बायोपिकमधून उलगडणार निळू फुले यांचा जीवनप्रवास

निळू फुले (Nilu Phule): बायोपिकमधून उलगडणार निळू फुले यांचा जीवनप्रवास

by Team Gajawaja
0 comment
निळू फुले Nilu Phule
Share

“बाई वाड्यावर या….” या सुप्रसिद्ध डायलॉगचे मानकरी निळू फुले (Nilu Phule) यांच्या जीवनावर हिंदीमध्ये चित्रपट तयार होत आहे. चार दशकांहून अधिक काळ मराठी चित्रसृष्टीवर अधीराज्य गाजवलेले, करारी आवाजात मिश्यांवर पीळ देत, नायकाच्या मनात धडकी भरवणाऱ्या खलनायकाची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते निळू फुले म्हणजे मराठी चित्रपटसुष्टीच्या इतिहासातलं एक सुवर्णपान. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा टिप्सचे कुमार तौराणी यांनी केली आहे. तौराणी यांनी निळू फुले यांची कन्या अभिनेत्री गार्गी फुले यांच्याकडून या चित्रपटासाठीचे सर्व राईट्स घेतले आहेत. 

अभिनयात बहुधा खलनायकी भूमिका करणारे निळू फुले (Nilu Phule) प्रत्यक्षात सामाजिक कार्यात अग्रेसर होते, हे मात्र फार थोड्या लोकांना माहिती असेल. निळूभाऊंनी सेवादलाचा कार्यकर्ता म्हणून काम केलेच, शिवाय अंधश्रद्धा निर्मूलनासाठीही मोठे योगदान दिले आहे. मात्र त्यांच्या स्वभावाचा हा पैलू त्यांच्या खलनायकी भूमिकांनी झाकला गेला. 

एक अभिनेता, स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून निळू फुले कसे होते, हे या चित्रपटामधून दाखवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे, तौराणी यांनी सांगितले. अभिनयासोबत निळूभाऊंच्या या रुपाची ओळखही नव्यानं या बायोपिकच्या माध्यमातून करुन देण्यात येणार आहे, हे विशेष.   

निळू फुले Nilu Phule

निळू फुले यांचा सगळा जीवनप्रवास रंजक होता. पुण्यामध्ये त्यांचा जन्म झाला. पुण्याच्या मंडईमध्ये त्यांच्या वडीलांचे भाजीचे गाळे होते. घरात एकूण अकरा भावंडं. त्यामुळे निळूभाऊ काही वर्ष आपल्या काकांकडे शिक्षणासाठी राहिले.  

तिसरीनंतर पुण्याच्या शिवाजी मराठी हायस्कूलमध्ये त्यांनी त्यावेळेच्या मॅट्रीक पर्यंत शिक्षण घेतले. बाबा आढाव, भाई वैद्य सारखे जेष्ठ समाजसेवक निळूभाऊंचे सहअध्यायी होते. मराठी विषयासाठी त्यांना प्रसिद्ध कवियत्री शांताबाई शेळके या शिक्षिका म्हणून लाभल्या होत्या. निळूभाऊ या आठवणी सांगताना नेहमी स्वतःला भाग्यवान म्हणत असत. 

आपल्या कुटुंबाला मदत करण्यासाठी भाजी विकणाऱ्या निळूभाऊंना शालेय जीवनापासून चित्रपटांचे वेड होते. आपली अभिनयाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी ‘येरा गबाळ्याचे काम नोहे’ हा वग लिहीला. ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या वगनाट्यातून त्यांची अभिनेता म्हणून ओळख झाली.  

सन १९५६ मध्ये ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटापासून निळू फुले मोठ्या पडद्यावर आले. त्यांची निरीक्षण क्षमता वाखाणण्यासारखी होती. गाव-खेड्यामध्ये फिरून तिथल्या लोकांच्या बोलण्याची सवयी, राहण्याची पद्धत यांचा ते अभ्यास करायचे. तसाच प्रयोग ते आपल्या अभिनयात करायचे. त्यांनी स्वतःला कधी मर्यादीत ठेवले नाही. त्यामुळे चित्रपट, रंगभूमीवर व्यावसायिक नाटकं आणि वगनाट्यातूनही निळूभाऊ भूमिका करायचे.  

nilu-phule-2 | Saamana (सामना)

कथा अकलेच्या कांद्याची, कुणाचा कुणाला मेळ नाही, पुढारी पाहिजे, बिन बियाचे झाड, मी लाडाची मैना तुमची, राजकारण गेलं चुलीत, लवंगी मिरची कोल्हापूरची ही त्यांची वगनाट्यही गाजली. जंगली कबूतर, बेबी, रण दोघांचे, सखाराम बाईंडर, सूर्यास्त या नाटकांमधूनही निळूभाऊंच्या अभिनयाची जबरदस्त छाप पडली. जब्बार पटेल यांच्या सिंहासनमध्ये त्यांनी साकारलेली दिगंबर या पत्रकाराची भूमिका अनेक नवख्यांसाठी मार्गदर्शक ठरली.  

तब्बल चाळीस वर्ष मराठी चित्रपट सृष्टी गाजवलेल्या निळू फुले यांच्या नावावर २५० चित्रपट जमा आहेत. त्यात अजब तुझे सरकार, आयत्या बिळावर नागोबा, एक गाव बारा भानगडी, कळत नकळत, गणानं घुंगरू हरवलं, जैत रे जैत, पिंजरा, बन्याबापू, भुजंग, सामना, सोंगाड्या सारख्या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे. सिंहासन, पिंजरा, सामना या चित्रपटांमधून निळू फुले यांनी साकारलेल्या भूमिका अजरामर झाल्या. सखाराम बाईंडर सारख्या नाटकात त्यांनी साकारलेल्या भूमिकेची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली.  

“बाई वाड्यावर या….” या निळूभाऊंच्या डायलॉगवर आजची तरुणाईही तेवढीच फिदा आहे. हा डायलॉग मराठी इतकाच हिंदीमध्येही गाजला. अगदी या डायलॉगवर गाणीही लिहिली गेली.

हिंदी चित्रपटातही निळू फुले यांनी कित्येक मान्यवरांसोबत काम केले आहे. कुली चित्रपटात अमिताभ बच्चन, मशालमध्ये दिलीप कुमार आणि सारांशमध्ये अनुपम खेर यांच्यासोबत त्यांनी काम केले आहे.  

हे ही वाचा: या महत्वाच्या कारणांसाठी आवर्जून बघा ‘शार्क टॅंक इंडिया’

‘कल हो ना हो’ चित्रपटासंबंधित १३ अशा गोष्टी ज्या तुम्हाला माहिती नसतील

सुमारे १३ वर्षांपूर्वी वयाच्या ७८ व्या वर्षी या अष्टपैलू कलाकाराचे निधन झाले. एका अस्सल कलाकाराच्या आयुष्यावर त्याच्या मृत्यूनंतर तेरा वर्षांनी चित्रपट येतोय, यावरुनच निळू फुले यांची लोकप्रियता लक्षात येते. या चित्रपटात निळू फुले यांची भूमिका कोण करणार, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या बायोपिकच्या कथेचे काम मात्र सुरु झाले आहे.

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.