गेल्या वर्षी म्हणजे जून २०२४ मध्ये, बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातल्या बैटोना गावात एक बातमी वाऱ्यासारखी पसरली. बातमी अशी होती की, गावात सरकारी नोकऱ्या निघाल्या! त्यासुद्धा ग्राम रक्षा दल आणि होम गार्डच्या जागेसाठीच्या नोकऱ्या होत्या. आता हे ग्राम रक्षा दल म्हणजे अशी टीम जी गावाच्या सुरक्षेचं काम बघते आणि त्यांना पोलिसांचे मित्रसुद्धा म्हणतात. गावात बातमी पसरली आणि सगळे सरकारी नोकरीच्या मागे हात धुवून लागले. यासाठीचा पगार होता, महिन्याला तब्बल २२,००० रुपये! सगळे गावकरी खुश झाले. राहुल कुमार साहनी, गावातल्या पोलिस स्टेशनचा वरिष्ठ पोलिस अधिकारी याने ३०० पेक्षा जास्त गावकऱ्यांना सरकारी नोकरी दिली. गावात नव्या पोलिस स्टेशनचं उद्घाटन झालं, भरती झालेल्यांचं ट्रेनिंग सुरू झालं, त्यांच्या सणावाराला ड्यूटी लागायला लागल्या. नोकरी लागलेले सगळे खुश होते. पण एका वर्षात हे सगळं पलटलं. अचानक सगळ्यांच्या नोकऱ्या गेल्या आणि मग त्या पोलिस स्टेशनचं काय झालं? तर बरेच महिने सुरू असलेला बिहार फेक पोलिस स्टेशन स्कॅम बाहेर पडला. नक्की हा बिहार पोलिस स्टेशन स्कॅम आहे तरी काय? हे आपण जाणून घेऊ. (Bihar)
तुम्हाला स्पेशल २६ सिनेमा आठवतोय का? अक्षय कुमार, अनुपम खेर खोटी इन्कम टॅक्स ऑफिसर्सची टीम तयार करतात आणि छापा टाकायच्या नावखाली पैसा लुबडतात. पण मग असा काहीसा फिल्मी स्कॅम खऱ्या आयुष्यात घडला होता का? तर हो! पण अगदी असा नाही, पण जरा फिल्मीच वाटेल असा स्कॅम बिहारमध्ये घडला होता. तर घडलं असं, राहुल साहनी नावाचा हा भामटा गावात आला आणि म्हणाला, “मी वरिष्ठ पोलिस अधिकारी आहे! आपल्या गावात नवीन पोलिस स्टेशन बनतंय. २५०० ते ५००० रुपये द्या, मी तुम्हाला कॉन्स्टेबल किंवा चौकीदार बनवतो आणि पगार विचाराल तर, २२००० रुपये!” गावातल्या तरुण मूलामुलींना हीच संधी वाटली. त्यांना वाटलं, आपण फाॅर्म भरूयात, म्हणजे आपल्या हातात सरकारी नोकरी असेल आणि आजकाल सरकारी नोकरी असणं म्हणजे किती महत्त्वाचं मानलं जातं, हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे! तर गावातल्या पोरांनी सरकारी नोकरीच्या स्वप्नात, राहुलवर विश्वास ठेवला. भरती करताना राहुलने ३०० पेक्षा जास्त लोकांकडून जवळपास ५० लाख रुपये लुटले. (Top Stories)
राहुलने बैटोनाच्या सरकारी शाळेतल्या तीन खोल्या ताब्यात घेतल्या. टेबल, खुर्च्या, बनावट कागदपत्रं सेट केली आणि प्रॉपर पोलिस स्टेशनचा सेटअप उभा केला. एका CNG ऑटोवर “कसबा थाना” असं लिहिलं. जी रात्री गावात पेट्रोलिंगचं काम करायची. त्याच्या टोळीत ५-६ खोटे कॉन्स्टेबल होते, त्यात दोन बायका आणि काही माजी NCC कॅडेट्स होते. हे लोक फरकिया चौक, गांधी पूल, बाजारात गस्त घालायचे, खंडणी वसूल करायचे. गावकऱ्यांना अक्षरशः वाटायला लागलं की, हे खरं पोलिस स्टेशन आहे! सकाळी ८ वाजता हे पोलिस ठाणे ओपन व्हायचं आणि संध्याकाळी ५ वाजता बंद व्हायचंं. १०० पेक्षा जास्त तरुणांना खोटी वर्दी, काठ्या, खोटे आयडी कार्ड्स दिले गेले. भरती झालेल्या सगळ्यांसोबत दीड महिन्याचं ट्रेनिंगचं नाटक केलं गेलं. या खोट्या पोलिसांना वाहनं तपासायला लावली, ज्यांच्याकडे हेलमेट,लायसन्स नाही त्यांच्याकडून ४००रुपये फाइन वसूल केला जायचा, त्यातले २००रुपये राहुलच्या खिशात जायचे, त्याने खोटया पोलिसांना दारू जप्त करायला लावली, त्यांच्या सणावाराला ड्यूटी लावल्या, इतकंच काय? २६ जानेवारी २०२५ला या खोट्या पोलिसांचा सत्कारसुद्धा झाला, ज्यात तिथले नेतेमंडळीसुद्धा हजर होते. (Bihar)
==============
हे देखील वाचा : Shubanshu Shukla : अवकाशात शेतीबाबत संशोधन करणार शुभांशू शुक्ला !
==============
पण बरेच महिने झाले, कोणाचाच पगार येत नव्हता. सगळे पोलिस एकत्र येऊन राहुलच्या घरी त्याला जाब विचारायला गेले, पण राहुल तिथे नव्हता. त्याची आई घरी होती. तिने घरी आलेल्या सगळ्यांना शिव्या घातल्या. राहुलला अंदाज आला होता की, पोलिस त्याच्या मागावर आहेत. मग काय, रातोरात आपल्या टोळीसोबत पश्चिम बंगालला पळाला! आणि ४ जून २०२५ला हा स्कॅम उघडकीस आला. राहुलविरुद्ध केस दाखल झाली. सध्या पोलिस त्याचा शोध घेतायत. जर हा स्कॅम जवळपास एक वर्षभर सुरू होतं, तर तो कोणालाच कसा कळला नाही? असा प्रश्न उपस्थित झाला. त्यावर एक गावकरी म्हणाला की, “राहुलने इतकं खरं सेटअप केलं की, आम्हाला खरंच ते पोलिस स्टेशन वाटलं!” पूर्णिया SP कार्तिकेय शर्मा म्हणाले, “विशेष पथक या प्रकरणाचा तपास करतंय. त्या ‘कसबा थाना’ ऑटोचा शोध सुरू आहे.” MLA मोहम्मद अफाक आलम यांनी मागणी केली की, याचा सखोल तपास व्हावा, कारण “अशी फसवणूक पोलिसांच्या नकळत होणं शक्यच नाही.” तुम्हाला या खोट्या पोलिस स्टेशन स्कॅमबद्दल काय वाटतं, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics